HAROP Drone India Pakistan conflict: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील तब्बल नऊ दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर व पश्चिम भागांतील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संरक्षण दलांनी तो यशस्वीरित्या हाणून पाडला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने त्याच दिवशी पाकिस्तानातील लाहोरमधील हवाई हल्लाविरोधी संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. या कारवाईत इस्रायली बनावटीच्या HAROP या मानवरहित लढाऊ विमानाचा (मोठ्या आकाराचे ड्रोन) वापर केला. हे आत्मविघातक ड्रोन नेमके काय आहे, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
HAROP म्हणजे नेमकं काय?
हे अत्याधुनिक आत्मविघातक शस्त्र तीन टप्प्यांमध्ये समजून घेऊ.
१. अत्याधुनिक घिरट्या घालणारे अत्याधुनिक शस्त्र
HAROP हे शत्रूप्रदेशावर घिरट्या घालून नेमकी वेळ साधत हल्ला करणारे ‘लॉइटरिंग म्युनिशन’ प्रकारातील ड्रोन आहे. ते नियोजित लक्ष्य स्थळाच्या परिसरात हवेत घिरट्या घालत राहते आणि नेमका क्षण साधत थेट लक्ष्यावर जाऊन थडकते. त्यामुळेच त्याला ‘सुसाइड ड्रोन’ अर्थात आत्मघाती ड्रोन किंवा ‘कामिकाझे ड्रोन’ असेही म्हणतात.
माघारी बोलावण्याचीही क्षमता

या ड्रोनच्या समोरच्या बाजूस एक कॅमेरा बसवलेला असतो, त्या माध्यमातूनच ड्रोन ऑपरेट करणारा जवान किंवा तंत्रज्ञ लक्ष्याचा नेमका शोध घेत आणि भेदही करू शकतो. या प्रकारातील काही ड्रोनमध्ये न वापरलेले ड्रोन परत माघारी बोलावण्याची व त्याचा वापर नंतर करण्याचीही क्षमता असते. नेमके यामुळेच हे विघातक ड्रोन पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे ठरते.

टेहळणीसाठीही वापर

भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची अनेक ड्रोन्स विकत घेतली आहेत, नेमका लक्ष्यभेद करण्याबरोबरच केवळ टेहळणी करण्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी लष्कराने प्रीसिजन गायडेड म्हणजेच अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, त्यापेक्षा या आत्मघातकी ड्रोन्सची प्रणाली पूर्णपणे नवीन आणि वेगळी आहे.

२. इस्रायली बनावटीचे ड्रोन

पाकिस्तानच्या Inter-Services Public Relations (ISPR)ने देखील भारताने लाहोर हल्ल्यासाठी HAROP ड्रोन वापरल्याचा दावा केला आहे. इस्रायली एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) या संरक्षण उत्पादन करणाऱ्या कंपनीने HAROP ला ‘युद्धभूमीचा राजा’ असं टोपणनावही दिलं आहे. त्यांच्याच संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, “UAV आणि क्षेपणास्त्र यांच्या प्रभावी मारकक्षमतेचा एकत्रित परिणाम HAROP या ड्रोनमध्ये पाहायला मिळतो. घिरट्या घालत असताना अचूक वेळ साधण्याची असलेली त्याची क्षमता ही लष्कराच्या कमांड पोस्ट्स, तोफदळ, रणगाडे, हवाई संरक्षण यंत्रणा यांसारख्या महत्त्वाच्या लक्ष्यांसाठी विघातक ठरू शकते.”

९ तास घिरट्या घालण्याची क्षमता

तब्बल ९ तास हवेत घिरट्या घालण्याची आणि कोणत्याही दिशेने झेपावत लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याची HAROP ची क्षमता आहे. GNSS (सॅटेलाइट सिग्नल) जॅमिंग कार्यरत असतानाही या ड्रोनच्या कार्यक्षमतेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, हे महत्त्वाचे.

हे ड्रोन ट्रक किंवा नौदलाच्या युद्धनौकांवरूनही सहज लाँच करता येऊ शकते आणि कोणत्याही प्रकारच्या (अतिथंड- अतिउष्मा असलेल्या) भूप्रदेशातही तेवढ्याच सहजगत्या वापरता येते.

HARPY वरून विकसित करण्यात आलेले नव्या पिढीचे ड्रोन

IAI च्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, HAROP हे IAI कंपनीने १९८०च्या दशकात तयार केलेल्या HARPY या पहिल्या पिढीच्या कामिकाझे ड्रोन प्रणालीवर आधारित असले तरी, हे ड्रोन ही त्याची अतिसुधारित आवृत्ती आहे.

अतिप्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सरचा वापर

HARPY मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जात होता, तर HAROP मध्ये अतिप्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर वापरण्यात आले आहेत. त्यामुळे हे ड्रोन लाँच करताना लक्ष्य निश्चित नसले तरीही चालू शकते. नऊ तास घिरट्या घालत असतानाच सेन्सरने लक्ष्य स्वत:हून निश्चित केल्यानंतर ड्रोन त्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता राखते. त्यावर बसवलेल्या स्फोटकांसह ते थेट लक्ष्यावर जाऊन थडकते. आजवर विविध युद्धांमध्ये HAROP ड्रोनचा वापर करण्यात आला असून त्याने ९८ टक्के घटनांमध्ये अचूक लक्ष्यभेद करण्यात यश प्राप्त केले आहे.

बदलती युद्धशैली

गुरुवारी लाहोर येथील पाकिस्तानची हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त करताना भारतीय लष्कराने केलेला या ड्रोनचा वापर आधुनिक लष्करी तंत्रज्ञानातील प्रगती आणि बदलत्या युद्धशैलीचं महत्त्व अधोरेखित करतो.

Live Updates