कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये डिबेंचर देण्याची पद्धत गेल्या २५ वर्षापासून सुरू आहे. हा निर्णय राबवणाऱ्यांच्याच सुनेने डिबेंचर कपातीचा मुद्दा उपस्थित करणे संयुक्तिक नाही. विशेष म्हणजे हा मुद्दा गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आला असताना तेव्हा विरोध न करता त्यावर सहमतीची सही यांनीच केली होती, अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी आज डिबेंचरच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांना डिवचले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या डिबेंचर कपातीचच्या प्रश्नावरून सतेज पाटील व शौमिका महाडिक यांच्यातील वाद नव्याने चर्चेत आला आहे.गोकुळ दूध संघाचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा राज्यातील सर्वात मोठा दूध उत्पादक संघ आहे. या गोकुळ मधील कोणता ना कोणता मुद्दा नेहमीच वादग्रस्त बनलेला असतो. या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपासून दूध उत्पादक संघांना द्यावयाच्या डिबेंचर कपातीचा मुद्दा गाजत आहे.
वार्षिक सभेच्या वेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. तर काल त्यांनी या प्रश्नावर मोर्चा काढून संचालक मंडळावर प्रश्नांचा भडीमार करून सतावले होते.आज गोकुळ दूध संघात झालेल्या कार्यक्रमात सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले , गोकुळ दूध संघाने गेल्या साडेचार वर्षात चांगल्या प्रकारे कामकाज केलेले आहे. दूध उत्पादकांना चांगला दर दिलेला आहे. विकासाची अनेक कामे केलेली आहेत. तरीही कारण नसताना टीका केली जात आहे.
डिबेंचर प्रश्नावर टीकाकारांची दुटप्पी भूमिका दिसत आहे. यांची सत्ता असताना तो दिला जात होता. तेव्हा त्यावेळी कोणी कोणाला आक्षेप घेतला नाही. उलट, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी डिबेंचर रकमेत कपात करण्याचा प्रश्न विषय पत्रिकेवर होता. तेव्हा सर्व संचालकांनी यास संमती दिली. त्यामध्ये यांचाही समावेश होता. तरीही आता ते डिबेंचर बाबत वेगळी भूमिका घेत आहेत. हे वागणे संयुक्तिक नाही, असा टोला सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांना लगावला. मात्र डिबेंचरप्रश्नावरून पुन्हा एकदा पाटील आणि महाडिक या कुटुंबातील राजकीय वाद चव्हाट्यावर आलेला आहे. कालच्या मोर्चा वेळीही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार अमल महाडिक यांचा जयघोष केला होता. गोकुळ दूध संघाची निवडणूक सहा महिन्यात होणार असून त्याचे पडसाद आतापासूनच उमटू लागले आहेत. गोकुळ वर होणारी आंदोलने, त्यातून राजकीय बांधणी करण्याचा प्रयत्न होत आहे.