संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलिशान मोटारी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आता अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम अथवा एडीएएस प्रणालीला पसंती वाढत आहे. पण ही चैनच म्हणावी काय?

या प्रणालीचा प्रसार किती? 

भारतात मोटार वाहनांचे वर्षभरात साडेचार लाखांहून अधिक अपघात होतात, अशी लाजिरवाणी आकडेवारी गेल्या नोव्हेंबरात आल्यानंतर केंद्र सरकारकडून वाहनांच्या सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात आहे. त्यादृष्टीने वाहन उत्पादक कंपन्या वाहनांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्टय़ांचा समावेश करीत आहेत. मोटार चालविताना चालकाला सुरक्षित अनुभव मिळावा, हा यामागील मुख्य हेतू आहे. ग्राहक स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम अथवा एडीएएसला प्राधान्य देत आहेत.  केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने याबाबतचा मसुदाही तयार केला आहे. त्यात काही ठरावीक प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी एडीएएस प्रणालीमध्ये अपघाताच्या धोक्याची पूर्वसूचना मिळणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. यात प्रवासी आणि व्यावसायिक या दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात ही प्रणाली वाहनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरली जाणार आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची नवीन प्रक्रिया काय आहे? प्रक्रियेत बदल करण्यामागील नेमके कारण काय?

एडीएएस प्रणाली म्हणजे काय?

पूर्णपणे स्वयंचलित असलेल्या मोटारींच्या दिशेने वाहन उद्योगाची वाटचाल सुरू आहे. अशा मोटारींवर अनेक कंपन्यांकडून काम सुरू असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जातात. या परिस्थितीत चालकाला वाहन चालविण्याचा सुरक्षित अनुभव देणारी एडीएएस प्रणाली आहे. एडीएएसमध्ये अपघात रोखण्यासाठी अथवा त्याचा परिणाम करणारी अनेक सुरक्षा वैशिष्टय़े असतात. त्यात गुंतागुंतीची रडार अथवा कॅमेरा आधारित यंत्रणा असते. ही यंत्रणा मोटारीतील सेन्सरशी जोडलेली असते. मोटारीच्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती त्यामुळे यंत्रणेला मिळत असते. त्यामुळे ही यंत्रणा वाहनांचे ब्रेक आणि स्टिअिरगचे नियंत्रण हाती घेते. त्यामुळे चालकाला संभाव्य अपघातापासून धोका निर्माण होत नाही. अनेक वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या मोटारीत आता ही प्रणाली देऊ लागल्या आहेत. सध्या प्रामुख्याने आलिशान मोटारींमध्ये ही प्रणाली वापरण्यात येत आहे.

सुरक्षा वैशिष्टय़े कोणती?

अनेक वेळा चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात घडतात. असे अपघात या प्रणालीमुळे कमी होणार आहेत. एडीएएस प्रणालीमुळे एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाणे, निश्चित वेग नियंत्रित करणे, वाहन उभे करण्यास मदत करणे आणि तातडीने ब्रेक लावणे आदी गोष्टी शक्य होतात. रस्त्यावर अचानक समोर एखादे वाहन अथवा पादचारी आला आणि चालकाचे लक्ष नसेल तरी या प्रणालीमुळे तातडीने ब्रेक लावले जातात. त्यामुळे अपघात टळतो. पुढे एखादे वाहन असेल तर या प्रणालीमुळे वाहन एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाते. याचबरोबर समोरून येणाऱ्या वाहनांना दिव्यांचा त्रास होऊ नये, यासाठी मोटारीचा प्रकाशझोतही आपोआप कमी होतो. वेग वाढल्यानंतर आपोआप मोटारीच्या दिव्यांचा प्रखर प्रकाशझोत सुरू होतो.

हेही वाचा >>>अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला; पत्नीचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र, विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्याचे सत्र कधी थांबेल?

भारतीय रस्त्यांवर योग्य की अयोग्य?

प्रत्यक्षात एडीएएस प्रणाली सहजसोपी वाटत असली तरी भारतातील वाहतुकीत ती कशा पद्धतीने कार्य करेल, याबाबत साशंकता आहे. देशातील रस्त्यांचा विचार करता वाहतुकीची शिस्त अभावाने दिसते. अनेक वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याने ते नेमक्या कशा पद्धतीने वाहने पुढे नेतील, याबद्दल अचूक आडाखा बांधता येत नाही. एखादे वाहन तुमच्या मोटारीच्या खूप जवळ आल्यास एडीएएसमुळे आपोआप ब्रेक लागण्याची प्रक्रिया घडू शकते. पण आपल्या देशात दोन वाहनांमधील अंतर खूप कमी असते. अशा वेळी अचानक ब्रेक लागल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक मोटारीला बसू शकते. त्यामुळे शहरांतील जास्त रहदारी असलेल्या रस्त्यांवर या प्रणालीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचवेळी महामार्गावर ही यंत्रणा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम ठरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

भारतातील रस्ते आणि वाहतूक समजून घेऊन या प्रणालीमध्ये बदल करण्याची आवश्यकता वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये वापरात असलेली एडीएएस प्रणाली भारतात वापरून प्रश्न सुटण्याऐवजी त्यातून गंभीर समस्या निर्माण होईल. कारण भारतीयांची वाहन चालविण्याची पद्धती इतर पाश्चात्त्य देशांतील वाहनचालकांपेक्षा वेगळी आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. याचबरोबर मार्गिकेची शिस्त पाळत नाहीत. भारतातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या लक्षात घेऊनही त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ एडीएएस प्रणालीचा वापर केला म्हणून वाहन आणि त्याचा चालक सुरक्षित होणार नाही. अनेक चालक रस्त्यावरील परिस्थिती योग्य नसल्याने ही प्रणाली असूनही तिचा वापर पूर्णपणे करू शकणार नाहीत. त्यामुळे ही प्रणाली केवळ नावापुरती राहील. त्यामुळे एडीएएसचे भारतीय रूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why adas may not be a good option on indian roads print exp 0224 amy