आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. वानखेडे हे मुस्लीम नसल्याचं समितीने म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर धर्म लपवल्याचा आरोप केला होता. धर्म लपवून वानखेडे यांनी एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेतल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी तपास केल्यानंतर जात पडताळणी समितीने समीर वानखेडे हे जन्मत: मुस्लीम नसल्याचे म्हणत त्यांना क्लीनचिट दिली आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी जात पडताळणी समितीनी ९१ पानांचे आदेशपत्र जारी केलं आहे. समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रदेखील कायम ठेवले आहे. समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारलेला नाही असं समितीने स्पष्ट केलं आहे. समीर वानखेडे हे अनुसूचित जाती (महार-३७) प्रवर्गातील असल्याचे या समितीने सांगितले आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीने काढलेल्या या निष्कर्षानंतर समीर वानखेडे यांनी एक ट्वीट करून सत्यमेव जयते अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मलिक यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरवरुन समीर यांच्यावर काही धक्कादायक आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. हे आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावल्यानंतर आता नवाब मलिक यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला होता. समीर हे मुस्लीम असल्याच्या आपल्या दाव्याला समर्थन करणारे ट्विट्स मलिक यांनी केले होते.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

हा निकाहनामा समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा असून त्यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केलेला असं निकाहनामा शेअर करताना नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. या निकाहनाम्यामध्ये नवऱ्याचं नाव यापुढे समीर दाऊद वानखेडे असं लिहिलेलं दिसत आहे. तर त्या खाली नवरीचं नाव शबाना जाहीद कुरेशी असं लिहिलेलं आहे. तसेच मुलीच्या वडिलांचं नाव जाहीद कुरेशी असल्याचं या निकाह नाम्यावर लिहिल्याचं दिसत आहे. त्या खालोखाल दुसरा साक्षीदार म्हणून समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खान यांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी वानखेडेंचे काही खासगी फोटोही ट्विटरवरुन शेअर करत आपला दावा योग्य असल्याचं म्हटलं होतं.

वानखेडे काय म्हणाले होते?
वानखेडे यांच्या कथित लग्नाचे फोटो मलिक यांनी शेअर केल्यानंतर यासंदर्भात एक पत्रक जारी केलं होतं. महाराष्ट्र सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडल वर प्रकाशित केले आहेत ज्यात “समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत ‘फर्जीवडा हुआ’ असे सांगितले गेले आहे, असं म्हटलं होतं.

“याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं.

“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असं वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं होतं.

“ट्विटरवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदनीय आहे आणि माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला, माझे कुटुंब, माझे वडील आणि माझ्या दिवंगत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे,” असं वानखेडे म्हणाले होते.

“माननीय मंत्र्याकडून कोणतेही औचित्य न बाळगता वैयक्तिक, बदनामीकारक आणि निंदनीय हल्ल्यांच्या प्रकारामुळे मी दुःखी झालो आहे,” असंही वानखेडे यांनी म्हटलं होतं. नंतर हे प्रकरण जात पडताळणी समितीसमोर गेलं होतं.

समितीने पुरावे नसल्याचं म्हटलं
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे या तक्रारदार दारांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवला होता. तसेच मूळ धर्म लपवून मागासवर्गीय असल्याचे भासवले असल्याचाही दावा या तक्रारदारांनी केला होता. मात्र तक्रारदारांनी केलेल्या दाव्यासाठी ते सबळ पुरावे देऊ शकले नाहीत, असं समितीने आपला निर्णय देताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede not muslim by birth but mahar caste panel rejects nawab malik claim scsg
First published on: 13-08-2022 at 19:45 IST