भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यात रोहितने स्वत:हून संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय केवळ एका सामन्यापुरता आहे असे त्याने स्पष्ट केले होते. तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यासाठीही रोहितच नेतृत्वाची धुरा सांभाळेल असे म्हटले जात होते. मग रोहितने अचानक निवृत्ती का घेतली, आपल्या अफाट प्रतिभेला रोहित कसोटी क्रिकेटमध्ये कितपत न्याय देऊ शकला, आणि त्याचा उत्तराधिकारी कोण याचा आढावा.
तडकाफडकी निवृत्तीमागे काय कारण?
अखिल भारतीय निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी येत्या काही दिवसांत संघ जाहीर करणार आहे. संघनिवडीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला, तरी निवड समितीने गेला महिनाभर कर्णधारपदाबाबत बरीच चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच मंगळवारी (६ मे) निवड समितीची बैठक झाली. यात रोहितला कर्णधारपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आता युवा खेळाडूला कर्णधार म्हणून तयार करण्याची वेळ आल्याचे त्यांचे मत आहे,’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबतचे संकेत मिळाल्याने रोहितने केवळ फलंदाज म्हणून खेळण्यापेक्षा कसोटीला थेट अलविदा करणे पसंत केले अशी चर्चा आहे.
अफाट प्रतिभेला कसोटीत न्याय दिला?
गेल्या दोन दशकांपासून रोहितची भारतीय क्रिकेटमधील सर्वांत प्रतिभावान खेळाडू अशी ओळख आहे. रोहितकडे चेंडू खेळण्यासाठी इतर फलंदाजांच्या तुलनेत अधिक वेळ असतो, असे विराट कोहली कायम सांगतो. तसेच रोहितच्या फलंदाजीत असलेली नजाकत आणि त्याच्या नेत्रदीपक फटक्यांचे नेहमी कौतुक होते. त्याच्यातील ही अफाट प्रतिभा आणि गुणवत्ता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ठळकपणे दिसून आली. कसोटीत मात्र रोहित मधली काही वर्षे सोडता चाचपडतानाच दिसला. रोहितने एकूण ६७ कसोटी सामने खेळले. त्याने कारकीर्दीची सुरुवात सलग दोन शतकांसह केली. मात्र, उर्वरित ६५ कसोटीत मिळून त्याला केवळ १० शतकेच करता आली. कसोटी कारकीर्दीत त्याने ४०.५७ च्या सरासरीने धावा केल्या असल्या, तरी भारताबाहेर त्याची सरासरी ३१.०१ अशी होती.
सलामीवीर म्हणून कारकीर्द बहरली
मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणेच रोहितने कसोटी कारकीर्दीची सुरुवातही मधल्या फळीत केली. त्याने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना सलग दोन सामन्यांत अनुक्रमे १७७ आणि नाबाद १११ धावा केल्या. त्यानंतरच्या शतकासाठी त्याला चार वर्षे वाट पाहावी लागली. मधल्या फळीत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी स्थान पक्के केल्याने रोहितला कसोटी संघात जागा मिळविणे अवघड जात होते. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो धावांच्या राशी उभारत असल्याने निवड समितीला रोहितकडे दुर्लक्ष करणे अवघड जात होते. मधल्या फळीत जागा नसल्याने अखेर त्यांनी रोहितला कसोटीतही सलामीला खेळण्याची संधी दिली. पुढील काही वर्षे रोहितची कारकीर्द बहरली. २०१९ मध्ये सलामीवीर म्हणून पहिल्याच मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७६, १२७ आणि २१२ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने कामगिरीत सातत्य राखले होते.
