-मोहन अटाळकर

यंदाही गेल्‍या वर्षीप्रमाणे कापसाला विक्रमी भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असली, तरी बाजारात मात्र सध्‍या तरी तशी स्थिती नाही. शेतकरी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कापूस बाजारात आणत आहेत. त्‍यामुळे दर स्थिरावलेले आहेत. यंदा कापूस उत्‍पादन जास्‍त राहणार असून देशात सुमारे ३४४ लाख गाठींचे उत्‍पादन होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) या संस्‍थेने व्यक्त केला आहे. गेल्‍या वर्षीच्‍या हंगामातील ‘सीएआय’चा अंदाज चुकला होता. देशातील कापूस उत्‍पादन, मागणी, निर्यात, देशांतर्गत पुरवठा अशा सर्व बाबींचा परिणाम हा कापूस दरावर होत असतो. सध्‍या दरांबाबत मोठा संभ्रम आहे. सध्‍या किमतीवर आवकेचा दबाव दिसून आलेला नाही. मात्र, गेल्‍या वर्षीइतके दर मिळण्‍याची शक्‍यता कमीच असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

कापसाची गेल्‍या हंगामातील स्थिती काय होती?

जागतिक बाजारात २०२१-२२ च्‍या हंगामात रुईचे दर १७० सेंट प्रति पाउंड या उच्‍चांकावर पोहचले होते. त्‍यामुळे भारतात कापसाला १२ हजार ते १४ हजार रुपये प्रति क्विन्टल असा दर मिळाला होता. देशात पंजाब, हरियाणा, राजस्‍थान, गुजरात, महाराष्‍ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशा या प्रमुख राज्‍यांमध्‍ये कापसाचे उत्‍पादन घेतले जाते. गेल्‍या हंगामात देशातील अनेक भागात गुलाबी बोंडअळीच्‍या प्रादुर्भावाने पीक प्रभावित झाल्‍याने कापसाच्‍या उत्‍पादनात घट आली होती. किमान १०० लाख गाठी कापूस उत्‍पादनाची क्षमता असलेल्‍या महाराष्‍ट्रात गेल्‍या हंगामात ८१ लाख तर गुजरातमध्‍ये ९१.५ लाख गाठी उत्‍पादन झाले. इतर राज्‍यांमध्‍येही कापसाचे उत्‍पादन घटले होते.

चालू हंगामातील परिस्थिती कशी आहे?

सध्‍या महाराष्‍ट्रात कापसाची वेचणी सुरू आहे. आवक कमी असल्‍याने  काही बाजार समित्‍यांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. पण सर्वसाधारणपणे दर स्थिर होते. बहुतांश राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोहोचला. तर कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. ९ ते १० हजार रुपयांपर्यंत विकला जाणारा कापूस हा अतिरिक्‍त लांब धाग्‍याचा असून मध्‍यम, मध्‍यम लांब आणि लांब धाग्‍याच्‍या कापसाला ७ हजार ५०० ते  हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. जागतिक बाजारात रुईचे दर सध्‍या १०१ ते १०३ सेंट प्रति पाउंड दरम्‍यान स्थिर आहेत.

कापूस उत्‍पादनाचे अंदाज काय आहेत?

देशात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्‍थेला मानाचे स्‍थान आहे. १ ऑगस्‍ट ते ३० सप्‍टेंबर हा कालावधी कापूस वर्ष मानले जाते. ‘सीएआय’ आणि अमेरिकेतील कृषी विभागामार्फत (यूएसडीए) दरवर्षी कापूस वर्ष संपण्‍यापूर्वी तसेच वर्ष सुरू झाल्‍यानंतर आगामी हंगामातील कापसाच्‍या एकूण उत्‍पादनाचा अंदाज व्‍यक्‍त करतात. कापड व सूत उद्योग क्षेत्रात या संस्‍थांकडून व्‍यक्‍त केल्‍या जाणाऱ्या अंदाजाला विशेष महत्त्‍व दिले जाते, पण हे अंदाज कधी-कधी फोलही ठरतात. २०२१-२२ च्‍या हंगामात देशात ३६२ लाख गाठींचे उत्‍पादन होईल, असा अंदाज ‘सीएआय’ ने तर ३४५ लाख गाठींच्‍या उत्‍पादनाचा अंदाज ‘यूएसडीए’ने व्‍यक्‍त केला होता. प्रत्‍यक्षात देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाची आवक ३०७ लाख गाठींची होती. यंदा ३४४ लाख गाठींच्‍या उत्‍पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने वर्तवला आहे.

कापसाच्‍या वापरात घट झाली आहे का?

देशात २०२१-२२मध्‍ये कापसाचा एकूण वापर ३१८ लाख गाठींचा होता.  मात्र चालू हंगामात कापसाचा एकूण वापर हा ३०० लाख गाठींचा असेल, असा अंदाज ‘सीएआय’चे अध्‍यक्ष अतुल गणात्रा यांनी व्‍यक्‍त केला आहे. गेल्‍या हंगामात कापसाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्‍याने बहुतांश कापड उद्योगांनी सुताला पर्याय म्‍हणून पॉलिस्‍टरच्‍या धाग्‍यांचा वापर वाढवला आहे. शिवाय युरोपीय राष्‍ट्रांमधील भारतीय कापडाच्‍या मागणीत घट झाली आहे. जगभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने कापसाला मागणी घटली आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस बांगलादेशला जातो. इतर खरेदीदार देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश होतो. बांगलादेश संकटाचा सामना करत असून, तेथून कापसाला मागणी नाही.

कापूस निर्यातीची स्थिती कशी आहे?

‘सीएआय’च्या अंदाजानुसार यंदा कापूस निर्यातीत ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ४३ लाख गाठी कापूस निर्यात झाला होता. मात्र कापूस निर्यातीत एवढी घट होणार नाही. निर्यात किमान गेल्या वर्षीइतकी तरी राहील किंवा किंचित जास्तच राहील. यंदा निर्यात ४५ ते ४८ लाख गाठी होईल. यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ७० हजार गाठी कापूस निर्यातीसाठी करार केले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत पाच लाख गाठींहून अधिक कापूस निर्यातीसाठी करार झाले होते. यावरून यंदाच्या हंगामातली कापूस निर्यातीतील घसरण दिसून येते. स्थानिक बाजारातील कापसाचे दर कमी होण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेतील किमती वाढत नाहीत तोपर्यंत निर्यातीला वेग येणार नाही, असे बाजार विश्‍लेषकांचे मत आहे.