विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विदेशातील अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १.८ दशलक्षाहून अधिक म्हणजेच १८ लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी सध्या विदेशात शिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी हा आकडा १३ लाख होता, त्यामुळे विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे, हे यातून स्पष्ट होतं.

यातून भारतातील तरुणांची बदलती मानसिकतादेखील दिसून येते. परंतु, इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विदेशात का जात आहेत? याचा फायदा कोणत्या देशांना होत आहे? बदलते व्हिसा नियम, आर्थिक दबाव या परिस्थितीला कसे आकार देत आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन ही सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीची ठिकाणे

परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२५ च्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन ही सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत.

देश भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीची कारणे
अमेरिका – अमेरिकेत तब्बल ३,३१,६०२ भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
– अमेरिकेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी २३ टक्के वाढ झाली आहे.
– अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आता भारतातील असून भारताने चीनलादेखील मागे टाकले आहे.
– सध्या अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कडक कारवाईचा सामना करत आहेत. मात्र, असे असले तरी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अजूनही अमेरिका भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.
– ट्रम्प प्रशासन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल करत असल्याने याचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
कॅनडा – बहुसांस्कृतिक समाज, उच्च दर्जाचे शिक्षण आणि कायमस्वरूपी निवासस्थान मिळविण्याचे सोपे मार्ग असल्याने कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण राहिले आहे.
– मात्र, गेल्या काही महिन्यात भारतीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
– परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, २०२३ मध्ये कॅनडात २,३३,५३२ भारतीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, २०२४ मध्ये ही संख्या १,३७,६०८ पर्यंत घसरली आहे.
– कॅनडातील कठोर व्हिसा नियम आणि भारत व कॅनडातील राजनैतिक तणावामुळे ही परिस्थिती असल्याचे सांगितले जा आहे. या अडचणी असूनही कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांचे एक पसंतीचे ठिकाण राहिले आहे.
ब्रिटन– अमेरिका आणि कॅनडानंतर ब्रिटन भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.
– ब्रिटनमध्ये ९८,८९० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा मागील वर्षांपेक्षा कमी आहे.
– २०२४ मध्ये ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे २८ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०२३ मध्ये ही संख्या १,३६,९२१ वरून २०२४ मध्ये ९८,८९० पर्यंत घसरली. याचाच अर्थ असा की, तब्बल ३८,०३१ विद्यार्थ्यांची घट झाली.
– कठोर व्हिसा नियम, वाढत्या शिक्षण आणि राहणीमानाच्या खर्चामुळे ब्रिटनकडे आता कमी विद्यार्थी आकर्षित होत आहेत.
– असे असूनही, ब्रिटनमधील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि एक वर्षाच्या मास्टर्स प्रोग्राम्समुळे अनेक विद्यार्थी आजही ब्रिटनची निवड करताना दिसत आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण जाण्याची ओढ का?

भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण आणि कामासाठी परदेशात जाण्याच्या संधी शोधत असतात, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

भारतातीत शिक्षण संस्थांमध्ये मर्यादित प्रवेश

आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या प्रमुख भारतीय संस्था उच्च दर्जाचे शिक्षण देतात, परंतु त्यांच्याकडे मर्यादित जागा आहेत. स्पर्धेमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना परदेशातील पर्यायांकडे वळावे लागते.

उत्तम करिअर आणि स्थलांतराच्या संधी

आंतरराष्ट्रीय पदव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक रोजगार बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळते. अमेरिका आणि कॅनडासारखे देश अभ्यासासह काम करण्याची आणि कायमस्वरूपी निवासस्थानाचे मार्गही प्रदान करतात, त्यामुळे या देशांमध्ये शिक्षण घेण्याची ओढ वाढते.

युरोपमध्ये परवडणारे शिक्षण

अनेक ठिकाणी शिक्षणाचा खर्च वाढल्याने बरेच भारतीय विद्यार्थी जर्मनीकडे वळत आहेत. जर्मनीमध्ये बहुतांश सार्वजनिक विद्यापीठे कमी शुल्क आकारतात आणि काही विद्यापीठे अशीही आहेत, ज्या कोणताही शुल्क आकारत नाहीत. शिष्यवृत्ती आणि परवडणाऱ्या राहणीमान खर्चाने विद्यार्थी फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांनादेखील प्राधान्य देताना दिसत आहेत

आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती

अनेक परदेशी विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवत आहेत. त्यात विशेषतः ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधील विद्यापीठांचा समावेश आहे. या आर्थिक प्रोत्साहनांमुळे कुटुंबांवरील भार कमी होतो आणि दर्जेदार शिक्षणाची संधी मिळते, हेदेखील विदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे.

जागतिक अनुभव

विदेशात शिक्षण घेतल्याने शैक्षणिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना जागतिक संस्कृतींचा अनुभव घेण्याची, संवाद कौशल्ये सुधारण्याचीदेखील उत्तम संधी मिळते. जगभरात स्थलांतर धोरणे विकसित होत आहेत आणि नवीन शिक्षण केंद्रे उदयास येत आहेत, त्यामुळे पूर्वीपेक्षा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.