लेबनॉनमध्ये मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारी ‘डेलाइट सेव्हिंग टाईम’ सुरू केला जातो. या निर्णयांतर्गत देशातील सर्व घड्याळे एका तासाने पुढे केली जातात. मात्र येथील सरकारने या वेळी डेलाइट सेव्हिंग टाईम एका महिन्यानंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या याच निर्णयामुळे येथे गोंधळ निर्माण झाला. काही लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘डेलाइट सेव्हिंग टाईम’ म्हणजे काय? हा निर्णय का घेतला जातो? याबाबत जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेलाइट सेव्हिंग टाईम म्हणजे काय?

डेलाइट सेव्हिंग टाईम प्रथेनुसार प्रत्येक उन्हाळ्यात घड्याळ एक तास पुढे केले जाते. तर शरद ऋतूमध्ये पुन्हा एकदा घड्याळ आपल्या पूर्वीच्या वेळेवर आणले जाते. दिवसाच्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून हा निर्णय घेतला जातो. भारतात मात्र ही पद्धत पाळली जात नाही.

लेबनॉनमध्ये नेमके काय घडले आहे?

लेबनॉनमध्ये प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एका तासाने पुढे केले जाते. मात्र लेबनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाटी यांनी या वर्षी मार्च महिन्यात नव्हे तर २१ एप्रिल रोजी घड्याळ एका तासाने पुढे केले जाईल, अशी घोषणा केली. हा निर्णय नेमका का घेण्यात आला याचे मिकाटी यांनी नेमके कारण सांगितले नाही. मात्र संसदेचे अध्यक्ष नबिह बेर्री आणि मिकाटी यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा आधार घेत तेथील मुस्लीम नागरिकांना रोजा एक तास अगोदर सोडता यावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे येथे गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ५ वेळा आमदार, मोदींविरोधात लढवली निवडणूक; खुनासह ७० आरोप असलेला अतिक अहमद कोण आहे?

विमानतळ, शाळा, ऑफिस प्रत्येक ठिकाणी वेगळी वेळ

मिकाटी यांच्या निर्णयाचे पालन न करता लेबनॉन येथील काही संस्थांनी तसेच चर्चेसनी आपले घड्याळ नेहमीप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारीच रिसेट केले आहे. त्यामुळे सध्या विमानतळ, सेलफोन ऑपरेटर्स, शाळा, ऑफिसमधील घड्याळांमध्ये प्रत्येक ठिकाणी सारखी वेळ नाही. परिणामी येथे काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे.

ग्रिनलँडमध्ये नेमके काय घडले?

ग्रिनलँडनेही आपले घड्याळ डेलाइट सेव्हिंग टाईमनुसार बदलले आहे. मात्र डेलाइट सेव्हिंग टाईमचा कालावधी संपल्यानंतर येथे घड्याळ पूर्ववत केले जाणार नाही. असे केल्याने येथील नागरिकांना काम करण्यासाठी तसेच युरोप आणि अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आगाऊ एक तास मिळेल, असा तर्क ग्रिनलँडने लावला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताबाहेर खलिस्तानवादी तग धरून का आहेत? अन्य देशांच्या सरकारांची त्यांना फूस आहे का?

डेलाइट सेव्हिंग टाईम पद्धत का पाळली जाते? इतिहास काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै १९०८ रोजी चालू तारीख आणि वेळेनुसार थंडर बे येथील लोकांनी त्यांची घड्याळे एका तासाने पुढ केली. याला जगातील पहिले डेलाइट सेव्हिंग टाईम म्हटले जाते. त्यानंतर कॅनडामधील इतर प्रदेशांतही डेलाइट सेव्हिंग टाईमनुसार आपले घड्याळ एका तासाने पुढे केले. पुढे कृत्रिम प्रकाशाचा कमी वापर व्हावा तसेच पहिल्या महायुद्धात इंधनाची बचत व्हावी म्हणून ३० एप्रिल १९१६ रोजी ऑस्ट्रिया आणि जर्मनीनेही ही पद्धत सुरू केली.

हेही वाचा >>> विश्लेषण : कर्नाटकातील मुस्लीम आरक्षणाचा वाद काय आहे?

दरम्यान, सध्या विजेवर चालणारी यंत्रे दिवसभर सुरूच असतात. त्यामुळे डेलाइट सेव्हिंग टाईम ही पद्धत सांप्रत काळात लागू होत नाही. तसेच घड्याळामध्ये दरवर्षी वेळ बदलल्यामुळे त्याचा मानवी शरीरावरही परिणाम होतो, असे काही अभ्यासांत सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is lebanon daligh saving time know details information prd
Show comments