ध्वनीहून अधिक वेगाने (स्वनातीत) मार्गक्रमण करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय सैन्यदलांस आवश्यक कौशल्ये विकसित करण्याबरोबर प्रशिक्षण अनुभव देण्याची कामगिरी आता ‘स्टार’ क्षेपणास्त्रामुळे दृष्टिपथात येणार आहे. हवाई संरक्षण प्रतिसाद यंत्रणेचा प्रभावीपणा वाढवण्यासाठी वास्तववादी सराव महत्त्वाचे ठरतात. स्टार क्षेपणास्त्राने तेच साध्य होईल.

स्टार क्षेपणास्त्र काय आहे?

भारतीय सैन्यदलांच्या गरजा लक्षात घेऊन संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानने (डीआरडीओ) विकसित केलेले हे स्वनातीत (supersonic) लक्ष्य क्षेपणास्त्र आहे. त्याची रचना प्रत्यक्ष युद्धासाठी नव्हे तर, त्याची तयारी करण्यासाठी झालेली आहे. समुद्राच्या पाण्याच्या अगदी जवळून ध्वनीच्या दुप्पट वेगाने ते मार्गक्रमण करते. आधुनिक जहाजविरोधी क्रुझ क्षेपणास्त्रांच्या कामगिरीची नक्कल करते. त्याच्या बहुविध उड्डाण रचनेत समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या १२ फूट उंचीवरून मार्गक्रमण करणे, १० किलोमीटर उंचीवरून तीव्र वेगाने खाली येणे यांचा अंतर्भाव आहे. ५५ ते १७५ किलोमीटर श्रेणीत मोहिमेचा उड्डाण कालावधी ५० ते २०० सेकंदांपर्यंत असतो. विविध युद्धभूमीवरील परिस्थितीची प्रतिकृती तयार करण्यासाठी तो पुरेसा ठरतो. अतिवेगवान धोक्यांच्या विरोधातील सरावात वास्तववादी स्थिती निर्माण करून ते कार्यक्षमतेला धार प्राप्त करून देते.

महत्त्व काय?

हवाई संरक्षण क्षमतांची चाचणी आणि प्रशिक्षण देण्यासाठी वास्तववादी लक्ष्य प्रणालीचा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारताला क्षेपणास्त्र प्रशिक्षणासाठी आयात केलेल्या महागड्या लक्ष्य प्रणाली अथवा आभासी प्रशिक्षणावर प्राधान्याने अवलंबून राहावे लागत होते. स्टार क्षेपणास्त्राने हे अवलंबित्व संपुष्टात येईल. स्वदेशी बनावटीचे, पुन्हा वापरता येणारे व किफायतशीर असे हे क्षेपणास्त्र आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत हा एक निर्णायक टप्पा आहे. भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पूर्ण स्वावलंबित्व मिळवल्याचे डीआरडीओचे माजी प्रमुख सतीश रेड्डी सांगतात. स्टार हे त्याचे उदाहरण. पूर्णतः विकसित झाल्यानंतर स्टार क्षेपणास्त्र सैन्यदलांना जलद आणि चपळ लक्ष्यांचा वापर करून पाठलाग करीत नष्ट करण्याच्या सरावात सक्षम करेल.

तंत्रज्ञानातील प्रभुत्व…

प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील प्रगती भारताची वाढती कौशल्ये व स्वावलंबन अधोरेखित करते. पूर्णपणे स्वदेशी विकास हे स्टारचे वैशिष्ट्य आहे. हे क्षेपणास्त्र दोन टप्प्यांच्या प्रणोदन प्रणालीवर आधारित आहे. जलद उड्डाणासाठी बुस्टर रॉकेट आणि सतत ध्वनीहून अधिक उड्डाणासाठी फ्लुएल रॅमजेट. हेच रॅमजेट तंत्रज्ञान ॲस्ट्रा एमके ३ क्षेपणास्त्रासाठी वापरले जात आहे, जे पारंपरिक रॉकेट मोटर्सच्या पलीकडे पल्ला विस्तारते. स्टारच्या माध्यमातून डीआरडीओ केवळ वास्तववादी प्रशिक्षणाला चालना देणार नाही तर, भारताच्या दीर्घकालीन क्षेपणास्त्र संशोधन आणि विकास क्षमतांनाही बळकटी देत आहे. तंत्रज्ञानातील प्रभुत्व आंतरराष्ट्रीय व्यवस्थांचे अडथळे दूर सारतात. अवलंबित्व कमी करतात.

प्रकार कोणते?

स्टार हे हवेतून, जमिनीवरून किंवा समुद्रातून येऊ शकणाऱ्या अतिवेगवान धोक्यांचे अनुकरण करण्यासाठी तयार केलेले आहे. डीआरडीओ दोन प्रकारात ते विकसित करीत आहे. यातील एक म्हणजे हवेतून सोडता येणारे स्टार, जे एलसीएस तेजससारख्या लढाऊ विमानांद्वारे वाहून नेले जाईल. ते हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करते. यात किरणोत्सर्ग विरोधी (रेडिएशन) आणि हवाई नियंत्रण आणि पूर्वसूचना प्रणाली विरोधी (अवॅक) भूमिकांचा समावेश आहे. सिंदूर मोहिमेसारख्या संयुक्त लष्करी सरावासाठी ते आदर्श ठरेल. जमिनीवरून सोडले जाणारे स्टार क्षेपणास्त्र फिरत्या मालमोटारीवर बसवले जाईल. किनाऱ्यावरून किंवा दुर्गम भागात महागड्या पायाभूत सुविधांशिवाय ते तैनात केले जाऊ शकते. यामुळे नौदल व लष्कराच्या सरावासाठी ते उपयुक्त ठरते. स्टार हे सामरिक शस्त्र म्हणून विकसित होऊ शकते असा संरक्षण तज्ज्ञांचा अंदाज आहे. शत्रु्चे रडार आणि पाळत ठेवणाऱ्या विमानांना लक्ष्य करण्यास ते सक्षम असेल असे त्यांना वाटते.

विकास स्थिती

स्वदेशी स्टार (स्वनातीत लक्ष्य) क्षेपणास्त्र आता विकासाच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या अंतर्गत सर्व प्रणालींचे एकत्रिकरण आणि प्रगत प्रमाणीकरण चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. डीआरडीओच्या पथकाने त्याची प्रणोदन प्रणाली, मार्गदर्शन यंत्रणा आणि नियंत्रण प्रणालींना संपूर्ण प्रोटोटाईपमध्ये एकत्रित केले आहे. क्षेपणास्त्राची अचूकता, विश्वासार्हता आणि एकूण परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी सध्या व्यापक चाचण्या प्रगतीपथावर आहेत. यामुळे ते सैन्यदलांच्या वापरासाठी लवकरच तयार होण्याची चिन्हे आहेत. स्टार हे प्रशिक्षण प्रणालीपेक्षा अधिक आहे. त्याची रचना लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त लढाऊ तयारीला बळकटी देणारी आहे.