शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन आणि देशातून पलायन करून तीन आठवड्याहून अधिकचा कालावधी झाला आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. बांगलादेशमधील राजकीय गोंधळ आणि अशांततेनंतर देश सामान्य स्थितीत परतत असताना देशात पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे नवीन चकमकी सुरू झाल्या असून या संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी (२५ ऑगस्ट) ढाका येथील सचिवालयाजवळ अन्सार गट आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक झाली आणि जवळपास ५० लोक जखमी झाले. नेमके काय घडले? हिंसक चकमकीचे कारण काय? सविस्तर जाणून घेऊ.
रविवारी घडलेल्या घटनेचे कारण काय?
रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ढाका विद्यापीठाच्या वेगवेगळ्या सभागृहातील विद्यार्थी शिक्षक-विद्यार्थी केंद्राच्या (टीएससी) राजू स्मारक शिल्पाजवळ जमले होते आणि अन्सार गटाचा उल्लेख ‘हुकूमशाहीचे एजंट’ असा करत होते. अन्सार सदस्यांच्या एका गटाने काही लोकांना ताब्यात घेतले होते; ज्यात स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनचे समन्वयक आणि सल्लागार नाहिद इस्लाम यांचा समावेश होता. त्यांच्यासह समन्वयक सरजीस आलम आणि हसनत अब्दुल्ला यांनाही ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या; ज्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अन्सार सदस्यांचा प्रतिकार करण्यासाठी सचिवालय परिसरात पोहोचले आणि ‘हुकूमशहांचे एजंट’ अशी घोषणाबाजी करू लागले.
हेही वाचा : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआरमध्ये शाळेचे नाव का? कायदा काय सांगतो?
यापूर्वी, हसनत अब्दुल्ला यांनी फेसबुक पोस्टमध्ये अन्सारचे माजी महासंचालक मेजर जनरल आणि शेख हसीना सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाचे माजी उपमंत्री एकेएम इनामुल हक शमीम यांचे मोठे बंधू एकेएम अमिनुल हक यांना सचिवालयाच्या सतत नाकाबंदीसाठी जबाबदार धरले होते. त्यांनी ढाका विद्यापीठातील राजू स्मारक शिल्पासमोर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहनही केले होते.
अन्सार गट काय आहे?
बांगलादेश अन्सार आणि व्हिलेज डिफेन्स फोर्स याला अन्सार वाहिनी किंवा अन्सार व्हीडीपी म्हणूनही ओळखले जाते. हा बांगलादेशातील अंतर्गत सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेला निमलष्करी सहाय्यक दल आहे. हे नाव अरबी शब्द ‘अन्सार’पासून आले आहे; ज्याचा अर्थ ‘स्वयंसेवक’ किंवा ‘मदतनीस’ असा होतो. ‘प्रथम आलो’च्या वृत्तानुसार अन्सारचे ६.१ दशलक्ष सदस्य आहेत. सध्याच्या कायद्यांनुसार, अन्सार दलाला ‘शिस्तबद्ध दल’ म्हणून ओळखले जाते.
अलीकडे, अन्सार सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्यांच्या राष्ट्रीयीकरणासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, रविवारी त्यांनी गृह व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम (निवृत्त) यांच्याशी चर्चा करून त्यांचा सुरू असलेला विरोध स्थगित करण्याचा आणि कामावर परतण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांची प्रमुख मागणी अन्सार कर्मचाऱ्यांवर सध्या लादलेला सहा महिन्यांचा विश्रांतीचा नियम रद्द करणे ही होती. ही मागणी बैठकीत मंजूर करण्यात आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढे काय झाले?
सरकारकडून अनेक आश्वासने देऊनही अन्सार सदस्यांनी सचिवालयातील त्यांच्या नाकाबंदीतून हटण्यास नकार दिला, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे हजारो विद्यार्थी लाठ्या घेऊन सचिवालयात जमा झाले. सुरुवातीला विद्यार्थी सचिवालय परिसरात पोहोचल्याने अन्सार सदस्य माघारी फिरले. मात्र, त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग केल्याने हिंसाचाराचा भडका उडाला. हाणामारीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विटा फेक झाली. काही वेळातच चकमकीच्या ठिकाणी पोलीस आणि लष्कर तैनात करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अश्रुधूर फेकण्यात आल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे किमान ५० जण जखमी झाले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी रात्री १० वाजल्यानंतरच संघर्ष कमी झाला आणि ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, सल्लागार नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद सचिवालयातून बाहेर आले आणि त्यांनी शांततेचे आवाहन केले. नाहिद इस्लाम म्हणाले की, अन्सार सदस्यांनी केलेली निदर्शने हा कटाचा एक भाग आहे. कारण त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळूनही त्यांचे आंदोलन सुरू ठेवले. अन्सारचे प्रमुख मेजर जनरल अब्दुल मोतालेब सज्जाद महमूद यांनी नंतर ‘डेली स्टार’ला सांगितले की, ज्यांनी विरोध सुरू ठेवला ते अन्सार सदस्य नव्हते, ते बाहेरचे आहेत. ते अन्सार गटाचा गणवेश घालून आले होते आणि त्यांचा हेतू वेगळा होता. चकमकीच्या एका दिवसानंतर अंतरिम सरकारने एका उपकमांडंटसह अन्सार गटाच्या नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.
बांगलादेशात शांतता परत येईल का?
ढाका पोलिसांनी बांगलादेश सचिवालय आणि मुख्य सल्लागारांचे अधिकृत निवासस्थान जमुना याच्या आजूबाजूच्या भागात कोणत्याही प्रकारची सभा, मेळावा, मिरवणूक किंवा निदर्शने करण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी एका दूरचित्रवाणीशी बोलताना लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. “मी फक्त सांगेन की, तुम्हाला धीर धरावा लागेल. अनेक आव्हानांवर एका रात्रीत मात करणे कठीण आहे,” असे ते म्हणाले. अलीकडील सरकारविरोधी आंदोलनांदरम्यान अनेक लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याच्या विविध मागण्यांचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केले.
विविध क्षेत्रांत सुधारणा करून अंतरिम सरकार देशात मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरक्षणाविरोधात बांगलादेशमध्ये जुलैपासून आंदोलने सुरू आहेत आणि हिंसाचार वाढत गेला आहे. या निषेधांमुळे ऑगस्टच्या सुरुवातीला शेख हसीना यांना देशातून पलायन करणे भाग पडले होते. त्यांनी भारताकडे आश्रय मागितला. त्यांच्या पलायनानंतर अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हल्ले होऊन देशात आणखी हिंसाचार उसळला. युनायटेड नेशन्स (यूएन) मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार, १६ जुलै आणि ११ ऑगस्टदरम्यान देशात जवळपास ६५० लोक मारले गेले.
हेही वाचा : हिजबुलने इस्रायलवर डागली ३२० रॉकेट्स; इस्रायल-हमास युद्धात या दहशतवादी संघटनेचे महत्त्व काय?
‘बांगलादेश नॅशनल हिंदू ग्रँड अलायन्सने सांगितले की, शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याक समुदायाला ४८ जिल्ह्यांतील २७८ ठिकाणी हल्ले आणि धमक्यांचा सामना करावा लागला. त्यांनी याला ‘हिंदू धर्मावरील हल्ला’ असे म्हटले. हिंसाचाराच्या वृत्तांदरम्यान, युनूसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीदेखील संवाद साधला आणि देशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले होते.
© IE Online Media Services (P) Ltd