अमेरिकेमध्ये मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्षांच्या निवडीसाठी, तसेच अमेरिकी काँग्रेसमधील सेनेट आणि प्रतिनिधिगृहातील काही जागांसाठी मतदान होत आहे. तसेच काही राज्यांमध्ये गव्हर्नर निवडीसाठीही मतदान होत आहे. त्या दृष्टीने मंगळवार हा ‘सुपर ट्यूसडे’ ठरणार आहे. अर्थातच या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी अध्यक्षीय निवडणूकच ठरेल. अमेरिकाच नव्हे, तर साऱ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडेच असेल. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, तसेच विद्यमान राष्ट्र उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात मुख्य लढत आहे. जो बायडेन यांनी माघार घेतल्यामुळे कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली. पण तरीही ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस आहे. दोघांनाही बहुतेक सर्व जनमत चाचण्यांनी विजयाची समसमान संधी दिली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिक निवडणूक

अध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. कमला हॅरिस निवडून आल्या तर त्या अध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. अमेरिकेचे पहिले गौरेतर अध्यक्ष बनण्याचा मान बराक ओबामा यांनी यापूर्वीच मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर ते या पदावर निवडून येणारे सर्वांत वयस्कर अध्यक्ष ठरतील. तसेच दोन वेगवेगळ्या टर्ममध्ये निवडून येणारे ते ग्लोव्हर क्लीव्हलँड यांच्यानंतरचे दुसरे अध्यक्ष ठरतील. ग्रोव्हर क्लीव्हलँड हे १८८५-१८८९ आणि १८९३-१८९७ असे दोन कार्यकाळ अध्यक्ष होते, परंतु सलग दोन टर्म अध्यक्ष नव्हते. त्यामुळे एकच व्यक्ती असूनही त्यांना २२वे आणि २४वे अध्यक्ष म्हणून संबोधले जाते. ट्रम्प निवडून आल्यास त्यांना ४५वे आणि ४७वे अध्यक्ष असे संबोधले जाईल.

हेही वाचा >>> कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?

‘इलेक्टोरल’ वि. ‘पॉप्युलर’ मते…

५० राज्ये आणि वॉशिंग्टन डी. सी.मधील मतदार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी मतदान करतात. पण ही निवड थेट नसते. प्रत्येक राज्यात दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर असतात. त्यांची संख्या ठरलेली असते. एकूण ५३८ प्रातिनिधिक किंवा इलेक्टोरल मते असतात. यात २७० मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित होतो. दोन्ही उमेदवारांना २६९ मते मिळाली, तर अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहातील विद्यमान संख्याबळानुसार अधिक जागा असलेल्या पक्षाचा उमेदवार विजयी ठरतो. अमेरिकेतील ४८ राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये प्रातिनिधिक मतांचा विचार होतो. पण नेब्रास्का आणि मेन ही दोन राज्ये यास अपवाद आहेत. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून लोकप्रिय मते अधिक मिळवणाऱ्या उमेदवारास त्या जिल्ह्याचे प्रातिनिधिक मत मिळते. गत निवडणुकीत नेब्रास्कातील ५ पैकी १ मत जो बायडेन यांना, तर उरलेली ४ ट्रम्प यांना मिळाली. याउलट मेन राज्यात बायडेन यांना ४ पैकी ३ प्रातिनिधिक मते मिळाली, तर चौथे प्रातिनिधिक मत ट्रम्प यांना मिळाले.

हेही वाचा >>> चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?

