दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये असणारी बैसरन व्हॅली पर्यटकांना आकर्षित करीत असते. मात्र, या निसर्गरम्य ठिकाणी मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी भरदिवसा पर्यटकांवर गोळीबार केला असून, या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घृणास्पद कृत्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी भारतात परतले. आता सुरक्षाविषयक एक महत्त्वाची कॅबिनेट समिती (सीसीएस) आयोजित केली जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार लष्करी पोशाखातील दोन ते तीन बंदूकधारी बैसरनच्या घनदाट जंगलातून या व्हॅलीत पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला गेल्या एका दशकातील सर्वांत प्राणघातक असा दहशतवादी हल्ला आहे. मुख्य म्हणजे हा हल्ला अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या भारत दौऱ्यानंतर झाला आहे. बैसरन व्हॅली कुठे आहे? त्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ का म्हटले जाते? आणि पहलगाम हे ठिकाण पर्यटकांमध्ये इतके प्रसिद्ध कसे? ते जाणून घेऊ.

बैसरन व्हॅली दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

बैसरन व्हॅली नक्की कुठे आहे?

बैसरन व्हॅली दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. पहलगाम शहर डोंगरांनी वेढलेले आहे आणि पहलगाममधील बैसरन व्हॅली सर्वांत प्रेक्षणीय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ही व्हॅली बर्फाच्छादित पर्वत, दाट देवदार झाडे असलेली जंगले आणि विस्तीर्ण नद्या व हिरव्यागार परिसराने वेढलेली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या व्हॅलीला भेट देतात. अनेक बॉलीवूड चित्रपटांची शूटिंग या बैसरन व्हॅलीमध्ये झाली आहे. बैसरन व्हॅलीला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. तेथे विस्तीर्ण गवताळ प्रदेश, अल्पाइनची झाडे व बर्फाच्छादित पर्वतरांगा आहेत.

त्यामुळे ही व्हॅली काहीशी स्वित्झर्लंडसारखी दिसते. पहलगाम विकास प्राधिकरण (पीडीए) वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, दाट देवदार जंगलामुळे हा प्रदेश आणखी सुंदर दिसतो. तुलियान तलावामुळेदेखील पर्यटक मोठ्या संख्येने या व्हॅलीला भेट देतात. लिद्दर नदीचे नयनरम्य दृश्य या ठिकाणाला आधिक आकर्षक करते. जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाच्या मते, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही हे ठिकाण लोकप्रिय आहे. घोडेस्वारी, ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी लोक या व्हॅलीमध्ये येतात. उन्हाळ्यातील आल्हाददायक हवामानामुळे मोठ्या संख्येने उन्हाळ्यातही पर्यटक येथे येतात.

पहलगाम कशासाठी प्रसिद्ध?

पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पहलगाम श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे. पहलगामच्या लिद्दर नदीकाठी ‘शेफर्ड्स दरी’ आहे, जिथे प्रसिद्ध अमरनाथ गुहा आहे. हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ आहे. या भागात अरु वन्यजीव अभयारण्य असून, तपकिरी अस्वलांसारख्या प्राण्यांचे दर्शन तेथे होते. सनी देओलच्या चित्रपटाच्या नावावरून येथील निसर्गरम्य व्हॅलीला बेताब, असे नाव देण्यात आले आहे. बेताब व्हॅली आणि तुलियन तलाव ही पहलगाममधील लोकप्रिय ठिकाणे आहेत. सरकारी वेबसाइटवरील माहितीनुसार, २०२३ मध्ये एकूण १४,३२,४३९ पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे.

दहशतवादी हल्ला कसा उघडकीस आला?

पोलिस सूत्रांनी ‘न्यूज१८’ला माहिती दिली की, मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास खोऱ्याभोवती असलेल्या घनदाट देवदार जंगलातून दहशतवादी बाहेर आले आणि त्यांनी ४० पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात पर्यटक पोनी राईड्सचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, लष्करी पोशाखात आलेल्या दोन ते तीन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक चेहरा आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने पीटीआयला सांगितले, “दुपारी २:४५ वाजता लोक इकडे-तिकडे पळू लागले. आम्ही विचारले तेव्हा आम्हाला कळले की गोळीबार झाला होता.” दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने ‘एएनआय’ला सांगितले, “ही घटना आम्ही घटनास्थळावरून निघत असताना घडली. आम्हाला सतत गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. प्रत्येक जण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. आम्ही मागे वळूनदेखील पाहू शकलो नाही.” काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले. दहशतवाद्यांनी एका विशिष्ट धर्माच्या पर्यटकांना वेगळे केले आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारले.

एका प्रत्यक्षदर्शीने ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यापैकी काहींनी उपस्थित असलेल्या हिंदूंना पकडून त्यांना अजान म्हणण्यास भाग पाडले.” सूत्रांनी माहिती दिली की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले बहुतेक पुरुष होते. “हा हल्ला २६/११ च्या मुंबई हल्ल्यात घडलेल्या हल्ल्यासारखाच होता. दहशतवादी स्थानिक पोलिसांसारखे गणवेश परिधान करून होते आणि त्यांनी जवानांसारखे मुखवटे घातले होते,” असे एका प्रत्यक्षदर्शीने ‘इंडिया टुडे’ला सांगितले.