कोल्हापूर : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कोल्हापुरातील रंकाळा तलावाची दुरवस्था सुरूच आहे. तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने मृत माशांचा खच साचला आहे. रंकाळा तलावाचे विद्रुपीकरण होत असताना त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या महापालिका यंत्रणेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाच्या सातत्याने घोषणा होत आहेत. शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम रखडले असल्याने गेल्या पंधरवड्यापूर्वी महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर चारच दिवसांनी रंकाळा तलावात प्रदूषणामुळे मासेमृत, अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, मद्याच्या रिकाम्या बाटल्या असे गंभीर प्रकार दिसून आले होते. त्या विरोधात समाजमन संस्थेने तक्रार करूनही फारशी सुधारणा झाली नसल्याचे सद्यस्थिती दर्शवत आहे.

हेही वाचा – मनुस्मृतीचा शिक्षणात समावेश करण्यास कोल्हापुरात विरोध; मंत्री दीपक केसरकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी

आताही रंकाळा तलावामध्ये प्रदूषित पाण्यामुळे मासे मोठे प्रमाणात मरून पडले आहेत. मृत माशांचा खच किनाऱ्याला लागला आहे. मृत मासे पोत्यात भरून हलवण्याचे उपचार शनिवारी महापालिका यंत्रणा पार पाडत असल्याचे दिसत होते.

हेही वाचा – जागतिक दूध दिन: दुधाळ जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करणारा प्रकल्प इचलकरंजीतील विद्यार्थ्यांकडून विकसित

रंकाळा तलावाचे विद्रुपीकरण सुरूच राहिले आहे. कोल्हापूर महापालिकेला आणि शासनाला केवळ रंकाळा सुशोभीकरणात आणि त्यातील मलई खाण्यात रस आहे. रंकाळा तलावाचे संवर्धन, प्रदूषण रोखने या अत्यावश्यक बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. रंकाळ्याचे प्रदूषण वाढत चालल्याचे निदर्शनास आणून दिले असतानाही याबाबत आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून कोणतीही कृती होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत समाजमन संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे यांनी व्यक्त केली.