scorecardresearch

विश्लेषण : अफगाणिस्तानमध्ये भूकंप, पण दिल्लीला हादरे; कारण काय?

ईशान्य अफगाणिस्तानमध्ये जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल होती.

afghanistan earthquake delhi tremors
अफगाणिस्तानमधील भूकंपाचे दिल्लीमध्ये हादरे बसले (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

मंगळवारी (२२ मार्च) ईशान्य अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (यूएसीएस) या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल असून भूकंपाचे केंद्र दिल्लीपासून साधारण १००० किमी दूर होते. या भूकंपाचे धक्के दिल्लीसह उत्तर भारतालादेखील जाणवले. याच पार्श्वभूमीवर हा भूकंप नेमका कोठे झाला? अफगाणिस्तानमधील भूकंपाचे धक्के भारतात का जाणवतात? भारताला या भूकंपांचा किती धोका आहे? हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >> विश्लेषण : मेहुल चोक्सीचे इंटरपोलच्या यादीतून नाव हटवले, १३५०० कोटींच्या घोटाळ्याचे काय होणार? जाणून घ्या

एका वर्षात याच भागात चार वेळा भूकंपाचे धक्के

मिळालेल्या माहितीनुसार ईशान्य अफगाणिस्तानमध्ये जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र दिल्लीपासून साधारण एक हजार किमी तर काबूलपासून ३०० किमी अंतरावर होते. ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगा हा भूकंप्रवण भाग आहे. मागील एका वर्षात याच भागात चार वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. भूंकपाचे केंद्र आणि भूकंपाची तीव्रता यानुसार येथील भूकंपांचे धक्के उत्तर भारतातही जाणवतात.

हेही वाचा >> विश्लेषण: जंगलात काही प्राणी मूळ रंगाऐवजी पांढरे किंवा काळे का आढळतात? ‘अल्बिनिझम’ आणि ‘मेलेनिझम’ म्हणजे काय?

…तर भूकंपाचे प्रभावक्षेत्रतही तुलनेने जास्त

यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील भूकंपाचे केंद्र हे भूपृष्ठाच्या १८७ किमी खाली होते. हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात. या भागात जाणवणाऱ्या भूकंपांचे केंद्र हे सामान्यत: भूपृष्ठाच्या १०० किमी खाली असते. एखाद्या भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर त्याचे प्रभावक्षेत्रतही तुलनेने जास्त असते. उत्तर भारताजवळील अफगाणिस्तानच्या भूभागात घन खडकाचे (सॉलिड रॉक्स) प्रमाण जास्त आहे. घन खडक भूकंपातून निर्माण होणाऱ्या कंपनांच्या वहनासाठी अनुकूल असतात. याच कारणामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : फ्रान्समधी पेन्शन सुधारणा विधेयक काय आहे? कर्मचारी आंदोलन का करत आहेत?

म्हणूनच दिल्लीमध्ये जीवित किंवा वित्तहानी नाही

ज्या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या खूप खाली असते, त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांना भूपृष्ठापर्यंत येण्यासाठी जास्त अंतर पार करावे लागते. परिणामी अशा प्रकारचे भूकंप हे कमी विध्वंसकही असतात. कदाचित याच कारणामुळे दिल्लीमध्ये जाणवलेल्या हादऱ्यांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

याआधीही अफगाणिस्तानमधील भूकंपानंतर दिल्लीमध्ये हादरे

अफगाणिस्तामधील भूंकपाचे हादरे उत्तर भारताला बसण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही २०१५ साली नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. या भूकंपाच्या साधारण सहा महिन्यांनंतर अफगाणिस्तानमध्येही ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. तेव्हादेखील या भूकंपाचे हादरे उत्तर भारतात जाणवले होते. जानेवारी २०१८ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व घटनांमध्ये भूकंपांचे केंद्र भूपृष्ठापासून १५० किमी खाली होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या