-अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आणि विमानांना निष्प्रभ करण्यास सक्षम असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (बीएमडी) इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी भारताची संरक्षण प्रणाली बळकट करण्यास महत्त्वाची ठरणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) दुसऱ्या टप्प्यात एडी – १ या शत्रूूच्या क्षेपणास्त्राचा पाठलाग करून ते नष्ट करणाऱ्या (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर चाचणी घेतली. यावेळी प्रणालीतील सर्व उपप्रणाली व यंत्रणांनी अपेक्षेनुरूप काम केले. या प्रणालीमुळे देशातील प्रमुख शहरे तसेच महत्त्वाच्या ठिकाणांचा हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यात उपयोग होणार आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (बीएमडी) म्हणजे काय?

ध्वनीहून अधिक वेगाने (स्वनातीत) अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याचे सामर्थ्य व अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र घातक शस्त्र म्हणून ओळखले जाते. आक्रमक कारवाईत कुठल्याही राष्ट्राविरोधात त्याचा वापर होऊ शकतो. या चिंतेमुळे जगात विविध क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची स्पर्धा वाढीस लागली. त्याच वेळी या घातक शस्त्रापासून बचाव करण्याच्या दृष्टीने प्रगत राष्ट्रांनी लक्ष केंद्रित केले. यातून विकसित झालेली प्रणाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (बीएमडी) होय. अलीकडे ही प्रणाली केवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रच नव्हे, तर इतर प्रकारच्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यास सक्षम झाल्याचे शस्त्रास्त्र नियंत्रण संघटनेचे निरीक्षण आहे.

एडी – १ क्षेपणास्त्र नेमके काय आहे?

देशात विकसित झालेले हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. त्याची रचना लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि विमानांना निष्भ्रम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली. पृथ्वीच्या वातावरणात आणि वातावरणाबाहेर जाऊनही ते पाठलाग करू शकते. दोन टप्प्यांतील यंत्रणेद्वारे ते संचालित होते. देशात विकसित केलेली प्रगत नियंत्रण प्रणाली, दिशादर्शन आणि मार्गदर्शन व्यवस्थेमुळे हे क्षेपणास्त्र वायुवेगाने अचूक लक्ष्यभेद करू शकते. उड्डाण चाचणीत रडार, दूरसंचार व विद्युत चुंबकीय निरीक्षण केंद्रांसह अनेक संवेदकांमार्फत माहिती संकलित करण्यात आली. त्यातून सर्व उपप्रणालींची कामगिरीही अपेक्षेनुसार झाल्याचे अधोरेखित झाले.

प्रणालीचे वैशिष्ट्य काय ?

संभाव्य क्षेपणास्त्र आणि अन्य हवाई हल्ल्यांपासून मोठ्या क्षेत्राचे संरक्षण करण्यास सक्षम असलेली ही परिपूर्ण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रणाली पाच हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकते. शक्तीशाली रडारने ती सुसज्ज आहे. एकदा रडारला शत्रूच्या क्षेपणास्त्राचा सुगावा लागला की, त्याचा माग काढून संरक्षण प्रणाली कार्यान्वित होईल. तिची अचूक लक्ष्यभेदाची संभाव्यता ९९.८ टक्के आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी वेगवेगळे लक्ष्य भेदण्याची तिची क्षमता आहे. जगातील मोजक्या राष्ट्रांकडे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी प्रणाली आहे. त्यामुळे ही प्रणाली देशाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता अधिक मजबूत करणारी ठरणार आहे.

आवश्यकता का?

चीन आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांकडून विविध क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास होत आहे. उभयतांशी सीमा वादावरून संघर्ष सुरू आहे. चीनच्या भात्यात १५ हजार किलोमीटरहून अधिक मारा करणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रेही आहेत. भारतातील कुठल्याही शहरावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची चीनची क्षमता आहे. ही आव्हाने लक्षात घेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (ॲन्टी बॅलिस्टिक) विकास सुरू करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पृथ्वी क्षेपणास्त्रावर आधारित हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यात आली. दुसरा टप्पा अमेरिकेच्या अद्ययावत हवाई संरक्षण प्रणालीसारखा राखण्याकडे लक्ष दिले जात आहे. जेणेकरून ही प्रणाली मध्यवर्ती पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखू शकते. उच्च श्रेणीच्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्याची क्षमता राखणारे एडी- २ देखील विकसित होत असल्याचे सांगितले जाते.

जागतिक स्थिती काय?

अमेरिका, रशिया, चीन, इस्रायल आणि भारत यांसह अनेक राष्ट्रांनी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित केली आहे अथवा करीत आहे. फ्रान्स व इटलीने तर संयुक्त कार्यक्रमांतर्गत सक्षम क्षेपणास्त्र विकसित केले. पोलंड, स्पेन, रोमानिया, जर्मनी, ग्रीस, तुर्कस्तान, इस्रायल, इजिप्त यासह इतर अनेक देश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली किंवा तिचे घटक खरेदी करीत आहेत. हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कवच प्राप्त करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. अमेरिकेची पेंटागॉन संस्था अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धेला खतपाणी घालत असल्याचे विश्लेषकांना वाटते. अंतराळातील युद्धासाठी त्यांच्यामार्फत विविध क्षमतेच्या शस्त्र प्रणाली विकसित केल्या जात आहेत. भारताने सभोवतालचे संभाव्य धोके लक्षात घेऊन यापूर्वीच उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. भविष्यातील युद्ध अंतराळात लढले जातील. त्या दिशेने आयुधांचे मार्गक्रमण सुरू आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखणाऱ्या प्रणालीची कार्यपद्धती त्याचे निदर्शक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the significance of ballistic missile defence system tested by india print exp scsg