अधिक मते मिळाली तरी…

एखाद्या उमेदवाराला सर्वाधिक लोकप्रिय मते मिळतात, त्या राज्यातील सर्वच्या सर्व प्रातिनिधिक किंवा इलेक्टोरल मते त्या उमेदवाराला बहाल होतात. या पद्धतीला ‘विनर टेक्स ऑल’ असे संबोधले जाते. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत एका उमेदवाराला संपूर्ण अमेरिकेत मिळून लोकप्रिय मते अधिक मिळाली, तरी तो जिंकेलच असे नाही. कारण इलेक्टोरल मतांवर अध्यक्ष ठरतो. तेथील इतर सर्व निवडणुकांमध्ये (सेनेट, प्रतिनिधिगृह, गव्हर्नर) लोकप्रिय मते निर्णायक ठरतात. अध्यक्षीय निवडणूक यास अपवाद असते. २०२०मध्ये जो बायडेन यांना ३०६ इलेक्टोरल मते मिळाली. तर डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ इलेक्टोरल मते मिळाली आणि अर्थातच बायडेन ३६ इलेक्टोरल मतांनी विजयी ठरले. कारण विजयासाठी २७० इलेक्टोरल मते पुरेशी असतात. त्या निवडणुकीत बायडेन यांना ८.१ कोटी मते मिळाली, तर ट्रम्प यांना ७.४ कोटी मते मिळाली. पण २०१६मधील निवडणूक लक्षणीय ठरली. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा लोकप्रिय मते कमी मिळाली. पण अधिक इलेक्टोरल मतांच्या जोरावर ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. ट्रम्प यांना ३०४, तर क्लिंटन यांना २२७ इलेक्टोरल मते मिळाली. पण ट्रम्प यांना (६.२९ कोटी) क्लिंटन यांच्यापेक्षा (६.५८ कोटी) लोकप्रिय मते कमीच मिळाली होती. याचे कारण सर्व ५० राज्ये आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये मिळून अधिक मतदारांनी हिलरींना मते दिली. पण या मतांऐवजी ट्रम्प यांची इलेक्टोरल मते निर्णायक ठरली. विनर टेक्स ऑल या नियमाप्रमाणे हिलरी यांना एखाद्या राज्यात ४५ टक्के मते मिळाली आणि दुसऱ्या राज्यात ७५ टक्के मिळाली तर मते अधिक दिसतील. पण त्या जिंकल्या त्या राज्याची इलेक्टोरल क्षमता कमी असेल आणि याउलट ट्रम्प जिंकलेल्या राज्याची इलेक्टोरल क्षमता अधिक असेल, तर अधिक मते मिळूनही हिलरी या इलेक्टोरल शर्यतीत मागे पडतात.

अमेरिकेतील ‘उत्तर प्रदेश’, ‘महाराष्ट्र’…

कॅलिफोर्निया राज्यात सर्वाधिक ५४ इलेक्टर आहेत. त्याखालोखाल टेक्सास राज्यात ४० इलेक्टर आहेत. या राज्यांतील मते अर्थातच निर्णायक ठरतात. फ्लोरिडा राज्याला ३० मते आहेत. आपल्याकडील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांप्रमाणेच अमेरिकेतही अधिक जागा असलेल्या राज्यांचे महत्त्व आहेच. पण तेथे राजकीय कल बहुतांश ठरलेला असतो. कॅलिफोर्निया सहसा डेमोक्रॅट्सनाच निवडून देते. त्यामुळे त्यांची ५४ मते ठरलेली असतात. मात्र टेक्सास आणि फनलोरिडा सहसा नेहमीच रिपब्लिकन पक्षाला पसंती देतात. त्यामुळे त्यांचीही ७० मते ठरलेली असतात. अशी विभागणी अमेरिकेत अनेक राज्यांच्या बाबतीत असते. त्यामुळेच स्विंग स्टेट्स म्हणजेच कोणत्याही विशिष्ट पक्षाला गेल्या काही निवडणुकांत कौल न देणारी राज्ये महत्त्वाची ठरतात.

सात राज्ये अध्यक्ष ठरवणार?

सध्याच्या गणितानुसार डमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलोक्टोरल आणि ट्रम्प यांना २१९ इलेक्टोरल मते मिळतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हॅरिस यांना ४४ आणि ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे. यासाठी पेनसिल्वेनिया (१९), व्हिस्कॉन्सिन (१०), मिशिगन (१५), जॉर्जिया (१६), नॉर्थ कॅरोलिना (१६), अॅरिझोना (११) आणि नेवाडा (६) ही ९३ मते निर्णायक ठरणार आहेत. ही राज्ये स्विंग स्टेट किंवा बॅटलग्राउंड स्टेट म्हणून ओळखली जातात. कारण ती कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकतात. या बहुतेक राज्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बदलता आणि संमिश्र कौल देऊन स्विंग स्टेट म्हणून ओळख निर्माण केली आहे. गेल्या खेपेस बायडेन यांनी पेनसिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन, मिशिगन, जॉर्जिया, अॅरिझोना ही राज्य खेचून आणली आणि निवडणूक जिंकली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tough contest between donald trump and kamala harris in us presidential election 2024 print exp zws