Indian Army Purvi Prachand Prahar Drill : गुजरातमधील कच्छच्या रणात पाकिस्तानी सीमेलगत भारतीय सैन्यदलाने नुकताच ‘त्रिशूल’ सराव केला. या लष्करी सरावामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसल्याचे सांगितले जाते. जगभरातील अनेक देशांमध्ये या सरावाची चर्चा होत असताना भारतीय लष्कराने आणखी एका सरावाची तयारी केली आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशात हा सराव होणार आहे. संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील माहिती दिली आहे. यानिमित्ताने भारतीय सैन्यदलाचा नवीन सराव कसा असेल? सैन्यदलाकडून सातत्याने लष्करी सराव केले जात आहेत, त्याविषयीचा हा आढावा…

संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे लवकरच भारतीय सशस्त्र दलांचा ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ हा लष्करी सराव होणार आहे. या सरावात तिन्ही सैन्य दलांचा समावेश असणार आहे. युद्धसज्जता वाढवणे, तांत्रिक समन्वय साधणे आणि कार्यात्मक एकात्मता मजबूत करणे हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ११ नोव्हेंबरपासून या सरावाला सुरुवात होणार आहे. या सरावामुळे भारतीय सैन्याच्या तिन्ही शाखा, म्हणजेच भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यातील ताळमेळ अधिक घट्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

‘पूर्वी प्रचंड प्रहार’ म्हणजे काय?

अधिकृत निवेदनानुसार, ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ या सरावात सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमधील युद्ध क्षमता आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्यावर भर दिला जाईल. हा सराव १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, त्यामध्ये पायदळ, नौदल आणि वायुदल यांच्या संयुक्त मोहिमांची संपूर्ण रूपरेषा प्रदर्शित केली जाणार आहे. हा सराव भारताने अंगीकारलेल्या ‘थिएटर कमांड’ संकल्पनेचा प्रत्यक्ष नमुना असणार आहे. या लष्करी सरावात जमीन, आकाश आणि समुद्र अशा तिन्ही क्षेत्रांतील समन्वय साधण्यावर लक्ष दिले जाणार आहे. या सरावामुळे भविष्यातील संघर्षांसाठी भारतीय सशस्त्र दलांची वाढलेली सज्जता दिसून येईल, असे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी १ नोव्हेंबर रोजी सांगितले होते.

आणखी वाचा : अमेरिकन सैन्यात भरती होऊन मिळवता येतं नागरिकत्व? भारतीय वंशाच्या महिलेनं काय सांगितलं?

‘पूर्वी प्रचंड प्रहार’ सरावाचे उद्दिष्ट काय?

कर्नल महेंद्र रावत म्हणाले, “या सरावामध्ये स्पेशल फोर्सेस, मानवरहित लढाऊ प्रणाली, अचूक तंत्रज्ञान प्रणाली आणि नेटवर्क आधारित ऑपरेशन केंद्रे यांचा वास्तविक परिस्थितीत समन्वित वापर केला जाईल. युद्धाच्या काळात सैन्यातील परस्पर सुसंवाद वाढवणे, परिस्थितीचे आकलन मजबूत करणे आणि कमांड व नियंत्रण संरचना तपासणे असे ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सरावादरम्यान नवीन लष्करी तंत्र, रणनीती आणि कार्यपद्धती तपासून त्यांची परिणामकारकता पडताळली जाणार आहे, ज्यामुळे सैन्यदलांची लढाऊ चपळता आणि अनुकूलता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

अरुणाचलमधील सराव नेमका कशासाठी?

  • ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ हा सराव भारतीय सैन्यदलातील एकीबाबतचा महत्त्वाचा टप्पा आहे.
  • यापूर्वी लष्कराने २०२३ मध्ये ‘भाला प्रहार’ सराव केला होता.
  • गेल्या वर्षी ‘पूर्वी प्रहार’ सरावाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
  • अरुणाचल प्रदेशाला लागून चीनची सीमा आहे.
  • या सीमेवरून दोन्ही देशांत अनेकदा तणाव निर्माण झालेला आहे.
  • या पार्श्वभूमीवर ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ हा सराव भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
  • अलीकडच्या काळात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्य पाळत वाढवत आहे.
  • संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा ‘झांगनान’ म्हणजे तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनकडून दावा केला जातो.
  • विशेष म्हणजे या भागाला चीनच्या अधिकृत नकाशावरही स्थान देण्यात आले आहे.
  • मात्र, चीनचा हा दावा भारताने अनेकदा फेटाळून लावला आहे.

चीनकडून कुरघोडीचा प्रयत्न

भारताने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली असून, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग असल्याचे म्हटले आहे. भारताच्या पूर्वेकडील सीमांवरील चीनकडून वाढणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा सराव आयोजित केला जात आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चीनने तिबेटमधील लुन्झे हवाई तळावर (मॅकमोहन रेषेच्या सुमारे ४० किलोमीटर उत्तरेस) ३६ मजबूत निवारे आणि प्रशासकीय इमारतींचे बांधकाम केले आहे. २०२० च्या सीमावादामुळे भारत आणि चीनमधील तणाव काहीसा निवळला असला तरीही या हालचालींमुळे भारताला सतर्क राहणे आवश्यक असल्याचे माजी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक? भारताला मिळणार ‘इतक्या’ कोटींचा परतावा?

त्रिशूल सरावातून पाकिस्तानला इशारा

दरवर्षी तीनही सैन्यदलांचे मोठे युद्ध सराव आयोजित केले जातात. यामध्ये आक्रमक आणि बचावात्मक दोन्ही प्रकारच्या सरावांचा समावेश असतो. या सरावातून युद्ध योजनेचे प्रमाणीकरण, विद्यमान मानक प्रणाली (एसओपी) आणि प्रक्रियेत सुधारणा करता येतात. पाकिस्तानी सीमेलगत सर क्रीक भागात भारतीय सैन्यदलाने नुकताच १२ दिवसीय त्रिशूल सराव केला. या सरावात सुमारे २० हजार सैनिक, मुख्य युद्ध रणगाडे, तोफा, हल्ला चढविण्याची क्षमता राखणारी हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्रे मैदानात उतरवण्यात आली. हवाई दलाने राफेल आणि सुखोई – ३० एमकेआयसारख्या लढाऊ विमानांसह हेलिकॉप्टर्स, दूरनियंत्रकाने संचलित होणारी विमाने, हवेत इंधन भरणारी आणि हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देणारी विमानेही सहभागी केली होती. भारतीय नौदलाच्या काही युद्धनौका आणि विनाशिकाही गुजरात किनाऱ्यावर तैनात झाल्या होत्या. त्रिशूल सरावातून भारताने कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानला इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.