अमेरिकेतील शिकागोच्या रस्त्यावर एका भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतरचा जखमी अवस्थेतील विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भीषण हल्ल्याच्या घटनेनंतर शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, ते पीडित सय्यद मजहीर अली आणि भारतातील त्याच्या पत्नीच्या संपर्कात आहे. हैदराबादचा रहिवासी असलेल्या सय्यद मजहीर अली आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती मदत करायचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

पण नेमकी ही घटना काय आहे?

शिकागोमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी आलेल्या सय्यद मजहीर अलीच्या म्हणण्यानुसार, ४ फेब्रुवारी रोजी शिकागोमधील कॅम्पबेल अव्हेन्यू येथील निवासस्थानाजवळ चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला होता. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अलीचा चार जणांनी पाठलाग केल्याचेही स्पष्ट दिसत आहे. या चार जणांनी अलीला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर त्याचा फोन चोरी करून घटनास्थळावरून पळ काढला.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
शिकागोमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी आलेल्या सय्यद मजहीर अलीच्या म्हणण्यानुसार, ४ फेब्रुवारी रोजी शिकागोमधील कॅम्पबेल अव्हेन्यू येथील निवासस्थानाजवळ चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला होता. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये अलीच्या कपाळ, नाक आणि तोंडातून रक्त वाहत होते. “चार लोकांनी माझ्यावर हल्ला केला. हातात फूड पॅकेट घेऊन मी घरी परतत होतो. मी माझ्या घराजवळ पोहोचताच चौघांनी मला लाथा मारल्या आणि धक्काबुक्की केली. कृपया मला मदत करा,” असे तो या व्हीडिओत म्हणाला. व्हीडिओमध्ये अली श्वास घेण्यासाठीही धडपडत असल्याचे दिसून आले. याच व्हीडिओत मारेकर्‍यांनी त्याचा फोन चोरून पळ काढल्याचेही त्याने संगितले.

शिकागोच्या उत्तर भागात राहणारा अली हा हैदराबादमधील लंगर हौजचा रहिवासी आहे. इंडियाना वेस्लेयन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तो अमेरिकेला गेला आहे. भारतात राहत असलेली अलीची पत्नी सय्यदा रुकुलिया फातिमा रिझवी म्हणाली की, तिला अलीच्या मित्राने संध्याकाळी हल्ल्याची माहिती दिली. अलीवर हल्ला झाला आणि त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे तिला कळले.

फातिमा रिझवी हिने आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात तिने लिहिले की, त्याला रक्तस्त्राव होताना पाहून तिला धक्का बसला. अमेरिकेतील त्याच्या सुरक्षिततेबद्दल तिला खूप काळजी वाटते. याशिवाय तिने परराष्ट्र मंत्र्यांना तिच्या पतीला वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्याचीही विनंती केली आणि मित्राचा नंबर दिला जेणेकरून ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.

हॉस्पिटलमधून घरी परतलेल्या अलीने स्थानिक मीडियाला सांगितले: “ही घटना मी विसरू शकत नाही. त्यांनी माझ्यावर बंदूक धरली होती. माझ्या डोळ्यावर ठोसे मारले गेले. ते मला पायांनी माझ्या चेहऱ्यावर, माझ्या पाठीवर मारत होते. अमेरिका माझ्या स्वप्नातील देश आहे. मी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी येथे आलो होतो, परंतु या घटनेने माझ्या मनावर मोठा परिणाम झाला आहे,” असे अली म्हणाला.

दरम्यान शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने अलीशी संपर्क साधून सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. अलीचा चुलत भाऊ अब्दुल वहाब मोहम्मद या घटनेवर आपली प्रतिक्रिया देतांना म्हणाला, “कधीकधी मला वाटते की पदव्युत्तर शिक्षण थांबवून भारतात परतं जावं असं वाटतं. इथे सुरक्षेची खात्री वाटत नाही.”

भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला

या वर्षी अमेरिक्र्त इतर भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे. सातत्याने घडणार्‍या या घटनांमुळे या देशात भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यातच १९ वर्षीय श्रेयस रेड्डी बेनिगेरी हा विद्यार्थी ओहायोमध्ये मृतावस्थेत आढळून आला. बेनिगेरी हा लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसचा विद्यार्थी होता. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या विधानानुसार, या मृत्युमागे काहीही चुकीचे नसल्याचे सांगण्यात आले.

श्रेयस रेड्डी बेनिगेरीच्या मृत्यूपूर्वी आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नील आचार्य हा विद्यार्थी इंडियाना येथील पर्ड्यू विद्यापीठाजवळ मृतावस्थेत आढळून आला. याआधी जॉर्जियाच्या लिथोनिया शहरात विवेक सैनी या २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर ड्रग व्यसनाच्या आहारी असलेल्या एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जानेवारीमध्ये अकुल बी धवन या १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा इलिनॉय विद्यापीठाजवळील इमारतीच्या मागील पोर्चमध्ये हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला. अकुल २० जानेवारीच्या पहाटे बेपत्ता झाला होता, यानंतर तो मृतावस्थेत आढळून आला.

अमेरिका हा जगभरातील विद्यार्थ्यांसाठी आवडता देश आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेने २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षात १०,५७,१८८ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणी केल्या. यापैकी २६,८९,२३ विद्यार्थी भारतीय होते. परंतु अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या वाढत्या मृत्युच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

हा मुद्दा संसदेतही मांडण्यात आला. २ फेब्रुवारी रोजी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, प्राप्त माहितीनुसार “२०१८ पासून परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या ४०३ घटना घडल्या आहेत. यात नैसर्गिक मृत्यू, अपघात, वैद्यकीय परिस्थिती आदि कारणांचा समावेश आहे”.

हेही वाचा : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत?

यावर बोलतांना ते म्हणाले की, ४०३ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू अमेरिकेत झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य आहे. “भारतीय विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात; तेव्हा भारतीय वाणिज्य दूतावास त्यांच्याशी संपर्कात राहतो. भारतीय विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांशी नियमित संवाद साधण्यासाठी भारतीय वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भेट देतात,” असेही ते म्हणाले.