आसिफ बागवान
संगणकीय क्षमतेचे विशेषत: बुद्धिमत्तेचे मानवीकरण करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, डीप लर्निग किंवा सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी हे सर्व त्या प्रयत्नांचाच भाग. एखाद्या प्रश्नाचे उत्तर वेगाने आणि अचूकपणे शोधण्याची इंटरनेट आणि संगणकाची क्षमता अमानवी आहे. मात्र, योग्य उत्तर किंवा समाधान कोणते, हे ठरवण्याचा तर्क किंवा विवेकबुद्धी मानवाच्याच ठायी असते. ही सतर्कता तंत्रज्ञानानेही अवगत केल्याचे दावे चॅट-जीपीटीच्या शोधानंतर केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, चॅट जीपीटीसारख्या अतिप्रगत चॅटबॉटचा वापर इंटरनेटवरील शोधाकरिता अर्थात ‘सर्च इंजिन’मध्ये करण्याचा निर्णय हा क्रांतिकारक असल्याचे ठासून सांगितले जात आहे. यामागील तथ्य शोधण्याचा प्रयत्न..
‘सर्च इंजिन’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा?
गेल्या अनेक वर्षांत सर्च इंजिनच्या शोधक्षमतेत आणि अचूकतेत सातत्याने वाढ झाली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा मोठा वाटा आहे. सर्च इंजिन चालवणाऱ्या सर्वच कंपन्यांनी या प्रोग्रॅममध्ये ‘एआय’चा अंतर्भाव केला आहे. त्याद्वारे शोध परिणामांचा क्रम ठरवणे, शोधकर्त्यांची भाषा आणि शब्द ओळखून त्याद्वारे योग्य परिणाम शोधणे, शोधकर्त्यांच्या आधीच्या ‘सर्च’च्या अनुषंगाने त्यांची छाननी करणे अशा अनेक गोष्टी ‘एआय’मुळे क्षणार्धात करणे शक्य झाले आहे.
चॅट जीपीटी किंवा चॅट बॉटमुळे काय बदल होतील?
चॅट जीपीटी किंवा अन्य चॅट बॉट हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे सर्वात प्रगत अवतार आहेत. कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर वेगात शोधताना हे तंत्रज्ञान ‘तर्कबुद्धी’चाही वापर करते. ‘सर्च इंजिन’मध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्याने एखाद्या गोष्टीचा इंटरनेटवरून शोध घेणे अधिक सोपे होईल. पारंपरिक सर्च इंजिनप्रमाणे एका प्रश्नाच्या उत्तरात शेकडो ‘लिंक्स’ दर्शवण्याऐवजी ‘सर्च इंजिन’ अचूक उत्तर दर्शवतील. याचा फायदा शेअरचे अचूक आकडे, सामन्यांचे निकाल, तापमान जाणून घेण्यासाठी होईल. अभ्यासक्रमातील एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधणेही या माध्यमातून सहजशक्य आहे.
‘सर्च इंजिन’मध्ये कोणाची बाजी?
चॅट जीपीटी तंत्रज्ञानाने गेल्या तीन-चार महिन्यांत इंटरनेट विश्वाला भारून टाकले आहे. हे तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या शोधाइतके क्रांतिकारी असल्याचे दावे केले जात असतानाच मायक्रोसॉफ्टने या तंत्रज्ञानासह आपले ‘बिंग’ हे सर्च इंजिन पुन्हा आणण्याचे जाहीर केले. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘प्रोमेथियस’ हे एआय मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल ‘ओपन एआय’च्या तंत्रज्ञानावरच बेतलेले आहे. त्यामुळे ते अधिक अचूक असेल, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने ‘बिंग’ला नव्या अवतारात आणताच गाफील राहिलेल्या गूगलनेही ‘बार्ड’ या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आपल्या सर्च इंजिनमध्ये समावेश करण्याचे जाहीर केले. ‘बार्ड’ही ‘चॅट जीपीटी’सारख्या तंत्रज्ञानावरच अवलंबून काम करेल, असे दिसत आहे. दोन्ही ‘सर्च इंजिन’चा वापर तूर्तास मर्यादित वापरकर्त्यांसाठीच असून कालांतराने ती सर्वाना उपलब्ध करून दिली जातील.
हा क्रांतिकारक बदल ठरेल?
तंत्रज्ञान क्षेत्रातील हा बदल निश्चितच भविष्याला दिशा देणारा आहे. ‘चॅट जीपीटी’चे तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यानंतर त्याचा वापर कशाकशात केला जाईल, याबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात होते. ‘सर्च इंजिन’मधील या तंत्रज्ञानाचा समावेश इंटरनेट शोधाचे चित्र पालटेल, यात शंका नाही. एखाद्या माहितीसाठी केलेला ‘सर्च’ आणि उत्तरादाखल समोरच्या स्क्रीनवर आलेल्या शेकडो लिंक्स हे चित्र या तंत्रज्ञानामुळे बदलणार आहे. वापरकर्त्यांने दिलेल्या शब्दांच्या आधारे अचूक माहिती शोधण्याचे काम हे तंत्रज्ञान करेल, असे सांगितले जात आहे. ‘सर्च रिझल्ट’च्या नावाखाली झळकणाऱ्या शेकडो जाहिराती किंवा दिशाभूल करणाऱ्या संकेतस्थळांच्या ‘लिंक्स’ यापुढे दिसणार नाहीत, असा दावाही केला जात आहे.
चित्र सुखद आव्हाने फार?
‘चॅट जीपीटी’सारख्या तंत्रज्ञानाच्या साध्या गणितीय उत्तरांबद्दलच्या चुका आधीच समोर आल्या आहेत. फुटकळ शोधांचे प्रयत्नपूर्वक परिणाम शोधणे असो की गांभीर्यपूर्वक दिलेल्या ‘सर्च’च्या बदल्यात आलेले वायफळ परिणाम असोत, या तंत्रज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. अविरत प्रक्रियेतून अभ्यास करून तार्किक विचार करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असली तरी, त्याचे विश्व माहितीच्या महाजालाच्या सीमांपुरतेच मर्यादित आहे. या महाजालात कोणती माहिती चुकीची किंवा बरोबर हे ठरवण्याइतके शहाणपण या तंत्रज्ञानाकडे अद्याप तरी नाही. याचे स्पष्ट दर्शन गूगलच्या ‘बार्ड’ची घोषणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमातच दिसून आले. ‘बार्ड’शी संलग्न झालेल्या गूगलच्या सर्च इंजिनवर टाकलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर झळकले तेव्हा गूगलचे हसे झालेच, पण त्यासोबतच या तंत्रज्ञानाच्या अपरिपक्वतेचेही दर्शन घडले. त्यामुळे सध्या तरी हे तंत्रज्ञान म्हणजे क्रांतिकारक बदल नव्हे तर क्रांतीच्या दिशेने एक पाऊल आहे, असे म्हणणेच योग्य ठरेल.