विश्लेषण : बापरे! १० ते १५ रुपयांना एक लिंबू... पण अचानक का वाढलेत लिंबांचे दर? | Why lemons are so costly now scsg 91 | Loksatta

विश्लेषण : बापरे! १० ते १५ रुपयांना एक लिंबू… पण अचानक का वाढलेत लिंबांचे दर?

१० किलोमध्ये सामान्यपणे ३५० ते ३८० लिंबं असतात म्हणजे एका लिंबांची किंमत पाच रुपये इतकी होते.

विश्लेषण : बापरे! १० ते १५ रुपयांना एक लिंबू… पण अचानक का वाढलेत लिंबांचे दर?
पुण्यामध्येही एक लिंबू १० ते १५ रुपयांना मिळतंय (फाइल फोटो सौजन्य : पीटीआय)

मागील आठवड्यामध्ये लिंबांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये ही दरवाढ झाल्याचं दिसून आलंय. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये तर लिंबं ३५० रुपये किलो दराने विकली जात होती. लिंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणात किंमत मिळाल्याचं यापूर्वी पाहिलं नसल्याचं व्यापारांनाही म्हटलंय. एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हैदराबादमध्ये एक लिंबू १० रुपयांना विकलं जात आहे. तर गुजरातमध्ये लिंबांचा दर हा २०० रुपये किलो इतका आहे. पुण्यातही एक लिंबू १० ते १५ रुपयांना विकलं जात आहे.

“लिंबांचे दर फार वाढले आहेत. पूर्वी आम्ही लिंबांचं पोत हे ७०० रुपयांना विकत घ्यायचो. आज त्याच्यासाठी आम्हाला साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. आम्ही एक लिंबू १० रुपयांना विकत आहोत. मात्र एवढ्या जास्त किंमतीला लिंबांना गिऱ्हाईक नाहीय. कोणालाही लिंबांच्या किंमती एवढ्या वाढल्याचं पटत नाही त्यामुळेच ग्राहकांकडून खरेदी न झाल्याने लिंबांच्या खपावर परिणाम झालाय,” असं एका व्यापाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

देशात लिंबांचं उत्पादन किती आहे?
देशामध्ये ३.१७ लाख हेक्टरवर लिंबांचं उत्पादन घेतलं जातं. एका वर्षभरामध्ये एका लिंबाच्या झाडाला तीन वेळा फळं येतं. आंध्र प्रदेश हे देशातील सर्वाधिक लिंबू उत्पादन घेणार राज्य आहे. या राज्यामधील ४५ हजार हेक्टर जमीन या पिकाखाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा आणि तामिळनाडू ही राज्ये सुद्धा लिंबू उत्पादनात आघाडीवर आहेत.

सामान्यपणे आपण ज्याला लिंबू म्हणतो त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये साधं लिंबू जे पिवळ्या रंगाचं असतं ते आणि दुसरं हिरव्या रंगाचं मोठ्या आकाराचं लिंबू ज्याला ईडलिंबू असं म्हणतात. ईडलिंबांचं उत्पादन उत्तर भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. देशात दर वर्षी ३७.१७ टन लिंबांचं उत्पादन घेतलं जातं. या सर्व लिंबांचा वापर देशातच केला जातो. लिंबांची आयत आणि निर्यात आपल्या देशात होत नाही.

उत्पादन कसं घेतलं जातं?
सामान्यपणे देशातील शेतकरी वर्षभर लिंबांचं उत्पादन घेतो. यासाठी बहर ट्रीटमेंट नवाची प्रक्रियेचा वापर केला जातो असं नागपूरमधील सेंट्रल सिट्रल रिसर्च इन्स्टीट्यूट चे मुख्य वैज्ञानिक असणारे डॉक्टर ए. ए. मुरकुटे सांगतात. यामध्ये सुरुवातील शेतकरी सुरुवातीला सिचंन आणि रसायनांचा वापर करत नाहीत. बागांची छाटणी केल्यानंतर ते सिंचन आणि रसायनांचा वापर करतात. त्यामुळे झाडाला फुलं चांगली येतात आणि फळं चांगल्या दर्जाचं मिळतं.

या झाडांना अंबे बहर, मृग बहर आणि हस्ता बहर असे तीन वेगवेगळे बहर एका वर्षात येतात. अंबे बहरमध्ये जानेवारी-फेब्रुवारीत फुलं येण्यास सुरुवात होते आणि एप्रिलमध्ये फळ येतं. मृग बहरमध्ये जून-जुलैदरम्यान फुलं येतात आणि ऑक्टोबरमध्ये फळं येतात. हस्ता बहरमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुलं येतात आणि मार्च महिन्यात फळं हाती लागतं. हे सर्व बहर अशापद्धतीने येतात की वर्षभर शेतकऱ्याला उत्पादन घेता येतं.

डॉक्टर मुरकुटेंच्या सांगण्यानुसार ६० टक्के फळं ही अंबे बहरमध्ये येतात. मृग बहरमध्ये ३० टक्के आणि १० टक्के हस्ता बहरमध्ये. मृग बहरमधील फळं ही प्रतिक्रिया केलेले पदार्थ बनवण्यासाठी प्रमुख्याने वापरतात तर इतर दोन बहरांमधील फळं थेट ग्राहकांना विकली जातात.

