खेळांचा राजा…सर्वांग सुंदर खेळ…अशी बिरुदे मिरविणारा सर्वांत लोकप्रिय खेळ ‘फुटबॉल’ आता वेगळ्याच चर्चेत आला आहे. व्यावसायिक लीगमधील गलेलठ्ठ व्यवहार नाही, कुठल्या खेळाडूची वैयक्तिक कामगिरी नाही, तर खेळाच्या जन्मस्थानावरून ही चर्चा रंगू लागली आहे. इंग्लंडच या खेळाची जन्मभूमी असे मानले जात होते, पण आता या खेळाचा उगम स्कॉटलंडमध्ये असू शकतो असा दावा एका फुटबॉल इतिहासकाराने केला आहे.
फुटबॉल खेळाची सुरुवात नेमकी कधी झाली?
फुटबॉल या खेळाची वंशावळ ही ‘मॉब फुटबॉल’पासून सुरू होते. मध्ययुगाच्या कालावधीत ब्रिटनमधील बेटांवर हा खेळ लोकप्रिय होता. तेव्हा हिंसक आणि गोंधळलेल्या स्थितीतील खेळ असे याचे वर्णन केले जात होते. खेळाडूंची, वेळेची मर्यादा नव्हती. शेकडो व्यक्ती एकत्र येऊन दोन संघ तयार केले जायचे आणि एका वर्तुळाकार वस्तूवर नियंत्रण मिळविण्यासाठी संघर्ष केला जायचा. यातील अनेक जण मद्यधुंद अवस्थेत असायचे. एकमेकांना ढकलले जायचे. मारहाणदेखील व्हायची. अशाच पद्धतीने तासनतास, तर कधी दिवसभर ते खेळायचे. फरक इतकाच होता की शस्त्राला बंदी होती. फक्त पायाचा वापर करायचा.
इंग्लंडला फुटबॉलचे जन्मस्थान का मानले जाते?

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

ब्रिटिशांच्या पेहराव, खाणे, पेयपान, खेळ आणि विशेषत: लैंगिक सवयींवर प्रकाश टाकणाऱ्या ‘ॲनाटॉमी ऑफ ॲब्युज’ या पुस्तकाच्या एका विस्तृत भागात लेखक फिलिफ स्टब्स यांनी या खेळाचे वर्णन मनोरंजनाची क्रूरता असे केले आहे. रक्तरंजित आणि खून करण्याची प्रथा असा उल्लेख त्यांनी केला आहे. खेळातील ही गोंधळलेली स्थिती दूर करताना १८६३ मध्ये एका तरुण ब्रिटिश वकिलाने खेळाचे नियम असणारे पुस्तक तयार केले. तेव्हा हे पुस्तक नव्या स्थापन झालेल्या फुटबॉल संघटनेने स्वीकारले. ही संघटना इंग्लंडमधील पूर्वीच्या बोर्डिंग स्कूलच्या मुलांनी स्थापन केली होती. म्हणूनच इंग्लंडला या फुटबॉल खेळाचे प्रणेते मानले जाते.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी?

फुटबॉल इतिहासकार गेड ओब्रायन यांनी स्कॉटलंड ही फुटबॉलची जन्मभूमी असल्याचा दावा केला. त्यांनी काही तर्कही प्रसिद्ध केले. मात्र, संघटनेच्या स्थापनेवरून ही चर्चा अद्याप चालूच आहे. १८६३ मध्ये लंडनमध्येच पहिली संघटना स्थापन झाली. स्कॉटलंडमध्ये मात्र स्कॉटिश फुटबॉल संघटनेची स्थापना मार्च १८७३ मध्ये झाली. या दोन्ही देशांतील पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना ग्लासगो येथील वेस्ट ऑफ स्कॉटलंड क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळला गेला.

स्कॉटलंडचा दावा कसा?

स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातील निवृत्त शालेय शिक्षक आणि स्कॉटिश फुटबॉल संग्रहालयाचे संस्थापक गेड ओब्रायन यांनी फुटबॉलचे जन्मस्थान इंग्लंड असल्याच्या कथा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. गेली कित्येक वर्षे नाही, तर शतकाहून शतके स्कॉटलंडमधील प्रत्येक शहरात आणि गावांत फुटबॉल खेळला जात आहे. तो कधीही मॉब फुटबॉल नव्हता, तर योग्य पद्धतीने खेळला जाणारा खेळ होता. गेल्याच महिन्यात ओब्रायन आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पथकाला स्कॉटलंडमधील अँवोथ शहरात १७व्या शतकामधील एका शेतात जगातील सर्वात जुने फुटबॉल मैदान असल्याचे निदर्शनास आले. यावरून ओब्रायन यांनी फुटबॉलचे जनक स्कॉटलंड असल्याचा दावा केला.