कर्णधारपदाची जबाबदारी
कोहलीने २०२१ मध्ये कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर निवड समितीने ही जबाबदारी रोहितकडे सोपवली. रोहितने २४ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. यापैकी १२ सामने भारताने जिंकले, तर नऊ सामन्यांत हार पत्करली. तीन सामने अनिर्णित राहिले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली. मात्र, अखेरीस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२४ च्या सुरुवातीला रोहितने युवा शिलेदारांना हाताशी घेऊन मायदेशात इंग्लंडला धूळ चारली. मात्र, याच वर्षाच्या उत्तरार्धात रोहितची कामगिरी खालावली.
कसोटी कारकीर्दीचा कटू शेवट
कसोटी क्रिकेटमध्ये २०२४ वर्षाचा उत्तरार्ध रोहितसाठी विसरण्याजोगा ठरला. भारतीय संघावर मायदेशात न्यूझीलंडकडून ०-३ असा ‘व्हाइटवॉश’ पत्करण्याची नामुष्की ओढवली. या मालिकेत रोहितने कर्णधार आणि फलंदाज म्हणून निराशा केली. ‘कर्णधार म्हणून या अपयशाची जबाबदारी मी घेतो,’ असे मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटीनंतर रोहित म्हणाला होता. या मालिकेत रोहितला १५.१६च्या सरासरीने केवळ ९१ धावाच करता आल्या. मात्र, पुढे ऑस्ट्रेलियातील मालिकेत कामगिरी उंचावण्याचा आशावाद रोहितने व्यक्त केला होता. रोहितसाठी हा दौराही निराशाजनकच ठरला. वैयक्तिक कारणास्तव रोहित ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीला मुकला. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि भारताने पर्थ येथे झालेला हा सामना जिंकला. या सामन्यात सलामीला यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी चमक दाखवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करताना रोहितने मधल्या फळीत खेळण्याचे ठरविले. परंतु दोन कसोटीत मिळून त्याला १९ धावाच करता आल्या. त्यामुळे मालिकेतील चौथ्या कसोटीत रोहित सलामीला परतला. मात्र, यशाने त्याला हुलकावणीच दिली. तो अनुक्रमे ३ आणि ९ धावाच करू शकला. लयीत नसल्याने आणि भारतीय संघ मालिकेत १-२ असा पिछाडीवर असल्याने रोहितने निर्णायक पाचव्या कसोटीसाठी स्वत:हून संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे रोहितच्या या निर्णयाच्या विरोधात होते. मात्र, संघाचे हित लक्षात घेऊन आपण संघाबाहेर राहण्याचे ठरविले असे रोहित त्यावेळी म्हणाला होता. ‘माझ्यासाठी ही अखेर नाही. मी पुनरागमन करेन,’ असे या कसोटीदरम्यान दिलेल्या मुलाखतीत रोहितने सांगितले होते. मात्र, रोहितसाठी हा कसोटी दौरा शेवटचाच ठरला.
उत्तराधिकारी कोण?
रोहितने ऐन इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर निवृत्ती जाहीर केल्यामुळे निवड समितीसमोर पेच उभा राहिला आहे. पाच कसोटी सामन्यांची इंग्लंड मालिका खडतर मानली जाते. तेथे रोहितच्या नेतृत्वाचा अनुभव नक्कीच कामी आला असता. आता ही जबाबदारी सोपवण्यासाठी मोजकी नावे निवड समितीसमोर आहेत. विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. त्याऐवजी सध्या लय गवसलेला सलामीवीर शुभमन गिलकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. गिलकडे यापूर्वीही भावी कर्णधार म्हणून पाहिले गेले होते. गिलशिवाय अनुभवी के. एल. राहुलचा पर्यायही उपलब्ध आहे. राहुल आयपीएलमध्ये लयीत आला आहे. शिवाय इतर दोघांपेक्षा राहुलकडे अधिक प्रदीर्घ अनुभव असणे ही त्याची जमेची बाजू. यष्टिकक्षक फलंदाज ऋषभ पंतचा विचारही होऊ शकतो. ऋषभ सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. तेथे त्याची कामगिरी समाधानकारक नसली, तरी परदेशी दौऱ्यांमध्ये त्याच्याकडून धावा होतात.