कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व ताराराणी आघाडी पक्षातील तीन माजी महापौरांसह २२ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे खंदे समर्थक शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे सेनेत माजी नगरसेवकांना आणण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम यांचे प्रयत्न सुरू होते.
त्यातून काल रात्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे शारंगधर देशमुख, प्रकाश नाईकनवरे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी महापौर निलोफर आजारेकर, दिगंबर फराटे, जहांगीर पंडित, रीना कांबळे, भाजपचे संभाजी जाधव, गीता गुरव, संगीता सावंत, अश्विनी बारामते राष्ट्रवादीचे आनंदराव खेडकर, अनुराधा खेडकर, रशीद बारगीर , ठाकरे सेनेचे अभिजित चव्हाण, ताराराणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम, भरत लोखंडे, सीमा कदम, कविता माने, अर्चना पागर, सुनंदा मोहिते, पूजा नाईकनवरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
महापौर सेनेचा -क्षीरसागर
एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिका जिंकण्यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिका निवडणूक ताकदीने लढवून महापौर शिवसेनेचा करू, अशी ग्वाही दिली.
कोल्हापुरात भगवा – आबिटकर
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात सर्वत्र शिवसेनेचे चित्र दिसेल. सर्वच निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा शिवसेनामय केला जाईल, असा निर्धार व्यक्त केला.