कोल्हापूर : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला सोमवारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. ते येत असलेल्या बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तर त्याला विरोध करत ओवैसी समर्थकांनी ‘शेर आया’ अशा घोषणा दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवैसी व माजी खासदार इम्तियाज जलील हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ओवैसी हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कोल्हापुरातील आगमनालाच विरोध दर्शविलेला होता.
देव, देश, धर्माविरोधात वक्तव्य करणाऱ्या ओवैसींना कोल्हापुरात पाऊस टाकू दिले जाणार नाही, असा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यांची समजूत पोलीस अधिकारी काढत होते. त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
अशातच ओवैसी व इम्तियाज जलील हे बागल चौकात प्रार्थनेसाठी आले होते. तेथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ओवैसी व जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओवैसी समर्थकांनी शेर आया अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप
यावेळी पत्रकारांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, कोल्हापूर नगरीच्या विकासाचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांच्याविषयीची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या नगरीला हिंदू – मुस्लिम वादाचे असे स्वरूप देण्याचा प्रयत्न चालवला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘आय लव मोहम्मद’ योग्यच
एमआयएम पक्ष हा भाजपचा ‘बी’ टीम असल्याची टीका केली जात आहे, याकडे लक्ष वेधले असता जलील यांनी हा प्रश्न विचारणे आता बंद केले पाहिजे, असे उत्तर दिले. प्रभू रामचंद्रांवर प्रेम असणाऱ्यांकडून ‘जय राम’ असे फलक लावले जातात त्या धर्तीवर ‘आय लव मोहम्मद’ असे म्हटले तर त्यात काही गैर नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ओवैसींनी बिघडवू नये – सतेज पाटील
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. मात्र, तो कोल्हापुरात चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एक चांगले, समतेचे वातावरण आहे. ते बिघडवण्याचे काम ओवैसी यांनी करू नये, अशा शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी फटकारले.
येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, की ओवैसी यांचा पहिल्यापासून ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. त्यांचे हे ध्रुवीकरण येथे मुळीच चालणार नाही. कोल्हापुरात एक चांगले वातावरण असताना ते कलुषित करण्याचे काम कोणीही करू नये.