दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल आणि त्यांच्या ‘पीपल पॉवर पार्टी’ (पीपीपी) या परंरपरावादी पक्षाला ‘डीऑर बॅग घोटाळ्या’मुळे सत्ता गमावण्याची भीती सतावत आहे. हा सर्व काय प्रकार आहे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डीऑर बॅग घोटाळा’ काय आहे?

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांच्या पत्नी किम किऑन-ही यांनी भेटवस्तू म्हणून एक डीऑर बॅग स्वीकारल्याचे एका छुप्या कॅमेराने कैद केले. त्यानंतर ही चित्रफित प्रसिद्ध झाली आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय राजकारणात वादळ उठले. तिथे येत्या एप्रिलमध्ये कायदेमंडळाची निवडणूक होत आहे. मात्र डीऑर बॅग वादामुळे ही निवडणूक यून सुक-येओल यांना जड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक माध्यमे या घटनेचा उल्लेख ‘डीऑर बॅग घोटाळा’ असा करत आहेत. याबद्दल यून सुक-येओल आणि किम किऑन-ही यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी आणि निदान ही भेटवस्तू स्वीकारणे गैर होते हे मान्य करावे अशी त्यांच्या ‘पीपल पॉवर पार्टी’ या पक्षातून मागणी होत आहे.

हा कथित घोटाळा कधी उघड झाला?

हा कथित घोटाळा आताच समोर आलेला नाही. किम यांनी डीऑर बॅग स्वीकारण्याची घटना नोव्हेंबर २०२३मध्ये समोर आली. सर्वप्रथम ही चित्रफित एका यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आली. एका कोरियन वंशाच्या अमेरिकी पाद्रीने किम यांची भेट घेतली आणि त्यांना डीऑर बॅग भेटीदाखल दिली. संबंधित पाद्रीने या घटनेचे गुप्त कॅमेराने चित्रीकरण केले आणि त्याची चित्रफीत प्रसिद्ध केली. तेव्हापासून हे प्रकरण दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय राजकारणात वादळाला निमित्त ठरले आहे.

हेही वाचा : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत? 

हे पाद्री कोण आहेत?

किम यांना डीऑर बॅग देणाऱ्या पाद्रीचे नाव रेव्हरंड अब्राहम चोई असे आहे. ते उत्तर कोरियामध्ये धार्मिक कार्यात सहभागी आहेत. तसेच दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यात संवाद व सलोखा असावा याचा ते पुरस्कर्ता आहेत. उत्तर कोरियाच्या बाबतीत यून यांनी कठोर भूमिका घेतल्याने यासंदर्भात आपण किम यांना भेटलो असे त्यांचे म्हणणे आहे. पहिल्या भेटीत त्यांनी किम यांना काही प्रसाधन साहित्य दिले होते. त्यानंतर अशा महागड्या भेटवस्तू दिल्या तर आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल अशी खात्री पटल्यानेच आपण किम यांना डीऑर बॅग दिली असा दावा त्यांनी केला आहे.

यावर यून यांचे काय म्हणणे आहे?

राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांनी या प्रकारावर मौन बाळगले आहे. त्यांच्या कार्यालयाकडे यासंबंधी विचारणा केली असता, “या प्रकाराबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नाही”, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर हा मुद्दा अधिक तापला, त्याचे पडसाद ‘पीपीपी’मध्येही पडले आणि यून यांच्या काही सहकाऱ्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले. वेगळ्या शब्दात सांगायचे तर या ‘डीऑर बॅग घोटाळ्या’मुळे ‘पीपीपी’मध्ये फूट पडली आहे. मात्र, रेव्हरंड अब्राहम चोई यांनी जाणीवपूर्वक किम यांना अडचणीत आणले असे यून यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा : थलपती विजयचे राजकीय भवितव्य काय? वाचा…

पीपीपीमध्ये काय नेमके काय घडले?

पीपीपीच्या अनेक सदस्यांचे असे म्हणणे आहे की लोक किम यांनी काय केले याकडे लक्ष देत आहेत, त्यांना अडचणीत आणण्यासाठी छुप्या कॅमेराचा वापर करण्यात आला याला मतदार महत्त्व देणार नाहीत. पीपीपीच्याच किम क्युंग-युल यांनी किम किऑन-ही यांच्या परिस्थितीची तुलना “भाकरी मिळत नाही तर केक खा” असे म्हणून जगाच्या इतिहासात कुप्रसिद्ध झालेल्या मारी आंत्वानेत हिच्याशी केली. यावरून किम किऑन-ही चांगल्याच अडचणीत सापडल्याचे दिसते. त्यापाठोपाठ ‘वायटीएन’ केबल न्यूजने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात, ६९ टक्के लोकांनी असे मत व्यक्त केले की यून यांनी या भेटवस्तू प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

याचा यून यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?

किम किऑन-ही यांनी भेटवस्तू म्हणून स्वीकारलेली डीऑर बॅग २,२५० डॉलरची आहे. स्थानिक वोन चलनात तिचे मूल्य ३० लाख इतके आहे. किम यांना बॅगेचा पडलेला मोह यून यांच्यासाठी घातक ठरू शकतो, तसेच यून यांचे पत्नीच्या कृत्याकडे कानाडोळा करणे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला महागात पडू शकते असे दक्षिण कोरियातील राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. दोन हजार डॉलरपेक्षा अधिक किमतीची भेटवस्तू स्वीकारून पत्करलेल्या धोक्याचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे असे काही विश्लेषक सांगतात. महागडी भेटवस्तू स्वीकारून किम यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघनही केलेले असू शकते.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : सरकार नील अर्थव्यवस्थेला देणार प्रोत्साहन; नील अर्थव्यवस्था म्हणजे काय? भारतासाठी किती महत्त्वाची?

दक्षिण कोरियाची सद्यःस्थिती काय आहे?

२०२२मध्ये झालेल्या निवडणुकीत यून सुक-येओल यांना बहुमत मिळाले होते, पण पार्लमेंटमध्ये त्यांचा ‘पीपीपी’ अल्पमतात आहे. विरोधी ‘डेमोक्रॅटिक पार्टी’चे पार्लमेंटमध्ये बहुमत आहे. तिथे एप्रिलमध्ये पुन्हा निवडणूक होत आहे. या घोटाळ्यामुळे यून यांचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते. मात्र किम या त्यांच्याविरोधात आखलेल्या सापळ्यात सापडल्याचे यून समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांना महागड्या भेटवस्तूच्या मोहात पाडून अडचणीत आणणे आणि यून यांची बदनामी करणे हा त्याचा हेतू असावा असे समर्थकांना वाटते. यामागे ‘डेमोक्रॅटिक पार्टी’चा हात आहे अशीही शंका त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is south korea s first lady s 2250 dollar dior bag scandal ruling party may lost its power print exp css