संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दि. २८ मे रोजी संसदेतील एका भित्तिचित्राचे ट्वीट केले आहे. हे भित्तिचित्र प्राचीन भारताच्या भूभागाचे प्रतिनिधित्व करत आहे. यानिमित्ताने फाळणीपूर्व असणाऱ्या भारताच्या सीमारेषा, अखंड भारताचा इतिहास आणि या चित्रातून काय सूचित होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दि. २८ मे रोजी संसदेतील एका भित्तिचित्राचे ट्वीट केले आहे. हे भित्तिचित्र आधुनिक भारतातील भौगोलिक सीमांचे नाही, तर प्राचीन भारताच्या भूभागाचे चित्रण करते. या ट्वीटमध्ये कन्नडमध्ये लिहिलं आहे की, 'संकल्प स्पष्ट आहे - अखंड भारत.' त्यांच्या ट्वीटचा अर्थ सांगताना ते म्हणाले की, '' 'अखंड भारत' ही संकल्पना प्राचीन भारतीय संस्कृतीतून आली आहे. आताचे नवीन संसद भारताच्या प्रत्येक संस्कृतीचे, क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे आहे.'' या भित्तिचित्रामुळे काही राजकीय वाद निर्माण होत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या चित्राबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी या चित्रामुळे पुन्हा राजनैतिक वाद निर्माण होतील, असे सांगितले आहे, असे 'पीटीआय'ने वृत्त दिले आहे. संसदेमधील या भित्तिचित्राबद्दल शुक्रवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, 'अखंड भारता'चे भित्तिचित्र हे अशोक साम्राज्याचा प्रसार आणि त्याने (अशोक) स्वीकारलेल्या आणि प्रसारित केलेल्या जबाबदार आणि लोकाभिमुख शासनाची कल्पना दर्शवते.'' संसदेतील प्रशस्त स्वागतकक्षातील १६ कोपऱ्यांमध्ये १६ भित्तिचित्रे आहेत. त्यातील काही भित्तिचित्रे ही भारतीय ऋषी, प्राचीन ग्रंथ, रामायण, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहेत. हेही वाचा: विश्लेषण : श्वेतक्रांतीची कल्पना युरोपची की भारताची ? मिल्क पावडरला कारण ठरली श्वेतक्रांती ? अखंड भारत आजच्या अफगाणिस्तान ते म्यानमार आणि तिबेट ते श्रीलंकेपर्यंत पसरलेल्या भूभागाला व्यापून, रामायणाच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या भारतीय राष्ट्राची रा. स्व. संघ परिवाराने दीर्घकाळ कल्पना केली आहे. रा. स्व. संघ संचालित सुरुची प्रकाशनाने 'पुण्यभूमी भारत' नावाचा नकाशा प्रकाशित केला होता. या नकाशानुसार प्राचीन भारतात अफगाणिस्तानला 'उपगनाथन', काबुलला 'कुभा नगर', पेशावरला 'पुरुषपूर', मुलतानला 'मूलस्थान', तिबेटला 'त्रिविष्टप', श्रीलंकेला 'सिंहद्वीप' आणि म्यानमारला 'ब्रह्मदेश' म्हणून ओळखले जात असे.१९४४ मध्ये मुस्लीम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी दबाव आणला. इतिहासकार राधा कुमुद मुखर्जी यांनी 'अखंड भारत परिषदेत' दिलेल्या अध्यक्षीय भाषणात प्रथम अखंड भारताची कल्पना मांडली."…हिंदूंची मातृभूमी त्यांच्या इतिहासाच्या सहस्राब्दींपासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, नांगा पर्वत (हिमालयातील पर्वत रांगा) आणि अमरनाथपासून मदुराई आणि रामेश्वरमपर्यंत आणि द्वारकापासून पुरीपर्यंत पसरलेल्या भूमीपेक्षा जास्त आहे,'' असे मुखर्जी म्हणाले. अखंड भारताची रचना भौगालिक वस्तुस्थिती आहे, जी सीमारेषांनी आखलेली आहे. या सीमारेखांकनाबाबत कोणतीही शंका किंवा अनिश्चितता नाही. हेही वाचा: ‘द केरला स्टोरी’मधील ‘त्या’ वाक्याला आहेत धार्मिक आधार; काय सांगतात प्रत्येक धर्मातील प्रथा रा. स्व. संघाच्या संकल्पनेत अखंड भारत २०१५ मध्ये, रा. स्व. संघाचे नेते राम माधव यांना पाकिस्तान आणि बांग्लादेश भारताचा भाग म्हणून दाखवलेल्या नकाशाबद्दल विचारले असता त्यांनी अल जझिरांना सांगितले की, ६० वर्षांपूर्वी काही कारणांमुळे भारताचे विभाजन झाले. परंतु, रा. स्व. संघाला अजूनही विश्वास आहे की, एके दिवशी विभाजित झालेले आपले प्रदेश सद्भावनेने परत एकत्र येतील आणि यातून अखंड भारताची निर्मिती होईल.