Shocking Amur Falcon migration: वजनाला हलक्या असलेल्या अवघ्या १५० ग्रॅम वजनाच्या एका लहानशा पक्षाने सध्या जगभरातील पक्षीतज्ज्ञांना थक्क केले आहे. केवळ ७६ तासांत तब्बल ३,१०० किमी एवढे अंतर कापत अपापांग नावाच्या अमूर फाल्कनने जणू आकाशातील मॅरेथॉनच वेगात पूर्ण केली. मध्य भारत आणि नंतर गुजरातच्या किनाऱ्यावरून थेट अरबी समुद्रावर झेप घेत दररोज सुमारे १,००० किमी. चा प्रवास या इवल्याशा पक्ष्याने केला आणि पक्षीतज्ज्ञ चकीत झाले.

अपापांगची अभूतपूर्व कामगिरी

मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रोजेक्ट (फेज-२) अंतर्गत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (WII) तीन अमूर फाल्कनना सॅटेलाइट टॅग लावले. त्यामध्ये अपापांग (प्रौढ नर), अलंग (तरुण मादी) आणि आहू (प्रौढ मादी) यांचा समावेश होता. वैज्ञानिकांना त्यांचा स्थलांतरणाचा मार्ग, एकूणच शारीरिक ऊर्जेचा वापर, हवामानाशी जुळवून घेणे आदी वर्तन समजून घ्यायचे होते. या टॅगिंगनंतर काही दिवसांतच अपापांगने केलेली अभूतपूर्व अशी कामगिरी संशोधकांना चकीत करणारी ठरली.

अपापांगची आश्चर्यकारक झेप

सॅटेलाइट नकाशावर अपापांगचा मार्ग तेजस्वी केशरी रेषेत पाहाता येतो. मणिपूरमधून थेट मध्य भारत, गुजरात आणि त्यानंतर थेट अरबी समुद्रावर झेप अशी ही मार्गक्रमणा होती. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या जोरावर अपापांग वायुवेगानेच उडत होता. इतक्या कमी वजनाच्या पक्ष्याने इतक्या वेगात आणि एकाच दिशेने उड्डाण करणे हा शास्त्रज्ञांसाठी आश्चर्याचा धक्काच होता.

२०,००० किलोमीटर्सचा प्रवास

अमूर फाल्कन (Falco amurensis) त्यांच्या हजारो किलोमीटर्सच्या स्थलांतरासाठी जगभरात ओळखले जातात. रशिया, चीन, मंगोलिया येथील प्रजनन स्थळांवरून हे पक्षी दरवर्षी तब्बल २०,००० किलोमीटर्सचा प्रवास करून दक्षिण आफ्रिकेत पोहोचतात. त्यातील सर्वांत धोकादायक टप्पा असतो तो म्हणजे तब्बल ६,००० किलोमीटर्सची न थांबणारी अथक सागरीझेप, अरबी समुद्रावरून थेट आफ्रिका. ना किनारा, ना विश्रांती, ना अन्न. फक्त हवेमध्ये झेप, साठवलेली ऊर्जा आणि उत्क्रांतीने दिलेले अचूक दिशाभान, हीच असते त्यांची पूंजी!

समुद्रावरची सर्वात कठीण परीक्षा

अपापांग, अलंग आणि आहू हे तिघेही या जीवघेण्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. समुद्रावर कुठेही उतरता किंवा थांबता येत नाही. मोठे पक्षी उष्णतेच्या आणि भूचुंबकीय वलयांच्या मदतीने गोलाकारात फिरत उड्डाण भरतात; त्यामुळे त्यांची ऊर्जा वाचते. मात्र, अमूर फाल्कन सतत पंख फडफडवत उडतात यात त्यांची अधिक ऊर्जा खर्च होते.

अमूर फाल्कन

छोटी चूकही जीवघेणी ठरू शकते

एखादा ढगांचा पट्टा, प्रतिकूल वारा किंवा एक छोटी चूकही जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे या टप्प्याचे वर्णन ‘निसर्गाशी झुंज’ असे केले जाते. तरीही दरवर्षी हजारो अमूर फाल्कन हा प्रवास सहज पूर्ण करतात. वाऱ्यांचा पक्का अभ्यास, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि पूर्वजांपासून आलेली नैसर्गिक स्मरणशक्ती ही त्यांच्यासाठी या प्रवास जीवरक्षक पुंजीच असते.

मणिपूर: शिकारी ते संवर्धक

अमूर फाल्कनची कथा मणिपूर आणि नागालँडच्या लोकांविना पूर्णच होऊ शकत नाही. काही वर्षांपूर्वी इथे हजारोंच्या संख्येने या पक्ष्यांची शिकार होत असे. परंतु स्थानिक समुदायांनीच जनजागृती मोहीमा, गावपातळीवर संरक्षण, संशोधकांना मदत, तसेच पर्यावरणपूरक उत्सव यांच्या माध्यमातून हा नाट्यमय बदल घडवला. आता अमूर फाल्कनचे आगमन हा मणिपूरवासीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्यावर आधारित संशोधन, ट्रेकिंग आणि पर्यावरण शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

या संरक्षणामुळेच वैज्ञानिकांना अपापांगसारख्या पक्ष्यांना सुरक्षितपणे टॅग करता येते आणि त्यांचे अविश्वसनीय प्रवास नोंदवणे वैज्ञानिकांना शक्य झाले.

सॅटेलाइट स्क्रीनवर नजर खिळलेली

सध्या वैज्ञानिकांची नजर सतत स्क्रीनवर खिळलेली आहे. टॅगच्या येणाऱ्या सिग्नल्सवरून असे लक्षात आले आहे की, अपापांगने समुद्रावरील मार्गक्रमण पूर्ण केले असून तो पुढे रवाना झाला आहे. त्याचे दोन साथीदारही आफ्रिकेत यशस्वीरित्या पोहोचले. त्यांचे उड्डाण आणि झेप घेण्याची पद्धती, शारीरिक ऊर्जेचे नियोजन, हवामानाशी जुळवून घेणे याविषयी आता नवीन माहिती वैज्ञानिकांहाती येईल.

अपापांग सध्या सोमालियाच्या किनारपट्टीवर आहे. त्यानंतर हे तिघेही आफ्रिकेच्या विस्तीर्ण सवाना प्रदेशात जातील, दक्षिणेकडील हिवाळ्यात किड्यांच्या प्रचंड थव्यांवर उपजीविका करून पुन्हा पूर्व आशियात परत येतील.

अद्भुत नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक

मणिपूरच्या दऱ्यांतून उडत आफ्रिकेच्या सवानांपर्यंतचा हा त्यांचा प्रवास म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत अद्भुत नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. नकाशावर साध्या रेघांसारखा दिसणारा हा प्रवास प्रत्यक्षात सहनशक्ती, दिशाभान, हवामानाचे भान आणि उत्क्रांतीची विलक्षण ताकद यांचा अनोखा संगमच आहे. अपापांगची ३,१०० किमीची थक्क करणारी झेप हा फक्त जागतिक विक्रम नाही तर तो निसर्गाच्या अपरंपार शक्तीचा जिवंत पुरावाच आहे!