Shubhanshu Shukla return: शुभांशू शुक्ला आणि ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील त्यांच्या बरोबरचे आणखी तीन क्रू सदस्य हे जवळपास १८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहिले आहेत. या प्रवासात त्यांनी पृथ्वीभोवती २८८ वेळा प्रदक्षिणा घातल्या आहेत. काही वेळापूर्वीच शुभांशु शुक्ला यांची टीम पृथ्वीवर परतली आहे. ग्रेस नावाचे स्पेस ड्रॅगन यान आज (१५ जुलै) दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चार सदस्यांच्या क्रू सह उतरले आहे. शुक्ला आणि इतरांनाही अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस लागले असले, तरी त्यांच्या शरीरावर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचे परिणामदेखील जाणवण्याची शक्यता आहे.

शुभांशू शुक्ला यांचा अंतराळातील अनुभव

शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून संपर्क साधला होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिल्या काही दिवसांत त्यांना साधारण परिस्थितीसारखे वाटले नाही, कारण ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाशी जुळवून घेत होते. आयएसएसवरून झालेल्या संवादादरम्यान ते म्हणाले होते की, “माझ्यासाठी ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे परतल्यावर काय अपेक्षा करावी हे मला माहीत नाही. मी आशा करतो की, मला दोन्ही वेळांमधील बदल जाणवेल आणि परिस्थितीतही बदल नक्कीच जाणवेल.”

चार सदस्यांच्या ‘ॲक्सिओम-४’ क्रूमधील एकमेव कमांडर पेगी व्हिटसन यांनी यापूर्वी अंतराळात आणि आयएसएसवर प्रवास केला आहे. त्या म्हणाल्या की, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणापेक्षा अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाशी जुळवून घेणे अवघड जाते. काही लोकांना यान वर जाताना अवकाशातील हालचालींमुळे आजारपणासारखं वाटलं आणि काहींना उतारावर अस्वस्थ वाटलं.”

युरोपियन स्पेस एजन्सीचे फ्लाइट सर्जन डॉ. ब्रिगिट गोडार्ड यांनी सांगितले की, शुभांशू शुक्ला यांना सुरुवातीच्या दिवसांत स्पेस मोशन सिकनेसचा त्रास झाला. यामध्ये डोकं जड होतं, चक्कर येते. असे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे होते. यामुळे शरीराचं संतुलन आणि दिशाज्ञान प्रभावित होतं. मात्र, शुभांशू हे फायटर पायलट असल्याने त्यांना अशा गुरुत्वाकर्षणाच्या समस्यांमुळे फार अडचणी येणार नाहीत.

लॅंडिंगची पद्धत

स्प्लॅशडाउन ही एक विशेष प्रकारची लॅँडिंग पद्धत आहे. यामध्ये अंतराळयान पृथ्वीवरील समुद्रात किंवा महासागरात सुरक्षितपणे उतरवले जाते. मानवी अंतराळ मोहिमांमध्ये हे तंत्र वापरले जाते. याचा वापर नासाच्या बुध, जेमिनी, अपोलो मोहिमांमध्ये आणि स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनमध्ये केला गेला आहे. जेव्हा यान समुद्रात उतरते तेव्हा धक्का बसत नाही. यामुळे क्रूचे लॅँडिंग सुरक्षित होते. स्प्लॅशडाउनचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला जातो. यामध्ये भूगोल, हवामान, तांत्रिक पायाभूत सुविधा, आपत्कालीन बचाव सुविधा अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. स्प्लॅशडाउननंतर शुक्ला आणि त्यांच्या क्रू सोबत्यांना स्पेसएक्स रिकव्हरी व्हेईकल वापरून अंतराळयानातून बाहेर काढले जाईल.

लॅंडिंगनंतर काय?

शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात पुन्हा प्रवेश केल्यानंतर ७ दिवस निगराणीखाली रहावे लागेल. या अंतर्गत अंतराळवीरांच्या शरीराला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान अंतराळवीरांच्या अनेक वैद्यकीय चाचण्यादेखील केल्या जातात, जेणेकरून त्यांच्या शारीरिक स्थितीचे मूल्यांकन करता येईल.

महत्त्वाचे मुद्दे :

  • एअर फोर्स ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला २५ जूनला ‘ॲक्सिओम-४’ मिशनवर गेले.
  • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे हे चौथे खाजगी मानवी अंतराळ उड्डाण मिशन आहे.
  • या मोहिमेद्वारे सर्व अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ६० वैज्ञानिक प्रयोग करणार होते.
  • शुभांशू शुक्ला हे अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरले.
  • मोहिमेवर चारच देशांचे अंतराळवीर गेले होते.
  • तरीही या ६० प्रयोगांमध्ये ३१ देशांचा सहभाग होता.

आयएसएसमध्ये राहताना शुभांशू शुक्ला यांना ऑर्थोस्टॅटिकची गंभीर लक्षणे दिसून आल्याचे समोर आले होते. ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर रक्तदाब आणि हृदयासंबंधी अनेक चाचण्या केल्या जातील. सुरुवातीच्या काळात अंतराळवीरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मेंदूला कानातून मिळणाऱ्या गुरुत्वाकर्षण आणि प्रवेग माहितीमध्ये गोंधळ होतो. दीर्घकाळाच्या मोहिमांवर अशा आरोग्यासंबंधित समस्यांची तीव्रता जास्त असते.

अंतराळवीरांना रिकंडिशनिंगची आवश्यकता का असते?

अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना जाणवणाऱ्या लक्षणांना तोंड देण्यासाठी रिकंडिशनिंगची आवश्यकता असते. अंतराळवीरांना संतुलन राखण्यात, त्यांच्या नजरेला स्थिर करण्यात, उभे राहताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यांच्या मणक्यावरही परिणाम होऊ शकतो. तसंच त्यांना सामान्यपणे हालचाल करण्यातही समस्या येऊ शकतात. रिकंडिशनिंग प्रक्रियेत अंतराळवीरांना त्यांच्या हालचाल नियंत्रणात मदत करणे, उभे राहताना येणाऱ्या परिस्थितीची काळजी घेणे यांचा समावेश असतो. उड्डाणानंतरच्या दुखापती अंतराळवीरांमध्ये सामान्य आहेत. त्यापैकी जवळजवळ ९२ टक्के लोकांना अशा दुखापती होतात. नासाच्या मते, जवळपास निम्म्या दुखापती लॅंडिंगच्या एका वर्षाच्या आत होतात. दुखापतींमध्ये स्नायूंना लचक भरणे, फ्रॅक्चर होऊ शकते. अंतराळ प्रवास मणक्यावरदेखील परिणाम करतो. नासाच्या मते, अंतराळातून परतणाऱ्या जवळजवळ अर्ध्या अंतराळवीरांना डिस्क हर्निएशन असते. अंतराळवीरांना अंतराळातून परतल्यानंतर गतिशीलता किंवा लवचिकतेची समस्यादेखील असते. “इथे गुरुत्वाकर्षण नसल्याने प्रत्येक लहान गोष्टी करणे कठीण होते. पाणी पिणे, चालणे आणि झोपणे हे सर्व एक आव्हान आहे. सवय होण्यासाठी काही दिवस लागतात. मात्र, हळूहळू सर्व काही ठीक होते”, असे शुक्ला यांनी एका संवादात म्हटले होते