देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका अशी ओळख असलेली चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तोट्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाची ओळख पांढरा हत्ती अशी झाली आहे. अशात आता मोनोरेल सेवा शनिवारी, २० सप्टेंरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात आली आहे. सेवा बंद करण्याची ही दुसरी वेळ असून एमएमआरडीएवर अनिश्चित काळासाठी सेवा बंद करण्याची नामुष्की का ओढवली याचा हा आढावा…

देशातील एकमेव मोनोरेल?

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने साधारणतः २००७-२००८  मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला. एमएमआरमध्ये १८५ किमीचे मोनोरेलचे जाळे विणण्यासाठी मोनोरेल प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला.  त्यानुसार अनेक मोनोरेल मार्गिकांची आखणी करण्यात आली. यातील पहिली मोनोरेल मार्गिका होती ती म्हणजे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल. या पहिल्या मार्गिकेचे काम एमएमआरडीएने हाती घेतले. जिथे रेल्वे पोहचलेली नाही, जिथे बेस्ट बसची सुविधा पुरेशी नाही अशा ठिकाणी मोनोरेल नेण्याचा निर्णय घेत त्या दृष्टीने मार्गिकेची आखणी करण्यात आली. दोन टप्प्यात ही मार्गिका बांधून पूर्ण करण्यात आली असून देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मुंबईत धावत आहे. मात्र त्याचवेळी मोनोरेल १ चा २० किमीचा मार्ग वगळता अंदाजे १६५ किमीचा मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने गुंडाळला. पहिली मोनोरेल मार्गिका अपयशी ठरत असल्याचे संकेत मिळाल्याबरोबर एमएमआरडीएने संपूर्ण प्रकल्प गुंडाळला. त्यामुळे मुंबईतील ही २० किमीची मोनोरेल मार्गिका असून देशातील पहिली आणि एकमेव ठरली आहे.

कशी आहे मार्गिका?

बेस्ट बसही पुरेशा संख्येने ज्या परिसरात जात नाही, अशा परिसरातून मोनोरेल मार्गिका नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक असा २० किमीच्या मोनोरेल मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यात मार्गिकेची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करत ४ फेब्रुवारी २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. वडाळा ते  संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमीचा टप्पा २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा टप्पा रखडला आणि अखेर फेब्रुवारी २०१९ मध्ये हा टप्पा पूर्ण झाला. संपूर्ण चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक वाहतूक सेवेत दाखल झाला. १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेवर चार डब्यांची मोनोरेल धावू लागली. २४६० कोटी रुपये खर्च करत देशातील पहिली मोनोरेल मार्गिका उभारण्यात आली. एका मोनोरेल गाडीची प्रवासी संख्या ५६२ अशी आहे.

मोनोरेल ठरलीय पांढरा हत्ती?

मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून आजपर्यंत मोनोरेला अपेक्षित प्रवासी संख्या मिळत नसल्याने मोनोरेल तोट्यात सुरू आहे. २४६० कोटी रुपये खर्च करत बांधण्यात आलेल्या या मार्गिकेचा २०२२-२३ मधील तोटा तब्बल २५० कोटी रुपयांचा आहे. तर २०२३-२४ मध्ये हा तोटा ५२९ कोटी रुपयांच्या घरात गेला होता. २०२४-२५ मधील तोट्याची रक्कम उपलब्ध नसली तरी ही संख्या ही बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. दरम्यान ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आठ वर्षातील कालावधीतील अर्थात २०१४ ते २०२२ वर्षातील उत्पन्न आणि खर्चामधील तफावत पाहता हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याचे स्पष्ट होते. कारण या आठ वर्षात २९. ७३ कोटी रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे. मात्र त्याच वेळी खर्च मात्र ३४३ कोटी रुपये इतका झाला आहे. खर्चाच्या तुलनेत ८.६५ टक्के इतका महसूल मिळाला आहे. प्रचंड आर्थिक नुकसान या प्रकल्पामुळे एमएमआरडीएचे होत असताना एमएमआरडीएकडून प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी आणखी ८०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नवीन १० गाड्यांसाठी ५९० कोटी तर मेट्रो ३ मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक मोनोशी जोडण्यासाठी १५० ते २०० कोटी खर्च केले जाणार आहेत. आर्थिक तोट्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याची मागणीही वाहतूक तज्ज्ञांकडून होत आहे. 

दुर्घटनांची मालिका सुरूच?

मोनोरेल सेवेत दाखल झाल्यापासून मोनोरेल गाड्यांमध्ये बिघाड, वीज पुरवठा खंडित होणे, गाड्यांचे भाग खराब होऊन तुटणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. २०१७ मध्ये मोनोरेलच्या एका डब्याला आग लागली होती आणि त्यात डबा जळून खाक झाला होता. त्यानंतर मोनोरेल सेवा नऊ महिने बंद होती. पुढे पुन्हा सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलवर अपघात, दुर्घटना घडतच आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच दिवशी दोन गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या. बंद पडलेल्या दोन गाड्यांपैकी एका गाडीतील ५८८ प्रवाशांना दरवाजा तोडत बाहेर काढावे लागले होते. तर दुसऱ्या गाडीला ओढत नेत प्रवाशांची सुटका करावी लागली होती. या घटना ताजा असतानाच सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) पुन्हा गाडी बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. मात्र सतत दुर्घटना, अपघात घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएने अनिश्चित काळासाठी मोनोची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोनो सेवा बंद?

जुन्या मोनोरेल गाड्यांची दुरवस्था आणि त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटनांमुळे या प्रकल्पावर, एमएमआरडीएवर मोठी टीका होत आहे. तर नवीन गाड्या मुंबईत दाखल होऊनही त्या सेवेत दाखल करता येत नसल्याचे चित्र आहे. नवीन गाड्या चालविण्यासाठी नवीन प्रणाली निर्माण करावी लागली असून यासाठीचे काम सुरू आहे. त्यामुळे एमएमआरडीएने नवीन प्रणाली तयार करण्यासाठी, मोनोरेलचे आधुनिकीकरण करण्यासाठी वेळ हवा असल्याने एमएमआरडीएने अनिश्चित काळासाठी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, २० सप्टेंबरपासून ही सेवा बंद होणार असून पुन्हा सेवा केव्हा सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही.