राज्यात लोणेरे येथे तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लाल सिग्नल दाखविला आहे. आरोग्यविज्ञान विद्यापीठाची कामगिरी सुमार दर्जाची असल्याने तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करणे किती उपयुक्त ठरेल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव लांबणीवर पडणार आहे.
तंत्रज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विद्याशाखानिहाय विद्यापीठांची स्थापना केल्यास ते महाविद्यालयांचा दर्जा वाढविण्यास आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरेल. या विद्यापीठांमध्ये संशोधनाला चालना मिळेल. त्यामुळे अशा विद्यापीठांच्या स्थापना करण्याची शिफारस सरकारने नेमलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञांच्या समित्यांनी सरकारला केली होती. अनेक देशांमध्येही अशी विद्यापीठे आहेत. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडेही पाठविला आहे. हे विद्यापीठ स्थापन करण्यास विभागाची अनुकूलता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनीही अनेकदा याचे समर्थन केले आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेतून काय साध्य होईल, असा मुद्दा उपस्थित केला आहे. अन्य राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी विभागाला केल्या आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये तंत्रज्ञान विद्यापीठ अस्तित्वात आहेत व त्यांचे काम सुरळीत सुरू असल्याची माहिती विभागातील उच्चपदस्थांनी दिली. त्याचबरोबर रायगड जिल्ह्य़ातील लोणेरे येथील जागा राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी सोयीची नाही. पारंपारिक विद्यापीठांकडून अभियांत्रिकी महाविद्यालये काढून घेऊन तंत्रज्ञान विद्यापीठास संलग्न केल्यावर विविध मुद्दय़ांसाठी महाविद्यालयांना या विद्यापीठाकडे जावे लागेल. त्यामुळे हे विद्यापीठ रायगडऐवजी अन्यत्र असावे, असाही मतप्रवाह आहे.