What Is Splashdown: आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. ॲक्सिओम-४ या अंतराळ मोहिमेदरम्यान शुभांशू यांच्यासह इतर सदस्य १८ दिवस आयएसएसमध्ये राहिले. सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास त्यांनी सुरू केला होता. सुमारे २२ तासांचा प्रवास करून कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो इथे त्यांनी लँड केले.

अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी समुद्रात उतरणं का बरं योग्य मानलं जात असेल… काही अंतराळयान विमानासारख्या धावपट्टीवरही उतरतात, मात्र त्यासाठी अधिक अत्याधुनिक प्रणालींची आवश्यकता असते. गगनयान मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) समुद्रात उतरणारे एक क्रू मॉड्यूल डिझाइन केले आहे.

स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान मंगळवारी स्प्लॅशडाऊनद्वारे पृथ्वीवर परतले. कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर पॅसिफिक महासागरात या यानाचे स्प्लॅशडाऊन करण्यात आले, तेव्हा हे स्प्लॅशडाऊन म्हणजे नेमकं काय आणि ते इतके सुरक्षित का मानले जाते ते जाणून घेऊ…

स्प्लॅशडाऊन म्हणजे काय?

स्प्लॅशडाऊन हा साधारणपणे एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. जेव्हा एखादे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात ११० ते १२० किमी उंचीवर पुन्हा प्रवेश करण्यास सुरुवात करते, तेव्हा ते सहसा ताशी २७ हजार ३५९ किमी वेगाने प्रवास करते. जमिनीवर उभ्या लॅंडिंगसाठी योग्य असलेल्या वेगापर्यंत त्याचा वेग कमी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. स्प्लॅशडाऊनच्या वेळी अंतराळयानाचा वेग २५ ते ३० किमी प्रतितास असतानाही अंतराळयान पाण्यात उतरवणे अधिक सुरक्षित आहे. पूर्णपणे सुरळीत लॅंडिंग १०० टक्के होईलच अशी खात्री इथेही नाही, मात्र लॅँडिंग करताना जे धक्के बसतात त्याचा प्रभाव मात्र या पद्धतीने कमी करता येतो; जेणेकरून अंतराळयानाची रचना, पेलोड किंवा आतील क्रूला काही नुकसान पोहोचणार नाही.

दुसरे कारण म्हणजे विस्तीर्ण मोकळ्या जागांची उपलब्धता. जमिनीवर लँडिंगचे ठिकाण अचूकपणे निश्चित करावे लागते. समुद्रात, हवेच्या किंवा पाण्याच्या प्रवाहांमुळे अंतराळयान थोडेसे दूर ओढले गेले तरीही ते दुसऱ्या कशावरही आदळण्याचा धोका समुद्रात नाही. कॅप्सूल हे पाण्यावर तरंगण्यासाठी डिझाइन केलेले असते. ते आकाराने शंकूसारखे आणि त्याचा वरचा किंवा खालचा भाग गोलाकार धातूचा असतो. तो जहाजाच्या कवचासारखा काम करतो आणि त्यांना पृष्ठभागावर तरंगत ठेवतो.

स्प्लॅशडाऊन तंत्रज्ञानामुळे अवजड आणि क्लिष्ट लँडिंग गिअरची आवश्यकता राहत नाही, त्यामुळे अंतराळयान हलकं राहतं आणि पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना रचनेवर होणाऱ्या संभाव्य नुकसानाचा धोका कमी होतो. नासाने मर्क्युरी, जेमिनी आणि अपोलो या मोहिमांसाठीही स्प्लॅशडाऊनचा यशस्वी वापर केला आहे. अलीकडच्या काही काळात नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पृथ्वीवर परतताना स्प्लॅशडाऊन पद्धतीचा अवलंब केला होता.

महत्त्वाचे मुद्दे:

  • एअर फोर्स ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला २५ जूनला अॅक्सिओम-४ मिशनवर गेले
  • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे हे चौथे खाजगी मानवी अंतराळ उड्डाण मिशन आहे
  • या मोहिमेद्वारे सर्व अंतराळवीर सूक्ष्म गुरूत्वाकर्षणात ६० वैज्ञानिक प्रयोग करणार होते
  • शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरले
  • मोहिमेवर चारच देशांचे अंतराळवीर गेले होते
  • तरीही या ६० प्रयोगांमध्ये ३१ देशांचा सहभाग होता.

डी-ऑर्बिट बर्न म्हणजे काय?

एखादे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करते, तेव्हा त्याच्या गतीमध्ये घट होणं आवश्यक असतं. भारतीय वेळेनुसार सुमारे २ वाजून ७ मिनिटांनी पॅसिफिक महासागराच्या वरील भागात डी-ऑर्बिट बर्न झाले.
कोणतेही यान जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत फिरत असते आणि त्याला पुन्हा पृथ्वीवर आणायचे असते, तेव्हा त्याची गती कमी करणे आवश्यक असते, जेणेकरून ते कक्षेबाहेर येऊन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकेल. यासाठी अंतराळयानामधील थ्रस्टर्स म्हणजेच लहान रॉकेट इंजिन्स ठराविक वेळी आणि ठराविक दिशेने प्रज्वलित केले जातात. या संपूर्ण प्रक्रियेला डी-ऑर्बिट बर्न असे म्हटले जाते.

लँडिंग कसे केले जाते?

जेव्हा एखादे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करते, तेव्हा घर्षणामुळे त्याची गती कमी होते. मात्र, सुरक्षितरित्या गती कमी करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना आवश्यक असतात. अशीच एक पद्धत म्हणजे पॅराशूटचा वापर. अंतराळयान सहसा प्रथम दोन ड्रॅग पॅराशूट तैनात करते, जे पुन्हा प्रवेश केल्यानंतर वाहन स्थित करते आणि वेग कमी करते. ड्रॅगन अंतराळयान हे पॅराशूट सुमारे १८ हजार फूट उंचावर तैनात करते. सुमारे ६ हजार ५०० फूट उंचीवर ड्रॅगन पॅराशऊट वेगळे केले जाते आणि चार मुख्य पॅराशूट सोडले जातात. ते अंतराळयानाचा वेग आणखी कमी करत राहतात. हे अंतराळयान पृथ्वीवर उभ्या दिशेने प्रवास करत नाही, तर एका कोनात खाली सरकते. पुन्हा प्रवेशाच्या ठिकाणापासून ते अवतरणापर्यंत ५ ते ७ हजार किमी अंतर पार करते. या काळात त्याचा वेग ताशी सुमारे २५ ते ३० किमी इतका कमी होतो. हा वेग समुद्रात स्प्लॅशडाऊनसाठी सुरक्षित आहे