Premium

विश्लेषण: नौदलासाठी तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा विचार का होतोय?

भारतीय नौदलासाठी ४५ हजार टन वजनाची विक्रांतसारखी आणखी एक विमानवाहू युद्धनौका देशांतर्गत बांधणीच्या प्रस्तावावर संरक्षण सामग्री खरेदी मंडळ सध्या विचार करत आहे.

third aircraft carrier being considered for the Navy
सध्या भारतीय नौदलाकडे रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य आणि देशांतर्गत निर्मिलेली आयएनएस विक्रांत या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय नौदलासाठी ४५ हजार टन वजनाची विक्रांतसारखी आणखी एक विमानवाहू युद्धनौका देशांतर्गत बांधणीच्या प्रस्तावावर संरक्षण सामग्री खरेदी मंडळ सध्या विचार करत आहे. पहिल्या स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या आकारमानाइतकीच ही नवीन विमानवाहू नौका असेल. मात्र, तिच्या रचनेत काही बदल व अन्य सुधारणा केल्या जातील. सागरी क्षेत्रावर आपले प्रभुत्व कायम राखण्यासाठी नौदलास तीन विमानवाहू नौकांची गरज तज्ज्ञांनी वारंवार मांडली आहे. या निमित्ताने त्या दिशेने प्रत्यक्षात कृतिशील विचार होत आहे.

सद्यःस्थिती आणि प्रस्ताव काय?

सध्या भारतीय नौदलाकडे रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य आणि देशांतर्गत निर्मिलेली आयएनएस विक्रांत या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. पहिल्या स्वदेशी युद्धनौकेच्या बांधणीला दशकभराचा कालावधी लागला होता. याच आकारमानाची आणखी एका विमानवाहू नौका बांधणीचा प्रस्ताव नौदलाने सादर केला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ४० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्वदेशी विक्रांतमध्ये संयुक्त गॅस टर्बाईन प्रणालीतून ८० मेगावॉट वीज मिळते. त्यायोगे ती ताशी २८ सागरी मैल वेगात मार्गक्रमण करू शकते. सामान्य स्थितीत ती १८ सागरी मैल वेगाने प्रवास करते. साडेसात ते आठ हजार सागरी मैलाचे अंतर तिला पार करता येते. बांधणीचा कालावधी लक्षात घेता आयएनएस विक्रमादित्यची निरोप घेण्याची वेळ येईल, तत्पूर्वी नवी युद्धनौका दाखल होईल. म्हणजे तिची जागा नव्या नौकेला देता घेईल. या प्रस्तावास संरक्षण सामग्री खरेदी मंडळाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यांची मान्यता मिळाल्यास हा विषय पुढे संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे अंतिम मान्यतेसाठी जाईल.

आणखी वाचा-‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार? 

स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वरूप विक्रांतसारखेच का हवे?

नौदलाकडून विशाल आकाराच्या, अधिक क्षमतेच्या विमानवाहू नौकेचा अभ्यास होत आहे. त्या अंतर्गत इलेक्ट्रिकवर आधारित, अद्ययावत तंत्रज्ञान (कॅटोबार तंत्र) सामावणाऱ्या ६५ हजार टन वजनी युद्धनौकेचा विचार होता. तथापि, अशा विमानवाहू नौकेस प्रचंड खर्च आहे. शिवाय बांधणीत बराच काळ जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी नौदल विक्रांतसारख्या क्षमतेच्या दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू नौकेच्या निर्णयाप्रत आले आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी मध्यंतरी ते अधोरेखित केले होते. विक्रांतचे २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच असे अवाढव्य स्वरूप आहे. १४ मजली नौकेच्या पायावर डोलारा सांभाळणारी पाच विशेष स्वरूपाची बांधकामे (सुपर स्ट्रक्चर्स) आहेत. १७०० जणांच्या चालक दलास डोळ्यासमोर ठेवून २३०० निरनिराळे कप्पे तयार करण्यात आले आहेत. नव्या युद्धनौकेच्या रचनेत काही बदल नौदलास अपेक्षित आहेत. तिची बांधणी कोचीन शिपयार्डकडून केली जाईल.

संसदीय स्थायी संरक्षण समितीची निरीक्षणे काय?

