उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून चौथ्या टप्प्यापर्यंत सर्वच पक्षांकडून तिकीट निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका ७ टप्प्यात होत असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी भाजपाने १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. यासोबतच भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मतदारसंघाचीही घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या गोरखपूर शहर मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबीच्या सिराथू मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७% आमदारांची तिकिटे कापली:

पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात एकूण २३१ जागांसाठी मतदान होणार असून भाजपाने १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या ३२ आमदारांची तिकिटे कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने जातीय समीकरणाची पुरेपूर काळजी घेतली असून, तिकीट वाटपात मागासलेल्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मात्र, अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपाने फारसे तिकीट कापले नसल्याचे म्हटले  जात आहे. मात्र, यादीत आतापर्यंत १७ टक्के आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.

मागासवर्गीयांना प्राधान्य :

भाजपाने तिकीट वाटपात जातीय समीकरणाची पुरेपूर काळजी घेतली असून तिकीट वाटपात मागास समाज व दलित समाजाला प्राधान्य दिले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत आतापर्यंत मागासवर्गीय आणि दलित समाजातील उमेदवारांना ११५ तिकिटे मिळाली आहेत. भाजपाने ओबीसी समाजातील ७७ तर एससी समाजातील ३८ लोकांना तिकिटे दिली आहेत. अशाप्रकारे बघितले तर भाजपाने मागासलेल्या आणि दलित समाजातील उमेदवारांना ५९% तिकिटे दिली आहेत. दुसरीकडे भाजपाने सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत ८० तिकिटे वाटली आहेत. अशाप्रकारे भाजपाने सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ४१ टक्के तिकिटे दिली आहेत. दुसरीकडे, भाजपाने पहिल्या यादीत पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटांना आकर्षित करण्यासाठी १६ जाट उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत.

१४% महिलांना तिकीट:

भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना महिलांना प्राधान्य दिलंय. भाजपाने २६ महिलांना तिकीट दिले आहे. म्हणजेच भाजपाने १४% तिकिटे महिलांना दिली आहेत.

कानपूरच्या माजी पोलीस आयुक्तांना तिकीट:

भाजपाने आपल्या यादीत कानपूरचे माजी पोलीस आयुक्त असीम अरुण यांनाही तिकीट दिले आहे. असीम अरुण यांना कन्नौज एससी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी असीम अरुण यांनी व्हीआरएस घेऊन राजकारणात प्रवेश केला होता.

प्रसिद्ध उमेदवारांचीही तिकिटे कापली :

भाजपाने आतापर्यंत ३२ आमदारांची तिकिटे कापली असून त्यामध्ये काही प्रसिद्ध नावेही आहेत. भाजपाने बरेली कॅंटमधून राजेश अग्रवाल यांना तिकीट दिले नसून बरेलीतील बिथरी चैनपूरमधून प्रसिद्ध आमदार राजेश मिश्रा उर्फ ​​पप्पू भरतौल यांचेही तिकीट कापले आहे. अमरोहा येथील आमदार संगीता चौहान यांना भाजपाने तिकीट दिले नाही, तसेच फतेहाबादमधून जितेंद्र वर्मा यांचे तिकीटही कापले. भाजपाने गोरखपूरमधून चार वेळा आमदार राहिलेले राधामोहन दास अग्रवाल यांचे तिकीट कापले आहे. मात्र, त्यांच्या जागी योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

पक्षांतर करणाऱ्यांनाही तिकीट :

भारतीय जनता पक्षाने पक्षांतर करणाऱ्या आमदारांनाही आपल्या यादीत स्थान दिले आहे. समाजवादी पक्षातून भाजपामध्ये दाखल झालेले विधानसभेचे उपसभापती नितीन अग्रवाल यांना भाजपाने हरदोईमधून उमेदवारी दिली आहे. तर रायबरेली सदरमधून आमदार अदिती सिंह यांना तिकीट दिले आहे. रायबरेलीच्या हरचंदपूरमधून काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आमदार राकेश सिंह यांना तिकीट दिले आहे. तर मुलायम सिंह यादव यांचे मित्र हरी ओम यादव यांना सिरसागंजमधून तिकीट देण्यात आले आहे. बसपामधून भाजपामध्ये आलेल्या अनिल सिंह यांना भाजपाने उन्नावच्या पूर्वा येथून तिकीट दिले आहे. हाथरसच्या सादाबाद मतदारसंघाचे आमदार रामवीर उपाध्याय यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांना सादाबादमधून तिकीट दिले आहे.

भाजपाने आतापर्यंत जाहीर केलेल्या यादीत मागासवर्गीय आणि दलितांना जवळपास ६० टक्के तिकिटे देण्यात आली आहेत. यातून भाजपाने ते मागासवर्गीयांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मागासवर्गीय नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे गेल्या काही आठवड्यांत भाजपाचे नुकसान होण्याची भीती होती. मात्र, आता भाजपाने मागासवर्गीयांना जास्त तिकीट देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bjp announces 60 percent tickets to obc backward and dalits in up election hrc
First published on: 23-01-2022 at 13:20 IST