किंमती किती वाढल्या?
पुण्यातील घाऊक बाजारपेठेमध्ये १० किलो लिंबांची किंमत १ हजार ७५० रुपये इतकी आहे. १० किलोमध्ये सामान्यपणे ३५० ते ३८० लिंबं असतात म्हणजे एका लिंबांची किंमत पाच रुपये इतकी होते. किरकोळ दरांप्रमाणे पुण्यात एक लिंबू सध्या १० ते १५ रुपयांना मिळत आहे. पुरवठा कमी असल्याने लिंबांचे दर एवढे वाढल्याचं पुण्यातील व्यापारी सांगतात. सामान्यपणे पुण्याच्या बाजारामध्ये १० किलोच्या लिंबाच्या तीन हजार पिशव्या येतात पण सध्या ही संख्या एक हजारांपर्यंत आलीय. मुंबई, हैदराबाद, कोलक्यामध्ये घाऊक बाजारात लिंबं अनुक्रमे १२०, ६० आणि १८० रुपये किलो दराने विकली जात आहेत. हाच दर महिन्याभरापूर्वी १००, ४० आणि ९० असा होता.

लिंबांची किंमत वाढण्यामागील कारणं काय?
यामागील मुख्य कारण म्हणजे हस्त बहरमध्ये फळं आलेली नाहीत आणि अंबे बहरमध्येही फळांवर परिणाम झालाय. मागील वर्षी मान्सूनचा पाऊस चांगला झाला. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. लिंबाची झाडं ही आर्द्रतेबद्दल फार संवेदनशील असतात. त्यामुळेच पावसाचा परिणाम झाडांवर झाला. त्यामुळेच उत्पादनावर परिणाम झाला.

अंबे बहरअंतर्गत येणाऱ्या फळांवरही अवेळी आलेल्या पावसाचा परिणान झाला. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला फुलं धरण्याचं प्रमाण घसरलं. तापमान वाढीचाही फुलांच्या वाढीवर परिणाम झालं. आता लिंबांची सर्वाधिक मागणी असताना हस्ता बहर आणि अंबे बहरमधील फळं बाजारात आहेत. मात्र त्याची संख्या फारच कमी आहे. सामान्यपणे दोन सलग बहर अपयशी होतं नाहीत. मात्र असं झाल्यानेच लिंबाचे दर वाढलेत.

व्यापारी काय म्हणतात?
व्यापारी यासाठी इंधनदरवाढीला दोष देतात. इंधनाचे दर वाढल्याने भाज्यांचे दरही वाढले आहेत. “व्यापारी म्हणून माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये लिंबं जास्तीत जास्त १५० रुपये किलोपर्यंत विकली गेल्याचं आठवतं. मात्र आता लिंबांचा दर ३०० रुपये किलो इतका झालाय. डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढलाय. एका ट्रकमागील खर्च २४ हजारांनी वाढलाय,” असं टिळक सियानी या व्यापाऱ्याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. देशभरामध्ये हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळीकडे दिसून येतेय. आठवड्याभरापूर्वी लिंबांची किंमत ५० ते १०० रुपये किलो इतकी होती.

एएनआयशी बोलताना एका व्यापाऱ्याने लिंबांचे दर वाढण्यामागील कारणाबद्दल बोलताना लिंबांचा पुरेश्या प्रमाणात पुरवढा होत नसल्याचं म्हटलंय. उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी चांगली असली तरी तितक्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लिंबांचे दर वाढलेत असं व्यापारी सांगतात. “तीन आठवड्यांपूर्वी आम्ही ६० रुपये किलोने लिंबं विकत होतो. आता हा दर २०० रुपये किलोपर्यंत गेलाय. हा दरही लिंबाला सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत वाढल्याचं विशेष वाटतं,” असं व्यापाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलंय.

“यंदा लिंबाचं उत्पादन कमी झालं आहे. मात्र त्याचवेळी रमझान आणि वाढत्या तापमानामुळे लिंबांना मागणी वाढल्याने उत्पादन आणि पुरवठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने दरवाढ दिसून येत आहे,” असं व्यापाऱ्याने स्पष्ट केलंय.

फक्त लिंबांचेच दर वाढलेत का?
नाही केवळ लिंबांचेच दर वाढलेले नाही. तर हिरव्या मिर्च्या, कारली यासारख्या भाज्यांचे दर मागील काही आठवड्यांमध्ये दुपट्टीहून अधिक वाढलेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरांमध्ये फार वेगाने वाढ झाल्याने भाज्यांचे दर वाढलेत मात्र सर्वसामान्यांची मिळकत वाढली नसल्याने सर्व आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागतोय, असं ग्राहक सांगतात. अनेक ठिकाणी आता जास्त भाजी घेतल्यावर मिर्च्या मोफत देणं भाजीवाल्यांनी बंद केल्याचं ग्राहक तसेच भाजीवालेही सांगतात.

दर कधी कमी होणार?
लिंबाचे दर लगेच कमी होण्याची चिन्हं फार कमी दिसत आहेत. सध्या व्यापाऱ्यांकडे माल उपलब्ध होत नाहीय. आता लिंबांचा पुरवठा बाजारपेठेमध्ये ऑक्टोबरमध्येच होईल. त्यानंतरच लिंबांच्या दरांमध्ये घट झाल्याचं दिसेल असं म्हटलं जातंय. सध्या ज्या ठिकाणी फुलांवर वातावरणाचा आणि पावसाचा परिणाम झाला नाही अशा प्रदेशात अंबे बहरअंतर्गत आलेली फळं बाजारपेठेत विकली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-04-2022 at 10:28 IST
Next Story
विश्लेषण: शनीलाच लागली साडेसाती! ग्रहाभोवतालची कडी नष्ट होऊ लागलीयेत का?