Viral Emotional Wildlife Video Tigress Who Revived Achanakmar Tiger Reserve: सध्या देशभरात सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. आपली कूस उजवून या विश्वाला जिवंत केलं त्या जगत् जननीचा या नऊ दिवसात जागर केला जातो. खरंतर हा जागर एकट्या आदिशक्तीचा नाही, तर तिच्या शक्तीचा वास असणार्या प्रत्येक मातेचा आहे, जिने आपल्या रक्ताचं पाणी करून सृजनाला हातभार लावला. माता आहेत म्हणून, या विश्वाचा गाडा सुरु आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत मातेला अग्रस्थान आहे. याच मातृत्त्वाचा गौरव करणारा एक क्षण आचनकमार अभयारण्यात टिपला गेला. कॅमेरात टिपल्या गेलेल्या व्हिडीओने वनाधिकाऱ्यांचेही डोळे भरून आले आणि पुन्हा एकदा मातेच्या अस्तित्त्वाचे महत्त्व विशद झाले!
वाघिणीचा ४०० किलोमीटर्सचा प्रवास
ही गोष्ट फक्त एका क्षुल्लक प्राण्याची नाही. तर, अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या वाघिणीची आहे, या वाघिणीचं नाव झुमरी. २०१८ साली झुमरी अनेक जंगलं, डोंगराळ भाग आणि मानवी वस्ती पारकरून छत्तीसगडच्या आचनकमार व्याघ्र प्रकल्पात येवून पोहोचली. या वाघिणीने मध्यप्रदेशातील बांधवगडपासून अचनकमारपर्यंत तब्बल ४०० किलोमीटर प्रवास केला. तिचा प्रवेश या अभयारण्याच्या संवर्धनाच्या इतिहासाला एक चांगली कलाटणी देणारा ठरला. साल व बांबूच्या हिरव्या सळसळत्या जंगलांमध्ये पाय रोवणाऱ्या झुमरीने तिथल्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला नवसंजीवनी दिली.
मातेची किमया; वाघांची संख्या वाढली
आज आचनकमार व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे, ती केवळ झुमरीमुळे. २०२२ साली केवळ ५ वाघ या अभयारण्यात होते. आता ती संख्या वाढून १८ झाली आहे, त्यात १० प्रौढ आणि ८ पिल्लं आहेत. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यशामध्ये झुमरीच्या आगमनानंतर केलेल्या संवर्धन उपाययोजनांचा सिंहाचा वाटा आहे. यात तातडीच्या उपाययोजनांत गस्त वाढवणे, निरीक्षण करणे यांसारख्या गोष्टी समाविष्ट होत्या, तर दीर्घकालीन उपायांमध्ये कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती आणि विशाल ‘सुपर गवताळ प्रदेश’ उभारणे यांचा समावेश होता.
जंगल आणि झुमरीचा समांतर प्रवास
आचनकमार मध्यप्रदेशातील कान्हा आणि बांधवगड अभयारण्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आहे. छत्तीसगडमधील तीन व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला आचनकमार, वन्यजीवांच्या हालचालींना आधार देणाऱ्या या कॉरिडॉर नेटवर्कचा मध्यवर्ती दुवा मानला जातो.
…तेव्हा वाघांचं अस्तित्वही धोक्यात होतं
२०१८ साली या अभयारण्यात झुमरी आली, तेव्हा आचनकमार अभयारण्य वाघांच्या संख्येत सातत्याने होणारी घट या समस्येशी झुंजत होते. WWF-India ने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षे इथल्या वाघांची संख्या पाचवरच थांबलेली होती. “जगणं, पुनरुज्जीवन तर दूरच, त्यांचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आहे असं वाटत होतं,” असा अनुभव एका वनअधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितला.
मात्र, झुमरीच्या आगमनाने सगळं चित्रच बदललं. तरी तिचं आयुष्य इथे संघर्षमुक्त नव्हतं. २०२१ साली तिच्या एका पिल्लाचा एका नर वाघाने बळी घेतला. परंतु, २०२३ साली तिने आणखी दोन पिल्लाना जन्म दिला. स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या सातत्यपूर्ण निरीक्षणाच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आले. पंधरा वर्षांत आचनकमारमध्ये असा पराक्रम करणारी ती पहिली वाघीण ठरली. तिच्या मातृत्त्वाने या अभयारण्यातील वाघांच्या संख्येत भर पडली.
हृदयाला स्पर्श करणारा क्षण; मातृत्त्वाचा सोहळा
आचनकमारच्या घनदाट जंगलात या वर्षी एक हृदयाला स्पर्श करणारा क्षण टिपला गेला. झुमरीने तिसऱ्यांदा पिल्लांना जन्म दिला आहे. तिसऱ्या प्रसूतीत तिने चार निरोगी पिल्लांना जन्म दिला, जंगलात बसवलेल्या कॅमेऱ्या ट्रॅप्सनी (camera traps) ते क्षण टिपले आहेत. हे फक्त एक निसर्गदृश्य नव्हते, तर अभयारण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा प्रसंग होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आचनकमारमध्ये एकावेळी इतक्या प्रजननक्षम वाघिणी दिसू लागल्या आहेत. जंगलातील शांततेत आता पुन्हा एकदा लहानग्या वाघांची डरकाळी ऐकू येत आहे. सध्या झुमरीसह इथे पाच नर, चार वाघिणी (सर्व प्रजननक्षम), एक नवीन प्रौढ (ज्याचं लिंग अजून निश्चित झालेलं नाही) आणि आठ पिल्लं आहेत.
