Premium

मेहंदीचा रंग, नवऱ्याचं प्रेम अन् ५ हजार वर्षांचा इतिहास; वाचा मेहंदी लावण्याचे खरे कारण

Why ‘Mehendi Is So Important For wedding: लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी का काढतात माहितीये? ९९% लोकांना माहिती नाही खरं कारण

This Is Why Mehendi Ceremony Is So Important For The Bride
वाचा मेहंदी लावण्याचे खरे कारण ( फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं… मेंदीचा सुगंध मनाला वेड लावून जातो, शांत करतो; तर तिचा लालभडक अन् कधी काळा कुळकुळीत रंग डोळ्यांना विलक्षण आनंद देतो. मेंदी आणि मेंदीवरचं न संपणारं प्रेम. स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारी ही मेंदी महिलांच्या अगदी जवळचा विषय. मेंदी लावणं प्रत्येक मुलीला खूप आवडतं; मग ती मॉडर्न असो किंवा मग साधीसुधी राहणारी एखादी तरुणी. मेंदीला भारतीय समाजात खूप महत्त्वाचं स्थान आहे. मेंदी स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लग्नात नवरीच्या हातावरची मेंदी किती रंगलीय हादेखील लग्नाला येणाऱ्या बहुसंख्य महिलांच्या चर्चेचा मुख्य विषय असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न, साखरपुडा, बारसं कोणताही सोहळा मेंदीशिवाय पूर्ण होतच नाही. त्यामुळेच सर्वांना आवडणारी मेंदी आर्टिफिशियल जमान्यातही आपलं अस्तित्व टिकवून आहे. नवरीच्या हातावरील मेंदीबद्दल एक अतिशय खास गोष्ट म्हणजे नवरीच्या हातावरील मेंदीमध्ये होणाऱ्या नवऱ्याचं नाव अतिशय गुप्तपणे लिहिलेलं असतं; जे वराला नंतर शोधावं लागतं. तसेच जेवढी मेंदी जास्त रंगणार तेवढं नवऱ्याचं प्रेम जास्त, असंही बोललं जातं. ही गोष्ट गंमत म्हणून केली जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का लग्नात नववधूच्या हातावर मेंदी का काढतात?, लग्नाआधी मेंदी लावण्याचं खरं कारण नक्की काय आहे?, नवरीच्या हातावर लग्नात मेंदी काढण्याची परंपरा प्रथम का सुरू झाली? याचा अर्थ काय आहे आणि इतर चालीरीतींप्रमाणे ती काळाबरोबर विकसित झाली आहे का? या लेखात आपण या लग्नविधीतील मेंदीसंदर्भात इतर अनेक श्रद्धा आणि महत्त्व तपशीलवार जाणून घेऊ.

लग्नाआधी मेंदी लावण्याचे खरे कारण नक्की काय आहे?

खरं तर लग्नाच्या वेळी वधू-वर दोघांच्याही मनामध्ये भीती आणि अस्वस्थता असते. हात आणि पायांवर मेंदी लावल्यास शरीराचे तापमान कमी होते. स्वाभाविकत: वधू-वराची अस्वस्थताही कमी होते. या कारणास्तव वधू आणि वराच्या हात आणि पायांवर मेंदी लावली जाते. पूर्वी लग्नसोहळे हे उन्हाळ्यात व्हायचे आणि उष्ण वातावरणात नववधू अन् वराला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून मेंदी लावली जायची. आता मात्र बाराही महिने लग्ने होतात आणि मेंदीही लावली जाते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

सुमारे पाच हजार वर्षांपासून शरीरावर डिझाइन तयार करण्यासाठी मेंदीचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते. काही विद्वानांचा असा दावा आहे की, मेंदीच्या वापराचे सर्वांत जुने दस्तऐवज प्राचीन भारतीय ग्रंथ आणि प्रतिमांमध्ये आढळतात; जे सूचित करतात की, एक कलाप्रकार म्हणून मेंदी प्राचीन भारतात उदभवली असावी. इतरांचा असा दावा आहे की, मेंदीने शरीर सजवण्याची प्रथा मुघलांनी बाराव्या शतकात भारतात आणली होती. शास्त्रात मेंदीला १६ श्रृंगारांपैकी एक मानले जाते. मेंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ‘मेंदी’ हा शब्द ‘मेंधिका’ या संस्कृत शब्दापासून आला आहे; जो थेट मेंदीच्या रोपाला सूचित करतो. मेंदीचा वापर वैदिक युगापूर्वीचा आहे. ममीफिकेशनमध्ये मेहंदी वापरल्या जात असल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. ममीफिकेशन म्हणजे मृत शरीराला एका विशेष प्रक्रियेत जतन करण्याची प्रक्रिया. मेहंदीची सर्वात जुनी चिन्हे इजिप्शियन ममीमध्ये दिसतात, ज्यांचे केस आणि नखे मेंदीच्या लाल-तपकिरी रंगाचे आढळतात. तसेच, असे मानले जाते की सुंदर राजकुमारी, क्लिओपात्राने तिचे शरीर रंगविण्यासाठीही मेहंदी वापरली होती.

