कोल्हापूर : शाही दसरा महोत्सवांतर्गत सात राज्यांतील ११७ कलाकारांनी लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून कोल्हापूरकरांना मंत्रमुग्ध केले. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकारांनी लोककला, नृत्यप्रकार आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले.
राजस्थानी कलाकारांच्या पारंपरिक चरी नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डोक्यावर पेटलेल्या ज्वाळांसह लयबद्ध हालचाली करताना कलाकारांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. सोंगी मुखवटे नृत्याने प्रेक्षकांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासी लोककलेचा नजराणा अनुभवायला मिळाला.
मध्य प्रदेशातील नर्तकांनी झलरिया आणि मटकी गणगौर नृत्याच्या लयीतून लोककलेतील समृद्धीचे दर्शन घडवले. शिव-पार्वतीच्या विविध प्रतिमांचे चित्रण यातून प्रभावीपणे साकारले गेले. कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्याच्या माध्यमातून शक्तीची उपासना, भक्तिभाव आणि शौर्यपूर्ण हालचालींचा संगम सादर केला. पश्चिम बंगालच्या कलाकारांनी विशेष वेशभूषा व अलंकारांमधून छऊ नृत्य सादर करत पुराणकथांतील युद्ध आणि वीरतेचे प्रभावी चित्रण केले. नृत्य, संगीत आणि पदन्यास यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. तेलंगणातील दोन विशेष नृत्यप्रकारांनी कार्यक्रमात रंगत भरली.
पश्चिम बंगालच्या कलाकारांनी बोनालू नृत्यातून महाकाली देवीची भक्तिभावपूर्ण उपासना प्रकट झाली, तर अखेरीस बथुकम्मा नृत्यातून महिलांनी फुलांच्या सजावटीद्वारे निसर्ग, माता आणि सृजनशक्तीचा गौरव साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या मदतीने करण्यात आले. हे केंद्र भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत असून, देशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. कार्यक्रमातून प्रेक्षकांना विविधरंगी लोककलेच्या सादरीकरणाद्वारे देशातील सात राज्यांच्या परंपरा, संस्कृती आणि उत्सवांची झलक एकाच ठिकाणी अनुभवायला मिळाली. शाही दसऱ्याच्या मंचावर झालेल्या आराधना पहिल्या भागाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहित केले असून, दुसऱ्या भागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे मिलिंद जोशी यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केले. दररोजप्रमाणे कार्यक्रमाआधी जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनविषयक विविध ठिकाणे, त्यांची वैशिष्ट्ये आणि पर्यटकांनी घ्यावयाची काळजी याबाबत ऋषिकेश केसकर व विनोद कांभोज यांनी माहिती दिली. दिवसभरात शाही दसरा महोत्सवांतर्गत प्लास्टिकमुक्त कोल्हापूरसाठी पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.