मागील काही दिवसांपासून अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आहे. अमृतपाल सिंग ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तानसमर्थक संघटनेचा म्होरक्या असून तो सध्या फरार आहे. संपूर्ण पंजाब पोलीस त्याच्या शोधात आहेत. सध्या तो परदेशात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पंजाब पोलीस अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना आतापर्यंत चार वाहने जप्त केली असून यातील ISUZU गाडीचा मालक असलेल्या मनप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत करणारा मनप्रीत सिंग कोण आहे? त्याचा आणि अमृतपाल सिंगचा संबंध काय आहे? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> विश्लेषण: जंगलात काही प्राणी मूळ रंगाऐवजी पांढरे किंवा काळे का आढळतात? ‘अल्बिनिझम’ आणि ‘मेलेनिझम’ म्हणजे काय?

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मनप्रीत सिंगने केली मदत?

१८ मार्च रोजी अमृतपालला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलीस मागावर असूनही अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी ठरला. अमृतपाल सिंगला पळून जाण्यासाठी ज्या वाहनांच्या माध्यमातून मदत करण्यात आली, ती चारही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. मनप्रीत सिंग यातील एका ISUZU कंपनीच्या वाहनाचा मालक आहे. पोलिसांनी ३२ वर्षीय मनप्रीतला सोमवारी (२० मार्च) अटक केली असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवाशहर पोलिसांनी मनप्रीतला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : अफगाणिस्तानमध्ये भूकंप, पण दिल्लीला हादरे; कारण काय?

मनप्रीत सिंग कोण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मनप्रीत सिंगचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. आपल्या मोठ्या भावासोबत तो हा व्यवसाय चालवतो. त्याच्याकडे एकूण ५ ते ६ ट्रक असून त्यांद्वारे तो वाळूची वाहतूक करतो. तो नवाशहरमधील अनोखेरवाल गावाचा रहिवाशी आहे.

मनप्रीत सिंगचा अमृतपाल सिंगशी काय संबंध?

मनप्रीत सिंगच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मनप्रीत मागील चार वर्षांपासून निहंग शिखांप्रमाणे कपडे परिधान करतो. त्याच्यावर अमृतपाल सिंगचा खूप प्रभाव आहे. अमृतपाल सिंगने आयोजित केलेल्या प्रत्येक खालसा वाहीरमध्ये तो सहभागी होत असे. मनप्रीत सिंग याच्या नावावर गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. करोना महासाथीमध्ये आंदोलन केल्यामुळे कलम १८८ अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळेही त्याच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : मेहुल चोक्सीचे इंटरपोलच्या यादीतून नाव हटवले, १३५०० कोटींच्या घोटाळ्याचे काय होणार? जाणून घ्या

मनप्रीतकडून एक बंदूक, ५७ जिवंत काडतुसे जप्त

पोलिसांनी मनप्रीतला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अमृतपाल सिंगविषयी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक वॉकीटॉकी, एक बंदूक, ५७ जिवंत काडतुसे, तसेच एक कृपाण जप्त केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is manpreet singh helping khalistan supporter amritpal singh to abscond prd
First published on: 22-03-2023 at 18:14 IST