FIFA World Cup 2018 ARG vs CRO : फिफा विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगालने आज पहिल्या विजयची नोंद केली. पोर्तुगालने मोरोक्कोला १-० अशी धूळ चारली. या सामन्यात रोनाल्डोने आपली लय कायम ठेवत सामन्याच्या चौथ्या मिनिटाला गोल केला. संपूर्ण सामन्यात केवळ एकच गोल होऊ शकल्याने रोनाल्डो त्यांच्या संघाचा पुन्हा एकदा स्टार ठरला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही तुल्यबळ स्पेन विरोधात रोनाल्डोने मारलेल्या ३ गोलमुळे पोर्तुगालला सामना बरोबरीत सोडवता आला होता. पण याच स्पर्धेत आणखी एका स्टार खेळाडूंकडे साऱ्यांचे लक्ष आहे. हा खेळाडू म्हणजे लिओनल मेसी.

अर्जेंटिनाचा पहिला सामना आइसलँड या संघाशी झाला. आइसलँड संघाचे ही पदार्पणाची स्पर्धा आहे. त्यामुळे बलाढ्य अर्जेटिनाचे आव्हान आइसलँड कसे रोखणार? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. पण आईसलँडने सामन्यात अर्जेंटिनाच्या आधी गोल करून ‘हम भी किसीसे कम नही’, हे दाखवून दिले. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात अर्जेन्टिनाला फ्री किक वर गोल करण्याची संधी असताना मेसी ती संधी गमावली. त्यामुळे त्याच्यावर भरपूर टीका झाली.

सोशल मिडीयावर तर मेसीला सामन्यातील गुन्हेगार ठरवण्यात आले. अशा वेळी अखेर मेसीची पत्नी अँटोनेला रोकुझो त्याला पाठिंबा देण्यासाठी धावून आली आहे. मेसी दडपणाखाली थोडासा कमी पडत आहे, ही गोष्ट साऱ्यांनाच जाणवली असेल. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीलाही ही गोष्ट जाणवली. त्यामुळे उद्या होणाऱ्या अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया या सामन्याआधी मेसीच्या पत्नीने त्याच्यासाठी प्रोत्साहन देणारा एक संदेश दिला आहे.

मेसीच्या पत्नीने इंस्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मेसीची तीन अपत्येही आहेत. या फोटोसह तिने ‘आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत. कायम तुझ्या पाठीशी असू’, (Always Together and with You more than ever! ) असा संदेशही तिने लिहिला आहे.