कोणत्याही परिस्थितीचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नौदलास तिसऱ्या विमानवाहू नौकेची अनिवार्यता संसदीय स्थायी संरक्षण समितीने मांडली आहे. विमानवाहू नौकेच्या नियोजनापासून ती कार्यान्वित होण्यापर्यंत बराच कालावधी असतो. त्यामुळे अर्थसंकल्पावर एकदम भार न पडता वर्षनिहाय अर्थसंकल्पीय व्यवस्था करता येईल. राष्ट्रीय सागरी हितसंबंध जपण्यासाठी भारतीय नौदलास अनेक मोहिमा हाती घ्याव्या लागतात. हिंद महासागर प्रदेशात सुरक्षेसंदर्भात अनेक आव्हाने आहेत. या क्षेत्रातील प्रमुख व्यापारी मार्गांवरून तब्बल एक लाख २० हजार जहाजे प्रवास करतात. कोणत्याही वेळी १३ हजार जहाजे या क्षेत्रात असतात. चाचेगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा हा परिसर केंद्रबिंदू मानला जातो. नैसर्गिक आपत्तीचे संकट असते. आपत्कालीन प्रसंगी मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पुरविणे, ही भारतीय नौदलाची महत्त्वाची भूमिका असल्याचे समितीने म्हटले आहे.

आणखी वाचा-‘राज्यातील सहकार क्षेत्र उदध्वस्त करण्याचा प्रयत्न’, केरळने केंद्र सरकारवर आरोप का केला?

तिसऱ्या नौकेची गरज का?

देशाला लाभलेली पूर्व आणि पश्चिम विस्तीर्ण किनारपट्टी, सागरी सामरिक क्षेत्रातील बदलती आव्हाने, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा अशा अनेक कारणांनी नौदलाच्या दोन्ही विभागांकडे (पूर्व व पश्चिम) प्रत्येकी एक आणि पर्यायी स्वरूपातील एक अशा तीन विमानवाहू नौकांची गरज वारंवार मांडण्यात आली आहे. आयएनएस विक्रांतच्या समावेशाने दोन्ही विभागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकी एक विमानवाहू नौका तैनात झाली. विमानवाहू नौकांची विशिष्ट कालावधीनंतर नियमित देखभाल-दुरुस्ती (रिफीट) केली जाते. सामान्य दुरुस्तीचा कालावधी चार महिने ते दीड वर्षापर्यंत असू शकतो. तर मोठ्या देखभाल दुरुस्तीसाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. अशा दुरुस्तीवेळी तिसरी विमानवाहू नौका पर्यायी स्वरूपात उपलब्ध असणार आहे.

फलित काय?

आयएनएस विक्रांतच्या बांधणीत ७६ टक्क्यांहून अधिक सामग्री व उपकरणे स्वदेशी आहेत. ज्यामध्ये २१ हजार ५०० टन विशेष दर्जाच्या धातूचाही समावेश आहे. त्या प्रकल्पाने कोचीन शिपयार्डसह देशातील शेकडो लहान-मोठ्या उद्योगांना नव्या संधी उपलब्ध झाल्या. हजारो कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. यानिमित्ताने नौकेवर लढाऊ विमानास उतरताना शक्तिशाली लवचिक तारांनी त्याला धावपट्टीवर रोखण्याचे (अरेस्टेड लॅंडिंग) तंत्रदेखील विकसित झाले. नव्या विमानवाहू नौकेच्या बांधणीतून आत्मसात झालेली कौशल्ये अधिक वृद्धिंगत करता येतील. विमानवाहू नौकेची अतिशय विस्तृत सागरी क्षेत्रावर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. सुदूर सागरातील (ब्लू वॉटर) संचारासाठी ती महत्त्वाची मानली जाते. भारतीय नौदलाचे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आधीपासून वर्चस्व आहे. विमानवाहू युद्धनौकांची संख्या वाढल्याने हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र आणि त्यापलीकडे प्रभाव विस्तारता येईल. चीनचे नौदल आगामी काळात तीन विमानवाहू नौकांसह हिंद महासागरात वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आव्हाने पेलण्यासाठी तिसरी विमानवाहू नौका भारतीय नौदलासाठी महत्त्वाची राहणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why is a third aircraft carrier being considered for the navy print exp mrj

First published on: 27-09-2023 at 09:10 IST
Next Story
विश्लेषण: राजस्थानच्या वाळवंटात कमळ? राहुल यांना का वाटते काँग्रेस विजयाविषयी शंका?