रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये मारा करून विध्वंस घडवणारी क्षेपणास्त्रे युक्रेनला वापरू दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. नाटो देशांनी रशियाविरुद्ध युद्ध पुकारले असा त्याचा अर्थ निघेल आणि त्यानुसार प्रतिसाद देण्यास आम्ही सिद्ध असू, असे पुतिन म्हणाले. या इशाऱ्यामुळे युद्धाचा पोतच बदलण्याची चिन्हे आहेत.
पुतिन काय म्हणाले?
रशियाच्या सरकारी टीव्हीला सेंट पीटर्सबर्ग येथे दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी प्रस्तुत इशारा दिला. युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नाटोकडून – म्हणजे अमेरिका आणि काही युरोपिय देशांकडून – मिळाली, तर हे युद्ध निव्वळ युक्रेनपुरते मर्यादित राहणार नाही. यात नाटो सहभागी झाली असा त्याचा अर्थ निघेल. अशा वेळी योग्य तो प्रतिसाद देण्यास आम्हीदेखील तयार आहोत, असे पुतिन म्हणाले. त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्यासाठी आवश्यक उपग्रहीय दिशादर्शन तंत्रज्ञान केवळ ‘नाटो’ देशांकडे (रशिया आणि चीन वगळून) उपलब्ध आहे. त्यामुळे निव्वळ क्षेपणास्त्रे पुरवणे नव्हे, तर तंत्रज्ञान पुरवणे हादेखील नाटोचा सहभाग मानला जाईल, असे त्यांनी सूचित केले. रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील दूत वॅसिली नेबेन्झ्या यांनीदेखील ‘रशिया अण्वस्त्रसज्ज आहे याचा विसर पडू नये. नाटोकडून युद्धात थेट सहभाग आढळून आल्यास गंभीर परिणाम होतील’ असे वक्तव्य केले.
हेही वाचा : पोर्ट ब्लेअर शहराच्या नावामागचा इतिहास काय? केंद्र सरकारने का केले शहराचे नामकरण?
इशारा किती गंभीर?
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनमध्ये आक्रमण केल्यानंतर पुतिन यांनी पहिल्यांदा इशारा दिला होता. रशियाच्या कारवाईत कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास जे भोगावे लागेल, त्याचा दाखला इतिहासात कुठेही मिळणार नाही! तो इशारा युक्रेनच्या नाटो हितचिंतक देशांसाठी होता. परंतु पुतिन यांनी अद्याप तरी अशा धमक्यांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्यांचे काही इशारे गर्भित असतात. या वर्षी जूनमध्ये लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा विषय पहिल्यांदा निघाला त्यावेळी पुतिन यांनी सूचक विधान केले होते. ‘आमच्या देशावर हल्ले करण्यासाठी आमच्या शत्रूला शस्त्रसज्ज केले जात असेल, तर अशा देशांच्या शत्रूंना आम्हीही मदत करू…’, असे पुतिन म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी रशियाने त्यांच्या अण्वस्त्र वापर संहितेचा फेरविचार करण्याचा विचार बोलून दाखवला होता.
नाटोशी युद्धाची शक्यता किती?
रशियाकडे पारपंरिक आणि आण्विक शस्त्रास्त्रांचा साठा प्रचंड आहे. मात्र तसाच तो अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर नाटो राष्ट्रांकडेही आहे. रशियाच्या इशाऱ्यानंतर कदाचित युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे देण्याबाबत फेरविचार होऊ शकतो. कारण नाटो आणि रशिया आमने-सामने आल्यास युद्धाची व्याप्ती आणि विध्वंस प्रचंड प्रमाणात वाढेल. कदाचित तिसऱ्या महायुद्धाची शक्यताही नाकारता येत नाही. तिथवर परिस्थिती जाऊ नये, यासाठी अर्थातच दोन्ही बाजूंकडून वाटाघाटी सुरू होतील आणि भारतासारखे देश यात प्रमुख भूमिका बजावतीलही. मात्र पुतिन यांच्या इशाऱ्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असे मानणारा मोठा मतप्रवाह नाटोमध्ये आहे. युक्रेनविरुद्ध ज्या देशाला इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांकडून मदत स्वीकारावी लागते, त्या देशाकडील शस्त्रे खरोखर किती प्रभावी असू शकतात, असा प्रश्न काही विश्लेषक उपस्थित करतात.
हेही वाचा : माणसाप्रमाणे विचार करणारं AIचं नवं मॉडेल; नोकऱ्यांवर गदा आणणार का?
युद्धाची सद्यःस्थिती काय?
डोन्बास टापूमध्ये युक्रेनविरुद्ध रशियाचा रेटा तीव्र झाला आहे. युक्रेनविरुद्ध रशियाचे क्षेपणास्त्र हल्लेही वाढले आहेत. कुर्स्क या रशियन प्रांतामध्ये मध्यंतरी युक्रेनने मुसंडी मारली आणि पहिल्यांदाच रशियन भूमीवर युद्ध नेले. याचा उद्देश रशियाच्या डोन्बासमधील तुकड्या कुर्स्ककडे वळाव्या आणि तेथील युक्रेनी फौजांना थोडी उसंत मिळावी असा होता. हा उद्देश सफल झालेला नाही. कुर्स्कमध्ये युक्रेनी फौजांची आगेकूच थंडावली आहे. याउलट डोन्बासमध्ये युक्रेनी फौजांचा प्रतिकारही मोडकळीस येत आहे. पण मॉस्कोमध्ये मध्यंतरी ड्रोन हल्ले करून युक्रेनने आपण अजूनही हिंमत हारलेलो नाही हे दाखवून दिले. अशा परिस्थितीत त्यांना लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नाटोकडून मिळाली, तर युद्धाला कलाटणी मिळू शकते. हे जाणल्यामुळेच पुतिन यांनी इशारा दिला असावा.
© The Indian Express (P) Ltd