मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतर्फे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सहकार्याने ‘एक्झक्युटीव्ह एमबीए’ (ई-एमबीए) हा नवा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. आयआयटी व वॉशिंग्टन विद्यापीठ यांच्यात अमेरिकेतील सेंट ल्युईस येथे नुकत्याच झालेल्या ‘कॉर्पोरेट लीडर्स कॉन्क्लेव्ह’मध्ये हा अभ्यासक्रम चालवण्यासंदर्भात या संस्थांमध्ये करार करण्यात आला.
या बैठकीला वॉशिंग्टन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मार्क रिंगटन आणि मुंबई-आयआयटीचे संचालक देवांग खक्कर उपस्थित होते. भविष्यात दोन्ही शिक्षण संस्थांमधील संबंध वृद्धींगत करण्यावर भर दिला जाणार आहे. आधुनिक काळातील गरजा लक्षात घेऊन संशोधनविषयक सहकार्य वाढावे, यासाठी दोन्ही संस्थांचा सहभाग असलेले रिसर्च पार्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तूर्तास जानेवारी-२०१५ पासून या संस्थांचा मिळून ई-एमबीए हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ‘ओलिन स्कूल ऑफ बिझनेस’च्या मदतीने हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये ऊर्जा आणि पर्यावरण या क्षेत्रातील संशोधनामध्ये सहकार्य सुरू आहे. याशिवाय आयआयटीमध्ये केंद्र सरकारच्या सहकार्याने रिसर्च पार्क सुरू करण्याचा विचार आहे. भारतीयांच्या गरजा ओळखून त्याआधारे संशोधन हे या पार्कचे वैशिष्टय़ असेल, असे प्रा. खक्कर यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Oct 2013 रोजी प्रकाशित
आयआयटी आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा ‘ई-एमबीए’
मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतर्फे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या
First published on: 21-10-2013 at 03:29 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit and washington university starts e mba course