सापडलेले मैदान हे फुटबॉलचेच कशावरून?

इतिहासाविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडे आहे. फुटबॉल खेळाच्या उत्पत्तीबद्दल जे काही माहीत आहे ते सर्व पुन्हा लिहावे लागेल असे ओब्रायन यांचे म्हणणे आहे. मात्र, आपल्या तर्कावर ते ठाम आहेत. १६२७ ते १६३८ या कालावधीत अँवोथ येथील ओल्ड किर्क चर्चचे तत्कालिन धर्मोपदेशक आणि नंतर सेंट अँण्ड्र्यूज विद्यापीठाचे प्राध्यापक रेव्हरंड सॅम्युएल रुदरफोर्ड यांच्या पत्राचा उल्लेख ओब्रायन करतात. तेव्हा चर्चच्या परिसरात सतत फुटबॉल खेळले जात होते. त्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्ती केली आणि एक दिवस त्यांनी खेळायच्या जागेवर दगडांची ओळ लावण्याचा आदेश दिला आणि तीच १४ दगडांची ओळ ओब्रायन यांना सापडली. ही ओळ २८० फूट लांब आणि १४७ फूट रुंद होती. हे अंतर आजच्या नियोजित फुटबॉल मैदानापेक्षा थोडे कमी होते. हा ओब्रायन यांच्या तर्काचा आधार मानला जातो.

ओब्रायन यांचा तर्काला आणखी आधार काय?

स्कॉटलंडमध्ये पामरस्टन पार्क हे डमफ्रीजजवळील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान १९१९ मध्ये खुले करण्यात आले. तोपर्यंत तेथे कुठल्याही क्लबची स्थापना झाली नव्हती. मात्र, अगदी खोलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर अँवोथमध्ये खेळ अगदी पूर्वीपासून खेळला जायचा. साधारण १८७०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून किर्ककुडब्राइटशायर रायफल व्हॉलंटियर्सचा क्लब तेव्हा फुटबॉल खेळत होता. १८५७ मध्ये शेफिल्ड एफसी हा क्लब स्थापन झाला. हाच क्लब फुटबॉल विश्वातील जुना क्लब म्हणून परिचित आहे. पुढे १८६० मध्ये या क्लबने हॅलम एफसी या स्थानिक संघाशी २६ डिसेंबरला सामना खेळला.

आणखी ऐतिहासिक नोंदी काय सांगतात?

आतापर्यंतच्या नोंदीवरून या खेळाच्या खूप जुन्या आवृत्त्या प्राचीन ग्रीस, रोम, अमेरिका आणि चीनमध्ये आढळून येतात. मात्र, तेव्हा ते आजच्या आधुनिक खेळापासून खूप दूर होते. मॉब फुटबॉल म्हणूनच तेव्हा खेळाला लोकप्रियता होती. एका चेंडूवर काही करून नियंत्रण मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट होते. ओब्रायन यांनी दावा केला आहे की आपण लावलेला शोध महत्त्वपूर्ण असून, स्कॉटलंडमध्येच अगदी पूर्वीपासून योग्य फुटबॉल खेळले जात होते. मात्र, ‘केवळ मैदान सापडल्याच्या दाव्यावरून स्कॉटलंड हे फुटबॉलचे जन्मस्थान होते हे कसे सिद्ध करता येईल?’ असा मतप्रवाह आहे. इंग्लंडच्या शेफिल्ड होम ऑफ फुटबॉल क्लबचे विश्वस्त स्टीव्ह वूड यांनी तेव्हा कोणत्या प्रकारचा फुटबॉल खेळला जात होता हे जाणून घ्यायला कोणताही मार्ग नाही, असे म्हटले आहे. ओब्रायन यांनी तेव्हा खेळताना काय घडले किंवा काय घडले नसेल हे स्पष्ट केले आणि नंतर या खेळाचा आजच्या आधुनिक फुटबॉलशी संबंध नाही हे स्पष्ट केले, तर त्यांनी शोधलेल्या मैदानाच्या अस्तित्वाची चर्चा होऊ शकेल. अर्थात, ओब्रायन यांनी वूड यांचे विधान खोडून काढले. येथील लोकांना तुम्ही मूर्ख समजत आहात. मात्र, त्यांच्या पूर्वजांनी साध्य केलेल्या महान गोष्टींची त्या लोकांना माहिती नसावी म्हणून, स्कॉटलंडमध्येच खेळला गेलेला खेळ जुना आणि योग्य आहे, असे ओब्रायन ठामपणे सांगतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Origin of football scotland vs england debate history explanation print exp vsd