Ganpati Visarjan 2023 Updates : “ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात काल (२८ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचं अखेर २३ तासांनी विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लालबागच्या राजाचे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्याने अनेक भाविक लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी येत असतात. तसंच, इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही या मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे या राजासाठी गर्दी वाढत जाते. गर्दीत सहभागी होता न येणारे अनेक भाविक गिरगाव चौपाटीवरच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी थांबले होते.

दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पावसानेही काल हजेरी लावली. पावसाच्या आगमनातही बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते. गेल्या २३ तासांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीतील उत्साह कमी झाला नव्हता.

असं झालं राजाचं विसर्जन

राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज सकाळी ८ वाजल्याच्या दरम्यान लालबागचा राज गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळई समुद्राला ओहोटी होती. राजाची दिमाखात महाआरती करण्यात आली. या महाआरतील गणेशभक्तांचा जनसमुदाय लोटला होता. महाआरती झाल्यानंतर राजाला विसर्जनाच्या दिशेने नेण्यात आले. राजाला तराफ्यावर बसवण्यात आलं. कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्राच्या मध्यभागी तरफा थांबवण्यात आला. अत्याधुनिक तराफ्यातून राजाची मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यात आली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.

“घरातील व्यक्ती जाते तेव्हा कंठ दाटून येतो, तो क्षण आम्ही आज अनुभवतोय. नयनरम्य सोहळ्यात विसर्जन सोहळा सुरू असून सर्व भावूक झाले आहे. बाप्पाची मांगलमय मूर्ती, गोंडस आणि गोजिरवाणा चेहरा रोज दहा दिवस आमच्यासोबत असतो. तो आता पुढील एक वर्ष दिसेनासा होणार आहे. त्यामुळे सर्वजण भावनिक झालो आहेत. सर्वांचे डोळे पाणावले आहेत. तराफाच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येतं. हायड्रोलिकर मेकॅनिकली ऑपरेट केला जातो. पाणबुडी असते, पाणबुडीसोबत तज्ज्ञ आणि कोळीबांधव अत्याधुनक तराफ्यातून खोल समुद्रात जाऊन बाप्पाचं विसर्जन करतात, अशी अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली. ते टीव्ही ९ शी बोलत होते.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procession of king of lalbagh for 20 hours immersion to be held shortly watch live darshan sgk