कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करण्याचा निर्णय दुग्धविकास विभागाने घेतला आहे. याकरिता सांगली येथील विशेष जिल्हा लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र पुणे दुग्ध सहकार निबंधकांनी पाठवले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) या संस्थेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आर्थिक अनियमिता बाबत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने गेल्या पंधरवड्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्यासह शिवसैनिकांकडून गोकुळच्या कारभाराविरोधात जोरदार तक्रारी करण्यात आल्या होत्या.

या निवेदनाची दखल घेऊन आता गोकुळमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गोसावी यांना पुणे उपनिबंधक कार्यालयाने पत्र पाठवलेले आहे. ही चौकशी पंधरा दिवसांत करण्यात यावी, असे पत्रामध्ये म्हटले असल्याच संजय पवार यांनी सांगितले. ही चौकशी समिती नेमल्याबद्दल समाधान व्यक्त करून पवार म्हणाले, कष्टकरी शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये ही अपेक्षा. त्यांचे घामाचे पैसे सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदेशीररीत्या उधळत आहेत. अशा लोकांकडून पैसे वसूल झालेच पाहिजेत. तसेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जबाबदार संचालक कार्यकारी संचालक लेखापाल यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यांनी केली.

प्रदीप मालगावे ,सहाय्यक निबंधक (दुग्ध )कोल्हापूर  यांना दिल्या निवेदनात संजय पवार, विजय देवणे यांनी म्हटले होते की, गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले  यांच्याकडे तीन कोटी ७४ लाखांचे जाजम व घड्याळ भेटवस्तू देताना कोणत्या आधारे ही खरेदी केली. भेटवस्तू देण्यासंदर्भात आमची कोणतीही हरकत नव्हती. परंतु कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्न अजून तरी अनुत्तीर्णच आहे कारण कार्यकारी संचालक गोकुळ दूध संघ यांनी १५ ऑगस्ट रोजी खुलासा देण्याचे जाहीर केले होते परंतु आजतागायत त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या खुलासा दिला नसल्याने आपल्याकडे या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवेदन देत आहोत. कार्यकारी संचालक गोडबोले यांनी कोटेशनद्वारे खरेदीचा अधिकार संचालक मंडळाचा आहे असे तोंडी स्पष्ट केले आहे.परंतु किती रकमेपर्यंत कोटेशनच्या माध्यमातून संचालक मंडळाने अधिकार आहे हे स्पष्ट होत नाही आमच्या मते एवढ्या मोठ्या रकमेची निविदा काढून स्पर्धा होणे आवश्यक होते.

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या  व घामाच्या पैशातून बेकदेशीररित्या अधिकाराचा दुरुपयोग करून उधळपट्टी होत असेल तर त्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यासंदर्भात कृती होणे आवश्यक आहे . तसेच कार्यकारी संचालक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ व गोकुळचे मुख्य लेखापरीक्षण कार्यकारी यांच्या कारभाराची चौकशी करून गुन्हे नोंद करा.  अन्यथा आपल्या  खात्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच आपल्याला न्यायालयात सुद्धा खेचण्याचा विचार करण्यात येईल.त्याचबरोबर पशुखाद्य घोटाळा व सहकुटुंब गोवा सहलीसाठी खर्च केलेल्या लाखो रुपयांची सुद्धा चौकशी होणे क्रम प्राप्त आहे.