Indian Prisoner Sarabjit Singh Case भारताचा हेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली. सरबजित सिंग यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या अमीर सरफराज तांबाची रविवारी (१४ एप्रिल) लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. लाहोरमधील पोलिस उपनिरीक्षकांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, बंदुकधारी सरफराजच्या घरात घुसले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले, त्यानंतर सरफराजला रुग्णालयात नेण्यात आले.

२०१३ मध्ये सरबजित सिंगचा तुरुंगवास आणि त्यानंतर झालेला मृत्यू, हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा राजनैतिक मुद्दा होता. सरफराज तांबा हा भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा संस्थापक हाफिज सईदचा जवळचा सहकारी असल्याचेही मानले जात होते. नेमके हे प्रकरण काय होते? सरबजित सिंग कोण होते? त्यांना पाकिस्तानने कैदेत का ठेवले? त्यांची हत्या कशी झाली? याबद्दल जाणून घेऊ या.

कोण होते सरबजित सिंग?

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड या गावातील रहिवासी सिंग हे भारतीय होते. ते एक शेतकरी होते. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत चुकून भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. १९९० मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक केली होती. परंतु, पाकिस्तानने नंतर ते एक भारतीय गुप्तहेर असल्याचा आणि त्यांचे खरे नाव मनजीत सिंग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर १९८९ मध्ये लाहोर आणि मुलतानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेचा कट रचल्याचा आरोप केला गेला; ज्यात १४ लोक मारले गेले होते.

सरबजित सिंग पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड या गावातील रहिवासी होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, त्यांची बहीण दलबीर कौर म्हणाली की, सरबजित सिंग यांना तुरुंगात टाकल्याच्या एक वर्षानंतर १९९१ मध्ये तिला त्याच्याकडून एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये लाहोर पोलिसांनी सरबजित यांना फसवल्याचा आरोप करण्यात आला होता. सिंग यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेविरोधात त्यांचे कुटुंब प्रदीर्घकाळापासून न्यायालयीन लढाई लढत होते. २००६ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेविरुद्ध केलेली सिंग यांची याचिका फेटाळून लावली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बंद, सिंग यांना १ एप्रिल, २००८ रोजी फाशी देण्यात येणार होती. परंतु, तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी भारताच्या क्षमायाचनेनंतर या प्रकरणाची तपासणी करण्याचा आदेश दिला. सरबजित यांना १९९१ आणि २०१३ मध्ये भारतातील त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

सरबजित सिंग यांच्या शिक्षेविरोधात त्यांच्या कुटुंबाने प्रदीर्घकाळापासून न्यायालयीन लढाई लढली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सरबजित सिंग यांची हत्या कशी झाली?

२६ एप्रिल २०१३ रोजी लाहोर तुरुंगात बंद असलेल्या इतर काही कैद्यांनी सिंह यांच्यावर प्राणघातक हल्ला केला; ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ मे २०१३ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. हल्ला का करण्यात आला याचे कारण अस्पष्ट होते. कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांच्या तक्रारीनंतर पाकिस्तानी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सरफराज आणि मुदस्सर या कैद्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. २०१८ मध्ये, पुराव्यांच्या अभावाचे कारण पुढे करत, पाकिस्तानी न्यायालयाने या दोन्ही संशयितांना निर्दोष सोडले.

भारत आणि पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या?

सरबजित सिंग यांच्या मृत्युची बातमी मिळताच, भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरबजीत यांच्या मृत्यूचे वर्णन ‘अत्यंत दुःखद’ असे केले. भारताचा एक शूर पुत्र म्हणून त्यांचा उल्लेख केला आणि म्हटले की, हे खेदजनक आहे की पाकिस्तानने त्यांच्या प्रकरणातील मानवतावादी दृष्टीकोणाकडे दुर्लक्ष केले. पंतप्रधानांनी कुटुंबासाठी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंजाब राज्य सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. याशिवाय, सरबजीतच्या मुली स्वप्नदीप कौर आणि पूनम यांना सरकारी नोकऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. या घटनेवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले, “सध्या, मी एवढेच म्हणू शकतो की हा आपल्या सर्वांसाठी मानसिक आणि भावनिक धक्का आहे.”

२ मे २०१३ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी सरबजित सिंग यांचा मृत्यू झाला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा?

ह्युमन राइट्स कमिशन ऑफ पाकिस्तान (एचआरसीपी) ने त्यावेळी हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर एचआरसीपीच्या अध्यक्षा जोहरा युसूफ यांनी एका निवेदनात म्हटले: “कारागृहातील डेथ सेलमध्ये असलेल्या सरबजीतसारख्या कैद्याला तुरुंग रक्षकांच्या माहितीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय कैद्यांकडून अशा क्रूर हल्ल्यात लक्ष्य केले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.”