कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी नुकतेच २ बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. या दोघींकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्डही सापडले आहे. कोल्हापूर येथे बांगलादेशी महिला सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर येथे अशा घटना घडल्या आहेत. ही घटना उघड होण्याच्या अगोदर पुणे, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथेही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा, या मागणीचे निवेदन २४ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठिराखे कोण याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारचे लोक हे विविध खोटी नावे धारण करून रहातात. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक घरमालकांना त्यांनी नागरिकांनीही कोणासह भाड्याने खोली देतांना त्याची चौकशी करूनच त्यांना भाडेकरू म्हणून ठेवावे, या संदर्भात आवश्यक त्या सूचना द्याव्यात, तसेच काही संशयास्पद वाटल्यास लगेचच पोलिसांना कळवावे, अशा सूचना दिल्या पाहिजेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…वडणगेतील मंदिराशेजारील जागा ‘वक्फ’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंदला प्रतिसाद

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेना उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, अर्जुन आंबी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनील सामंत, महाराज प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख श राजू यादव आणि उपशहरप्रमुख शशी बीडकर, हिंदुत्वनिष्ठ अभिजित पाटील आणि रामभाऊ मेथे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरद माळी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. नंदकुमार घोरपडे उपस्थित होते.