रंग दर्शवतो नात्यांमधील दृढता अन् जिव्हाळा

सजले रे क्षण माझे मेंदीने… आपल्या घरातील लग्नांमध्ये अशी गाणी नसतील, तर लग्नमंडप अगदी सुना सुना वाटतो. लग्नविधीच्या वेळी नवरीच्या हातावर मेंदी काढणं हा आता विधी राहिलेला नाही; तर दोन मनांचं मिलन बनवणारा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला आहे. मेंदीच्या सुवासाप्रमाणेच सर्व आयुष्य अशाच सुगंधानं दरवळून जावं हा त्यामागे खरा उद्देश. त्यामुळे नवरीच्या हातावरील मेंदी सर्वांत सुंदर दिसणं गरजेचं आहे. त्यामुळेच पूर्वी नवरीच्या हातांवर चार ठिपक्यांची मेंदी ते आता काळाबरोबर मेंदी विकसित झाली. आता ब्रायडल मेंदी, पोर्ट्रेट मेंदी, फेअरीटेल डिझाईन, रजवाडी मेंदी, वरमाळा मेंदी डिझाईन, प्रपोजल डिझाईन. मेंदी नात्यांमधील दृढता आणि जिव्हाळा वाढवते, असं म्हटलं जातं. मेंदीच्या रंगात आणि सुगंधात कामोत्तेजक गुणधर्म असतात; जे लग्नानंतर नवविवाहित जोडप्याला जवळीक वाढवण्यास मदत करतात. त्यासोबतच वधू-वरांना लावल्या जाणाऱ्या मेंदीमध्ये लवंग आणि निलगिरीचे तेल यांसारखे घटक मिसळले जातात. त्यामुळे त्यातील औषधी गुणधर्म दुर्गंधी आणि संसर्ग टाळण्यास प्रभावीपणे मदत करतात.

लग्नाआधी किती दिवस आधी मेंदी काढावी?

सध्या सगळीकडे लग्नाचे वातावरण सुरू आहे. अशात आता लग्न म्हणजे एक मोठा सोहळाच झाला आहे. हा सोहळा आता चार दिवस आधीच सुरू होतो. त्यामध्ये नवरीनं मेंदी नेमकी कधी काढावी, ती लग्नाच्या किती दिवस आधी काढावी असे प्रश्न सगळ्याच मुलींना पडतात. आम्ही मेंदी कलाकाराकडून या संदर्भात माहिती घेतली असता त्यांनी, नवरीनं लग्नाच्या आदल्या दिवशी नाही, तर लग्नाच्या दोन दिवस आधी मेंदी काढावी, असं सांगितलं. यामागचं कारण म्हणजे दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी मेंदीचा रंग हातावर अधिक खुलतो.

काळाबरोबर विकसित झालेली मेंदी

मेंदीची झाडे आठ ते १० फुटांची असतात. विशेषत: उष्ण हवामान असणाऱ्या देशांत ही झाडं मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यात भारत, इराण, पाकिस्तान, सीरिया या देशांचा समावेश होतो. आता जरी बाजारात तयार मेंदीचे कोन मिळत असले तरी पूर्वी मात्र मेंदीची पानं सुकवून तिची भुकटी केली जायची. मग त्यामध्ये कात, चुना व पाणी टाकून हे मिश्रण किमान दिवसभर भिजवलं जायचं आणि रात्री हातांवर मेंदीची नक्षी काढली जायची. आज मिळणाऱ्या रेडीमेड कोनामुळे मेंदी भिजवण्याची ही मेहनत वाचली आहे.

हेही वाचा >> भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात? 

राजस्थान सोजत

मेहंदीसाठी राजस्थानमधील सोजत हे ठिकाण प्रसिद्ध असून, तिथे जगातली सगळ्यात मोठी मेंदीची बाजारपेठ आहे. त्यामुळे मेंदी नगरी म्हणूनच हे ठिकाण ओळखलं जातं. या ठिकाणाहून जगभरात १०० पेक्षाही अधिक देशांमध्ये मेंदीची निर्यात केली जाते. भारतातले अनेक मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्या विवाहसोहळ्यात सोजत येथूनच मेंदी मागविण्यात येते. राजस्थानी मेहंदी म्हणून ही मेंदी ओळखली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The history of bridal mehandi how the tradition came to be why mehendi is applied to the bride and groom before marriage what is the truth behind this ritual srk

First published on: 04-12-2023 at 14:08 IST
Next Story
इंजेक्शन हातावर किंवा कंबरेवरच का दिले जाते? इंजेक्शनचे प्रकार कोणते? जाणून घ्या डॉक्टरांकडून…