लेबनॉनमध्ये मंगळवारी ठिकठिकाणी झालेल्या पेजर स्फोटांमध्ये २७०० नागरिक जखमी झाले असून, ८ नागरिक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये हेझबोला या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे. जखमींमध्ये इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमागे नक्कीच इस्रायलचा हात असल्याचा दावा हेझबोला आणि लेबनॉन सरकारने केला आहे. जखमींमध्ये जवळपास २०० जणांची प्रकृती चिंताजनक सांगितली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेजर-स्फोटांमुळे खळबळ

लेबनीज नागरिकांकडील जवळपास १००० पेजर्सचा स्फोट झाला असे वृत्त आहे. दुपारी पावणेचार वाजल्यापासून जवळ तासभर विविध ठिकाणी – भाजी बाजारांत, दुकानांमध्ये, कार्यालयांत, काही प्रसंगी मोटारीत किंवा बाइक चालकांच्या खिशात स्फोट झाल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अग्रेषित होत आहेत. प्रामुख्याने राजधानी बैरूट आणि इस्रायल-लेबनॉन सीमाभागातील शहरांमध्ये स्फोट झालेले आहेत. सीमा भागामध्ये हेझबोलाचे प्राबल्य आहे. हेझबोला आणि इराण समर्थित इतर संघटनांना धडा शिकवण्याचा इशारा इस्रायलने आदल्याच दिवशी दिला होता.

हेही वाचा : यावर्षी देशभरात पाऊस तर समाधानकारक! पण जलसाठ्यांची स्थिती काय आहे?

अजूनही पेजर वापरात?

भारतासारख्या देशामध्ये पेजर हे उपकरण नवीन सहस्रकाच्या पहिल्या एक-दोन वर्षांतच नामशेष झाले. पण लेबनॉनसारख्या अस्थिर आणि गरीब प्रदेशांमध्ये अजूनही पेजर वापरले जातात. पेजर हे मोबाइल फोनच्या तुलनेत फारच मागास उपकरण असले, तरी दहशतवादी गटांसाठी त्यांचा फायदा म्हणजे, पेजर वापरणाऱ्यांवर पाळत ठेवणे अवघड जाते. मोबाइलबाबत ती सोय नसते. काही पाश्चिमात्य देशांमध्ये डॉक्टर मंडळीही पेजर बाळगून असतात. पेजरमध्ये केवळ संदेश दिसतो आणि त्यावर संभाषण करता येत नाही.

पेजरमध्ये स्फोट झालेच कसे?

हे बहुतेक पेजर हेझबोलाने तस्करी करून लेबनॉनमध्ये आणले होते. पेजरमधील लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण अशा प्रकारे सदोष पेजरही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही कसे होऊ शकतात, हे कोडे उलगडलेले नाही. लिथियम हे बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट होत नाही म्हणून लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही पद्धतशीरपणे ज्या प्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार असू शकतो का, याविषयी सामरिक आणि तंत्र विश्लेषक गोंधळलेले आहेत. हे इलेक्ट्रॉनिक युद्ध असेल, तर तशी सिद्धता अमेरिका, रशिया, चीन, इस्रायल अशा मोजक्याच देशांकडे आहे.

हेही वाचा : तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम

संशयाची सुई इस्रायलकडे?

इस्रायलने स्फोट झाल्याच्या रात्री उशिरापर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. हेझबोलाने मात्र थेट इस्रायलवर ठपका ठेवला आहे. शत्रूचा काटा काढण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यास इस्रायल मागेपुढे पाहात नाही हा इतिहास आहे. इराणच्या काही अणुसास्त्रज्ञांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने दूरस्थ संवेदकांवर चालणाऱ्या शस्त्रांनी संपवले आहे. हेझबोलाने जेथून पेजर आणले, त्या कारखान्यात शिरकाव करून सदोष पेजर बनवले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा प्रकारे धाडस आणि तंत्रज्ञान इस्रायलकडे असल्यामुळे, इतक्या सुनियोजित हल्ल्यांबाबत संशयाची सुई इस्रायलकडेच वळते.

हेही वाचा : दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र; ही दुर्मीळ खगोलीय घटना काय आहे?

धोकादायक पाऊल

पेजर स्फोटांच्या मालिकेमागे इस्रायल असेल, तर त्यांचे हे पाऊल अत्यंत धोकादायक ठरते. कारण यात मोजक्या दहशतवाद्यांच्या बरोबरीने सर्वसामान्यांचे जीवितही धोक्यात येते. सध्या इस्रायल हमास, हेझबोला आणि हुथी अशा इराण समर्थित बंडखोरांशी एकाच वेळी लढत आहे. या लढ्यात इराणही उतरला आहे. एका वृत्तानुसार, सीरियामध्ये पेजर स्फोट झाले असून, त्यातही काही नागरिक मरण पावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर योगायोगाने सदोष पेजरांचा स्फोट संभवत नाही. त्यामुळे या घटनेमागे असाधारण योगायोगाऐवजी घातपातच असू शकतो. परंतु या घटनेनंतर हेझबोला पुन्हा चवताळली असून, पश्चिम आशिया अधिकच धोकादायक बनू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who s behind unusual serial pager blasts in lebanon hezbollah blames israel print exp css
Show comments