कोल्हापूर : वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत, विद्यार्थ्यांच्यावर वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीशेजारील जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत बांधल्या जातील, वन जमिनी हक्काची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वन विभागातील विविध प्रश्नावर बैठकीची मागणी केली होती. त्यावर आज मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी राजू शेट्टी यांनी वरील मागण्यांची मांडणी केली. याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी वनमंत्री नाईक यांनी वरील मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवित संबंधितांना उचित कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.

वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्य वन संरक्षक क्लेमेंट बेन, उप वनसंरक्षक व्ही. गुरुप्रसाद यांचेसह वनविभागातील सहसचिव, उपसचिव व अधिकारी उपस्थित होते.