उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात कर्जमाफी केली, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या अभ्यासासाठी अडीच वर्षे का लागतात? असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे ! असे साकडे कोल्हापूरच्या आंबाबाईला घातले आहे, असेही अजित पवार यांनी कोल्हापूरातील संघर्ष यात्रेमध्ये म्हटले. तुरडाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात अजित पवार म्हणाले की, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तुरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे. पण, शासनाला केवळ चूक मान्य करुन चालणार नाही तर तुरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

सत्तेच्या जोरावर राज्य शासनाला शेतकऱ्यांची आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत, तुरडाळ संपेपर्यंच ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून विकत घेण्याचा शब्द देऊनही राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शासनाने तुरडाळ केंद्रे त्वरित सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राज्य शासनाविरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर पत्रकार परिषदेत दिला. विखे म्हणाले की,उत्तर प्रदेशप्रमाणे एक लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य नाही. त्यांचा सात बारा पूर्ण कोरा होईपर्यंत संघर्ष लढा सुरुच राहिल. १ मे राजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळावा या मागणीचा ठराव संमत करुन शासनाकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरातील संघर्षयात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.