तसेच, रा. स्व. संघाच्या मते, अखंड भारत ही कोणतीही राजकीय कल्पना नाही. ती सांस्कृतिक संकल्पना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या फाळणीनंतर लगेचच भारताला पुन्हा एकत्र येण्याची विनंती केली. २४ ऑगस्ट, १९४९ रोजी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दुसरे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर गुरुजी म्हणाले होते की, ''शक्य होईल तितके, या दोन विभाजित राष्ट्रांना एकत्र करण्यासाठी आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत. या झालेल्या फाळणीमुळे कोणीही आनंदी नाही.'' याच भाषणाची पुनरावृत्ती त्यांनी ७ सप्टेंबर, १९४९ रोजीच्या कोलकाता येथे केलेल्या भाषणात केली.१७ ऑगस्ट, १९६५ रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपच्या पूर्ववर्ती भारतीय जनसंघाने एक ठराव संमत केला - 'भारताचे राष्ट्रीयत्व, भारताच्या परंपरा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मुस्लीम लोक स्वतःला राष्ट्रीय जीवनाशी जोडून घेतील. सर्व एकत्र येऊन पुन्हा अखंड भारताची निर्मिती करू. सर्व भेद नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना जोपासू.रा. स्व. संघाचे लोकप्रिय नेते एस. डी. सप्रे यांनी आपल्या आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ''आपण आपल्या घरात अखंड भारताचा नकाशा ठेवला पाहिजे. त्यामुळे अखंड भारताचे ध्येय आपल्यासमोर कायम असेल. अखंड भारताचा नकाशा आपण आपल्या हृदयात कोरला तर विभाजित भारत बघितल्यावर आपल्याला दुःख होईल. त्यामुळे अखंड भारत घडवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळेल.''रा. स्व. संघाचे सरकार्यवाह आणि दिवंगत नेते एच. व्ही. शेषाद्री यांनी लिहिलेले की, विभाजित होणारे प्रदेश ही फाळणी रद्द करण्याची भूमिका घेतील. पाकिस्तान आणि बांगलादेशबाबत ही शक्यता नाकारता येत नाही. भाजपाची भूमिका रा. स्व. संघाप्रमाणे भाजपा नेते बोललेले दिसत नाहीत किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारची तशी भूमिकाही दिसत नाही. मात्र, भाजपा नेते आपल्या राजकीय भाषणांमधून अखंड भारताचा उल्लेख करताना दिसतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या संदर्भात आणि सरदार पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करताना 'अखंड भारत' चा उल्लेख केलेला होता. परंतु, स्वतंत्र भारताच्या प्रादेशिक अखंडतेसाठी त्यांनी हा संदर्भ वापरलेला. २०२१ मध्ये नांदेड येथे भाषण देताना अमित शाह म्हणाले की, “…देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारतरत्न सरदार पटेल यांनी चिकाटी, शौर्य आणि त्यांच्या नापाक हेतूंचा पराभव करून हा प्रदेश अखंड भारताचा भाग बनवण्यात यश मिळवले होते. हे त्यांचे धोरणात्मक कौशल्य आहे."२०२२ मध्ये राहुल गांधी यांनी चालवलेल्या 'भारत जोडो' यात्रेची खिल्ली उडवताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की,'' पाकिस्तान आणि बांगलादेश यांना जोडण्याचा प्रयत्न करा. अखंड भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.''२०१४ मध्ये गुजरातमधील भाजपा सरकारने रा. स्व. संघाचे नेते दीनानाथ बत्रा यांचे 'तेजोमय भारत' हे पुस्तक सरकारी शाळांमध्ये वाचण्याकरिता दिले होते. 'तेजोमय भारत' पुस्तकात 'अखंड भारत' नावाचा एक अध्याय आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका अशा एकत्रित अखंड भारताविषयी माहिती आहे.