स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावरील ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. ज्या युद्धात पाकिस्तानची दोन शकले पडली, दारुण पराभवाने ९३ हजार सैनिकांना शरणागती पत्करावी लागली, त्याची युद्धनीती त्यांनी आखली होती. चार दशकांत पाच युद्धांना ते सामोरे गेले. करड्या लष्करी शिस्तीतील जनरल मानेकशॉ प्रत्यक्षात अतिशय वेगळे होते. अधिकारी, जवानांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर या निमित्ताने नव्या पिढीसमोर येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानेकशॉ यांचे वेगळेपण काय?

सॅम मानेकशॉ हे भारताचे आठवे लष्करप्रमुख. कुठलेही आव्हान स्वीकारून ते तडीस नेणे, हेच खऱ्या सैनिकाचे लक्षण असल्याचे ते मानत. अनेक आव्हानांवर निर्भिडपणे मात करताना त्यांनी मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले. सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने रणभूमीपासून दूर राहून आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा, हे सूत्र त्यांनी ठेवले. आदेश दिल्यानंतर अंमलबजावणीचे स्वातंत्र्य सहकाऱ्यांना देऊन ते मोकळे व्हायचे. आपल्या कामात त्यांनी कधीही राजकारण्यांना हस्तक्षेप करू दिला नाही. नव्या लष्करी अभ्यासक्रमांची मुहूर्तमेढ, समान वेतन, लष्कराच्या दीर्घकालीन योजना पूर्ण करण्यासाठी संरक्षण आराखडा पंचवार्षिक योजनेशी जोडणे, लष्करातील आरक्षणाला विरोध आदींतून त्यांचा दूरदृष्टिकोन अधोरेखित झाला. अधिकारी असो वा जवान सर्वांशी ते आपुलकीने संवाद साधायचे. गंभीर जखमी अवस्थेत मिश्किलपणा कायम राखणारे, रेजिमेंटमध्ये येणाऱ्या सहकाऱ्याचे सामान स्वत: घेऊन येणारे, खासगी कामासाठी सरकारी वाहन न वापरणारे मानेकशॉ यांनी निवृत्तीनंतर सरकारने देऊ केलेले पद स्वीकारण्यास नकार देत उपकृत होणे टाळले. चार दशकांच्या सेवेत मानेकशॉ वादापासून दूर राहिले.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई इंडियन्सनी हार्दिक पंड्याला पुन्हा मिळवलेच! ‘आयपीएल’मधील ‘ट्रान्स्फर ट्रेड’ ही संकल्पना नक्की काय?

काहीशा अपघातानेच लष्करी सेवेत दाखल?

मानेकशॉ यांचे ‘सॅम बहादुर’ हे टोपण नाव. पंजाबच्या अमृतसर येथे पारशी कुटुंबात जन्म झालेल्या सॅम बहादुर यांची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जाण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र, वडिलांना मुलगा तिकडे एकटा राहण्याची खात्री नसल्याने त्यांनी अमृतसरच्या एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. परदेशात न पाठविल्याच्या रागातून ते डेहराडूनच्या भारतीय लष्करी प्रबोधिनीत दाखल झाले. भारतीय लष्करी प्रबोधिनी अर्थात आयएमएच्या पहिल्या तुकडीत ते होते. ॲथलेटिक्समध्ये आघाडीवर असणारे सॅम उत्तम टेनिसपटू होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांची लष्करी कारकिर्द सुरू झाली. ‘जंटलमन कॅडेट’ म्हणून ते उत्तीर्ण झाले. फेब्रुवारी १९३४ मध्ये शाही लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढील काळात ते चित्रकार सिल्लू बोडे यांच्याशी विवाहबद्ध झाले. दुसऱ्या महायुद्धात सॅम यांची बटालियन ब्रह्मदेशात तैनात झाली. तुकडीचे नेतृत्व करताना जपानी सैन्याशी उडालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. सॅम यांची धडाडी पाहून ब्रिटीशांनी जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड – १, लष्करी कार्यवाही – ३ (मिलिटरी ऑपरेशन) या पदावर त्यांना बढती दिली. लष्करी कार्यवाही संचालनालयात ही नियुक्ती मिळवणारे ते पहिलेच भारतीय अधिकारी ठरले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मानेकशॉ यांच्याकडे गुरखा रायफलच्या तिसऱ्या बटालियनची जबाबदारी देण्यात आली होती.

