कोल्हापूर : कोल्हापूर ही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची नगरी आहे. येथे शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणे अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांमध्ये विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीवेळी नापसंती व्यक्त केली.
नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस व तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. कोल्हापुरात अलीकडील काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांनी डॉ. गोऱ्हे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटीत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अलीकडे कोल्हापूर शहरात झालेल्या हल्ले, खून, खुनाचे प्रयत्न व तलवारीने दहशत माजविणाऱ्या घटना ही चिंतेची बाब आहे. सर्व आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागातील सुरक्षेवरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक वातावरण टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी, नागरिकांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महिलांच्या तक्रारींवर जलद व प्रभावी प्रतिसाद मिळावा यासाठी भरोसा सेल अधिक व्यापक आणि कार्यक्षम करण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. महिलांसोबत ऑनलाईन कनेक्टिव्हिटी वाढवणे, सूचना पेट्यांचा वापर सुयोग्य रीतीने करणे तसेच पोलिसांना लिंगभाव संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्यातील समन्वय वाढवावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली. निर्जन रस्त्यांवर गस्त वाढवणे, ग्रामीण भागात रिक्षा नंबर नोंदविण्याबाबत जनजागृती करणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमली पदार्थांची विक्री, टोळीबाजी, खून व खुनाचे प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया अधिक काटेकोरपणे राबवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेणे हे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, जिल्ह्यातील पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) प्रकरणांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने, या प्रकरणांची सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि तारखांचा नियमित पाठपुरावा व्हावा यासाठी विशेष पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.