लाखो रुपयांच्या शुल्काच्या मोबदल्यात अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कामोठे येथील ‘एमजीएम अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालया’त विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा खेळ अद्यापही सुरूच आहे. गेल्या आठवडय़ात या महाविद्यालयात चाचणी परीक्षा सुरू असताना तीन विद्यार्थ्यांच्या अंगावर पंखा पडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. या वेळी आयटीच्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनीच्या डोक्यात पंखा पडला.
एका वर्षांत पंखा पडल्याची ही तिसरी घटना आहे. गुरुवारच्या घटनेत दीपाली दुबे ही मुलगी जखमी झाली असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. वेळोवेळी घडणाऱ्या या घटनांमुळे नाइलाजाने विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
एमजीएम हे महाविद्यालय एकेकाळी शिक्षणमंत्री राहिलेल्या डॉ. कमलकिशोर कदम यांच्या ‘महात्मा गांधी मिशन’चे आहे. महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, लेडीज कॉमन रूम, विजेची जोडणी आदी मूलभूत सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे, यास ‘लोकसत्ता’ने १९ डिसेंबरच्या अंकात वाचा फोडली होती. त्या वेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयांची ही दुरवस्था चव्हाटय़ावर आणली. त्या वेळी या कार्यकर्त्यांनीही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दम भरला होता. पण, त्याचा पुरेसा धसका बहुधा प्रशासनाने घेतलेला दिसत नाही. आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्राचार्य संतोष नारायणखेडकर यांनी चार दिवस महाविद्यालय बंदची घोषणा करत या चार दिवसांत पंख्याचे रॉड बदलू असे आश्वासन दिले आहे. एमजीएम महाविद्यालयात अभियांत्रिकीचे ३,७०० विद्यार्थी आहेत. लाखो रुपयांचे डोनेशन आणि वर्षांला ९१ हजार रुपयांचे शुल्क भरूनही निकृष्ट सुविधा असल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘एमजीएम’मध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ‘टांगती तलवार’!
लाखो रुपयांच्या शुल्काच्या मोबदल्यात अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कामोठे येथील ‘एमजीएम अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालया’त विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा खेळ अद्यापही सुरूच आहे.
First published on: 14-02-2014 at 03:03 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mgm students in see saw condition