लष्करी नेतृत्वाने भूगोल कसा बदलला?

शत्रुची तयारी जोखून, अनुकूल स्थिती पाहून आखलेली युद्धनीती प्रभावी, परिणामकारक ठरते. लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांनी १९७१ मधील युद्धात भारताला निर्णायक विजय मिळवून तेच सिद्ध केले. पाकिस्तानी लष्कराकडून तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरु होते. त्यामुळे लाखोंचे लोंढे भारतात येत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी लष्करी हस्तक्षेपाशिवाय भारताकडे पर्याय नव्हता. अनुकूल स्थिती पाहून भारतीय सैन्याने ढाकापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केले. पाकिस्तानी सैन्याची पुरती कोंडी झाली. विमानतळ वा बंदर ताब्यात नसल्याने परतण्यासाठी त्यांना कुठलाही मार्ग राहिला नाही. अवघ्या १८ दिवसांत ९३ हजार पाकिस्तानी सैनिक आणि अधिकाऱ्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्यात आले. या युद्धाने सभोवतालचा भूगोल बदलला. पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. मानेकशॉ यांच्या युद्धनीतीने ते साध्य झाले. युद्धकाळात निर्णयाचे स्वातंत्र्य त्यांनी स्वत:कडे घेतले होते. पाकिस्तानी लष्कराने शरणागती पत्करली, त्या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवले. लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोरा यांना तो मान देऊन ऐतिहासिक विजयानंतरही त्यांनी सहकाऱ्यांवर विश्वास दाखवला.

हेही वाचा : विश्लेषण: यंदाच्या साखर हंगामापुढील आव्हाने कोणती?

इंदिरा गांधींशी संबंध कसे होते?

पदासाठी मानेकशॉ यांनी राजकीय नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. सरकार आपल्या योग्यतेवर लष्कर प्रमुख करेल, ती योग्यता नसल्यास करणार नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यामुळे आजारी संरक्षण मंत्र्यांना रुग्णालयात भेटण्यासही ते गेले नव्हते. निर्वासितांच्या लोंढ्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भारतीय लष्कराने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा होती. पण, स्थिती अनुकूल होईपर्यंत कारवाईला मानेकशॉ यांनी नकार देण्याचे धाडस दाखवले. यामुळे इंदिरा गांधी काहीशा नाराज झाल्याचे जाणवताच मानेकशॉ यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. अर्थात पंतप्रधानांनी तो प्रस्ताव फेटाळत युद्धाची वेळ बदलण्यास संमती दिली. १९७१ च्या युद्धातील विजय उभयतांतील सहसमन्वयाचे उदाहरण ठरले. राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व यात उभयतांनी कधी गल्लत केली नाही. दोघांनाही आपले अधिकार व मर्यादांचे भान होते. कुणाशी लढायचे हे सरकारने निश्चित करायचे, आम्ही केवळ लढायचे काम करणार, अशी मानेकशॉ यांची भूमिका होती.

हेही वाचा : IPL Retention 2024: मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या मिळाला मग रवींद्र जडेजावर अशाच व्यवहारासाठी बंदी का घालण्यात आली होती?

फील्ड मार्शल बहुमान कसा मिळाला?

१९७१ मधील युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या मानेकशॉ यांच्या कामगिरीचा गौरव ‘फील्ड मार्शल’ बहुमान देऊन करण्यात आला. ही घोषणा करताना केंद्र सरकारने हा सर्वोच्च किताब त्यांना आजीवन दिल्याचे जाहीर केले. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फील्ड मार्शल ठरले. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी मानेकशॉ यांना फील्ड मार्शलपद बहाल केले. फील्ड मार्शलचे पद आणि दर्जा यांचे प्रतीक म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना एक बेटन देण्यात आला. निवृत्तीपश्चात सरकारने देऊ केलेली पदे न स्वीकारता ते अनेक कंपन्यांमध्ये संचालक मंडळात कार्यरत झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sam bahadur movie how is the life story of field marshal sam manekshaw still inspiring today print exp css