मध्य अमेरिकेतील क्युबा या देशात सध्या वीजसंकट निर्माण झाले आहे. या देशातील राष्ट्रीय वीज यंत्रणा (नॅशनल पॉवर ग्रिड) कोसळली असून हा देश तीन दिवसांत सलग दुसऱ्यांदा अंधारात बुडाला होता. अजूनही देशातील बऱ्याच भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. सुमारे एक कोटीच्या आसपास लोकसंख्या विजेपासून वंचित राहिली. काहींच्या मते सातत्याने धडकणारी चक्रीवादळे हे एक कारण असू शकते. काहींनी अमेरिकेच्या निर्बंधांकडे बोट दाखवले आहे. क्युबामधील अभूतपूर्व वीजसंकटाविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्युबामध्ये वीजसंकट का?

क्युबा देशाची राजधानी हवानाच्या पूर्वेकडील मटान्झास येथील औष्णिक वीज प्रकल्पात बिघाड झाल्याने १८ ऑक्टोबर रोजी सकाळी देशभरात वीजपुरवठा खंडित झाला. १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा अशीच परिस्थिती ओढवली. क्युबामधील वीज यंत्रणा आणि तेलावर चालणारे वीज प्रकल्प कालबाह्य झाले असून मोडकळीस आले आहेत. अनेक दशकांपूर्वी बांधल्या गेलेल्या या वीज प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती केली जात नाही.

वाचा सविस्तर… बॉम्बच्या खोट्या धमक्यांनी विमान कंपन्यांना किती आर्थिक नुकसान होतं?

ऊर्जेबाबत परावलंबी, मित्रांकडून वाऱ्यावर!

क्युबा हा देश विजेबाबत स्वयंपूर्ण नाही. फारच कमी जीवाश्म इंधन हा देश तयार करतो आणि त्यांची शुद्धीकरण क्षमताही मर्यादित असते. हा देश वीज उत्पादनासाठी जवळपास पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. क्युबाचा दीर्घकाळ मित्र असलेल्या व्हेनेझुएलानेही या वर्षापासून क्युबाला होणारा इंधनाचा पुरवठा निम्म्याने कमी केला आहे. रशिया आणि मेक्सिको या मित्रराष्ट्रांनीही क्युबाला होणारी निर्यात कमी केली आहे, ज्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारला स्पॉट मार्केटमध्ये महागड्या इंधनाचा शोध घ्यावा लागला आहे. क्युबाच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पात बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक छोटे प्रकल्प आधीच बंद झाले. खराब हवामानामुळे टँकरच्या जहाजांमधून इंधनाची आवकही थांबली होती, ज्यामुळे क्युबामधील वीज प्रकल्पांना पुरवठा कमी झाला आणि या संयोजनामुळे संपूर्ण ग्रीड कोलमडली.

पाणी संपले, अन्न नासले… नेटही नाही!

विजेविना क्युबामधील सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कॅरेबियन बेटावर विजेविना राहण्याची सवय नसल्याने लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेवर चालणारी अनेक उपकरणे निरुपयोगी झाली असून दैनंदिन गरजांसह मनोरंजनाच्या साधनांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये व्यत्यय आलेला आहे. अंधारामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने क्युबाचे लाखो नागरिक सध्या पाण्यापासून वंचित आहेत. अन्न, इंधन आणि औषधांच्या प्रचंड आणि वाढत्या तुटवड्यामुळे या बेटावरील जनजीवन गुंतागुंतीचे झाले आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दैनंदिन वीज भारनियमनामुळे गोठवलेल्या खाद्यपदार्थांचे मौल्यवान साठे नष्ट झाले आहेत, ज्यामुळे बहुसंख्य लोक अधिक अनिश्चित परिस्थितीत सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून देशात पॉवर ग्रीड चालवण्यासाठी इंधनाचा तुटवडा भासत असल्याने १५ ते २० तास देशाचा मोठा भाग विजेपासून वंचित राहिला आहे.

हे ही वाचा… TikTok trends: गर्भधारणेसाठी काही स्त्रिया सर्दीचे औषध का घेतात? ते परिणामकारक आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

क्युबाच्या सरकारचे प्रयत्न…

क्युबाच्या सरकारने म्हटले आहे की, त्यांनी नवीकरणीय स्रोतांमधून, प्रामुख्याने सौरऊर्जेपासून विजेची वाढती टक्केवारी तयार करण्याच्या दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशांतर्गत कच्च्या तेलाचे अधिक उत्पादन करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी या आठवड्यात दिलेल्या वृत्तानुसार, देशभरात २६ सौर केंद्रांचे बांधकाम सुरू असून, दोन वर्षांत १,००० मेगावॉट म्हणजेच सध्याच्या मागणीच्या एकतृतीयांश नवीन स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असाच आणखी एक प्रकल्प २०३१ पर्यंत पूर्ण होणार आहे. आर्थिक संकट, इंधनाचा तुटवडा आणि निधीची कमतरता यांमुळे प्रगती मंदावली आहे, ज्यामुळे नजीकच्या काळात कंपनीला आपल्या कालबाह्य वीज प्रकल्पांवर अवलंबून राहावे लागत आहे. क्युबाचे पंतप्रधान मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांनी विजेच्या संकटावर मात करण्यासाठी अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली. वीजसंकट दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे क्रूझ यांनी सांगितले.

विजेच्या समस्येला अमेरिका जबाबदार?

अमेरिकेच्या शीतयुद्धकाळातील व्यापार बंदी तसेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात लावलेल्या निर्बंधांना क्युबाने विजेच्या समस्येसाठी जबाबदार धरले आहे, असा आरोप क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाज-कॅनेल यांनी गुरुवारी केला. अमेरिकेने मात्र क्युबामधील वीज संकटांना आम्ही जबाबदार नसल्याचे ठामपणे सांगितले. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे क्युबासाठी इंधन खरेदी आणि सुट्या भागांच्या वित्तपुरवठ्यात गुंतागुंत निर्माण झाली आहे. अमेरिकेचे नौदल अनेक तेल टँकर्सना रोखून धरते, ज्यामुळे क्युबा आणि व्हेनेझुएलाला वाहतुकीसाठी स्वतःच्या कालबाह्य ताफ्यावर अवलंबून राहावे लागते. पण क्युबाच्या सरकारनेही स्वत:ची कमतरता मान्य केली आहे. प्रचंड भ्रष्टाचार, नोकरशाही आणि प्रचंड अकार्यक्षमतेमुळे सरकारी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून, सरकारकडे विद्युत यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त निधी शिल्लक राहिलेला नाही.

हे ही वाचा… समुद्राखाली २०० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या सागरी उष्णतेच्या लाटांचा अभ्यास संशोधकांनी का केला?

या तीव्रतेचे वीजसंकट यापूर्वी कधी?

सप्टेंबर २०२२ मध्ये इयान चक्रीवादळ आल्यानंतर क्युबाची वीज यंत्रणा कोसळली होती. त्यामुळे संपूर्ण देश अनेक दिवस विजेविना राहिला. अधिकाऱ्यांनी अखेरीस सेवा पुन्हा स्थापित केली, परंतु हवानासह संपूर्ण बेटावरील विविध शहरांमध्ये वीजसंकट दूर करण्यास बरेच दिवस लागले.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power outages across cuba why this unprecedented situation reason hurricanes or us sanctions print exp asj