संवर्धनाचा नवा सूर्योदय
एकेकाळी वाघांची संख्या हातावर मोजावी लागणाऱ्या या जंगलात आता नवं आयुष्य फुलू लागलं आहे. संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून झुमरी आज आचनकमारची अभिमानकथा ठरली आहे. झुमरीचा प्रवास आणि तिच्या लहानग्यांची धमाल केवळ जंगलाच्या समृद्धतेचं द्योतक नाही, तर निसर्गाशी पुन्हा एकदा जवळीक साधणाऱ्या आपल्या प्रयत्नांचं जिवंत उदाहरण आहे.
संवर्धनातील क्रांती
झुमरीच्या आगमनाने आचनकमारमधील संवर्धन उपाययोजनाच पालटल्या. संवेदनशील भागात गस्त वाढली, Geographic Information System (GIS) आधारित अग्नि व्यवस्थापन प्रणाली आणली गेली आणि स्थानिक लोकांना सामावून घेत संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न झाला. जेणेकरून झुमरी आणि तिची पिल्लं सुरक्षित राहावीत.
तंत्रज्ञानाचा मोठा वाटा
यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा होता. कृत्रिम पाणवठ्यांना जिओटॅग करून उन्हाळ्यात ते वेळोवेळी भरून ठेवले गेले, जेणेकरून वाघांना गावाकडे वळावं लागू नये. वनरक्षकांना वाघांचे फोटो घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं आणि M-STrIPES या प्रणालीद्वारे गस्त घातली गेली. २०२३ पासून केंद्रीय डिजिटल कमांड सेंटरमार्फत गस्त, आगीची सूचना, पाणीपुरवठा यांचा डेटा थेट डॅशबोर्डवर दिसू लागला. याचबरोबर समाजाभिमुख उपक्रम राबवले गेले. महुआ गोळा करणाऱ्यांना झाडं जाळू नये यासाठी समजावलं, अग्निरोधक सभा घेतल्या, जनावरांची लसीकरण शिबिरं झाली. आदिवासी तरुणांना GIS, रिमोट डेटा संकलन, कॅमेर्याचं निरीक्षण याचं प्रशिक्षण दिलं गेलं. मानव-वन्यजीव संघर्ष झाल्यास गावकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत व नुकसानभरपाई देण्यात आली. आजपर्यंत २२७ प्रकरणांत तब्बल २७.३४ लाख रुपये देण्यात आले आहे. स्थानिक आदिवासी कलाकारांच्या माध्यमातून जंगलात सहजीवनाचा संदेश दिला गेला.
दीर्घकालीन दृष्टी
वनविभागाने ‘सुपर गवताळ प्रदेश’ निर्मितीला सर्वात महत्त्वाचं पाऊल मानलं आहे. यासाठी १९ गावांचं पुनर्वसन करण्याचा आराखडा आखला गेला असून आतापर्यंत आठ गावांनी सहमती दिली आहे. २००९ पासून सहा गावं हलवली गेली आहेत आणि आणखी तीन गाव पुनर्वसन प्रक्रियेत आहे. जलस्रोत सुधारणा तसेच राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांसाठी १० वर्षांचा संवर्धन आराखडा केंद्राला पाठवण्याची तयारी सुरू आहे. या आराखड्यात कोअर, बफर, लगतचा परिसर, सुरक्षा आणि इको-पर्यटन असे पाच घटक आहेत. पर्यटन वाढवण्यासाठी अभयारण्यात नवीन गेट्स, रिसॉर्ट्स व वाहने यांचा दर्जा सुधारण्याची योजना आहे.
जंगलाचा नव्या जीवनाकडे प्रवास
आज आचनकमार हे तंत्रज्ञान, परंपरा आणि लोकांचा विश्वास यांना जोडणाऱ्या संवर्धनाचा आदर्श ठरले आहे. या अभयारण्याचे उपसंचालक यू. आर. गणेश यांच्या शब्दांत “पाच वाघांवरून आज खेळकर, बळकट पिल्लांच्या समुहात आचनकमारचा प्रवास म्हणजे हे जंगल पुन्हा जिवंत झाल्याचा पुरावा आहे.” गणेश पुढे म्हणाले, “झुमरीची चार पिल्लं ही फक्त जिवंत राहण्याचं प्रतीक नाहीत, तर पुनर्जन्माचं प्रतीक आहेत. एकेकाळी संघर्ष करणारी एकाकी वाघीण आज एका वाढत्या वाघकुलाची माता झाली आहे. ही केवळ एका प्राण्याच्या जिद्दीची कहाणी नाही, तर संपूर्ण लँडस्केपच्या पुनरुज्जीवनाची कथा आहे, हे केवळ तंत्रज्ञान, विश्वास आणि टीमवर्कमुळे शक्य झाले आहे.”