कोल्हापूर : इचलकरंजी येथील कॉम्रेड के.एल. मलाबादे चौकात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी लोकवर्गणी संकलन शुभारंभ सोमवारी करण्यात आला. आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शुभारंभ सोहळ्यास शहरातील मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने मलाबादे चौकात संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाने सुशोभिकरणासाठी निधी दिला असला तरी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतूनच उभा रहावा या भावनेतून हे निधी संकलन सुरु करण्यात आले आहे.
आज सुरु झालेल्या या निधी संकलन १८ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. शुभारंभा दिवशीच शहरातील शिवशंभु भक्तांनी आपले दातृत्व दाखवून दिले. आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी प्रत्येकी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी प्रतिष्ठानकडे सोपवून धर्मकार्याला प्रारंभ केला. या कार्यात शहरवासीयांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अरविंद माने, श्रीरंग खवरे, बंडा मुळीक, रमेश कबाडे, ंसंतोष सावंत, प्रसाद जाधव, युवराज बोने-पाटील, अमृतमामा भोसले, मंगेश मस्कर, अॅड. शांतीभुषण मुदगल, राजू पुजारी, सुनिल इंगळे, संतोेष घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वादाची फोडणी
स्वच्छ भारत अभियान उपक्रमाअंतर्गत इचलकरंजीत प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे कॉ. मलाबादे चौकात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि माजी लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. तेव्हा आमदार आवाडे यांनी कॉ. मलाबादे चौकात पुतळा बसविण्यासाठीचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपरिषदेने द्यावा असे सांगितले होते. तोच धागा पकडत आमदार आवाडे यांनी आज स्वच्छता कार्यक्रमात विषय उपस्थित केला. प्रशासन दरबारी पाठपुरावा करत पुतळा उभारणीस मी मंजुरी आणली आहे. आता महानगरपालिकेने प्रस्ताव द्यावा. शासन निधीतून कॉ. मलाबादे चौकात पुतळा उभारला जाईल, कोणाला विरोध करायचा त्यांनी करावा., असे ते म्हणाले होते.
त्यावर माजी नगरसेवक सागर चाळके, सदा मलाबादे यांनी आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा उभारण्याचे ठरले असताना कॉ. मलाबादे चौकाचा अट्टाहास का, आजच्या कार्यक्रमात हा विषय काढण्याची गरज काय होती, असा सवाल केला. त्यावरून आमदार आवाडे व चाळके यांच्यात शाब्दिक वाद झाला. आवाडे आपल्या मतावर ठाम राहिल्याने वाद वाढत असल्याचे पाहून खासदार धैर्यशील माने व अन्य लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत वाद संपुष्टात आणला होता.